सिन्‌ग्नॅथिडी या मत्स्यकुलात घोडामाशांच्या बरोबरच नळी माशांचाही समावेश होतो. जगाच्या बहुतेक भागातील उष्ण समुद्रांत नळी मासे आढळतात. त्यांच्या बहुतेक जाती समुद्रकिनाऱ्याजवळील उथळ पाण्यात राहतात आणि त्या सामान्यतः समुद्रतृणात आढळतात. यांच्या काही जाती गोड्या पाण्यातही राहणाऱ्या आहेत.

वर्णन संपादन

या लहान माशांचे शरीर नळीसारखे लांब व कृश असून त्यावर खवल्यांऐवजी अस्थिवलयांचे आवरण असते. ही वलये हाडांच्या लहान चकत्या एकवटून बनलेली असतात. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) मऊ असून एकच असतो; श्रोणि-पक्ष आणि गुद-पक्ष नसतात आणि काही जातींत पुच्छापक्षही (शेपटीचे पर) नसतात. दोन्ही जबडे जोडले गेल्यामुळे मुस्कट नळीसारखे लांब असते. त्याच्या टोकावर अगदी लहान मुख असते. दात नसतात. क्लोम (कल्ले) शाखायुक्त असतात व क्लोमावरण साध्या तकटासारखे असून त्याचे छिद्र लहान असते. हे मासे फार मंद गतीने पोहतात व त्याकरिता पृष्ठपक्षाची हालचाल उपयोगी पडते. ते कित्येकदा आडवे पोहण्याऐवजी शरीर उभे ठेवून पोहतात. लहान क्रस्टेशियन (कवचधारी) प्राणी, इतर प्राण्यांचे डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्वावस्था) आणि लहान मासे यांवर ते उदरनिर्वाह करतात. ते आपले भक्ष्य तोंडात ओढून घेतात. काही जातींत नराच्या उदराच्या अथवा शेपटीच्या खालच्या बाजूवर एक पिशवी (शिशुधानी) असते. मादी या पिशवीत अंडी घालते. पिशवी अंड्यांनी भरली म्हणजे बंद होते. अंडी फुटल्यावर पिल्ले काही दिवस पिशवीतच राहतात. नर अंड्यांची व पिल्लांची काळजी घेतो. पिल्ले थोडी मोठी झाल्यावर पिशवीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे राहू लागतात.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सिन्‌ग्नॅथस नावाचा नळी मासा सापडतो, तर पूर्व किनाऱ्यावर जो नळी मासा नेहमी आढळतो, त्याचे शास्त्रीय नाव ट्रॅकिऱ्हॅंफस सीरेटस असे आहे. याचाच एक नातेवाईक नळी मासा डोरिइक्थिस क्युंक्युलस हा पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरील नदीमुखांतून आढळतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो नदीमुखातून नदीत बऱ्याच अंतरापर्यंत जातो.

संदर्भ संपादन

http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/928933940-92e93e93893e