नरहर शंकर रहाळकर (१८८२:भडगाव, खानदेश - ७ डिसेंबर, १९५७) हे एक मराठी कवी होते. त्यांनी बालपणापासूनच काव्यरचना केल्या. जेव्हा त्यांच्या गावी केशवसुत शिक्षक म्हणून आले तेव्हा त्यांनी अधिक कविता रचल्या. त्यांचे लेखन मुख्यतः १८९८ ते १९०४ या कालखंडात झाले. ते केशवसुतांचे एक आद्य रसिक चाहते, आणि केशवसुतांच्या कवितेचे समीक्षक म्हणून ओळखले जातात.

रहाळकरांच्या कवितांमध्ये माझी आई आणि माझ्या आईची तसबीर' ही विलापिका गाजली. यानंतर पुष्पांजली, बिल्वदलसह पाच कवितासंग्रह, वीरधर्मदर्पण (महाभारतातील अभिमन्यूवधापासून जयद्रथवधापर्यंतच्या कथाभागावर आधारित संस्कृत नाटक) व उत्तररामचरित या नाटकांची भाषांतरे व मानाजीराव हे नाटक लिहिले. त्यांचा शाकुंतलसौंदर्य हा टीकात्मक निबंधही गाजला. त्यांचे लिखाण त्याकाळी मासिक मनोरंजनमधून प्रसिद्ध होत असे.

रहाळकरांनी केशवसुतांच्या काव्यावर अभ्यासपूर्ण लेख लिहिले. ते लेख पुढे केशवसुत आणि त्यांच्या कविता या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.