नदीसुरय
नदीसुरय किंवा सरोता (शास्त्रीय नाव: स्टर्ना ऑरॅंशिया) हा साधारण कबुतराच्या आकाराचा (३८-४६ सेमी) पाणपक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये रिव्हर टर्न म्हणतात.
माहिती
संपादनसुरय या शब्दाचा अर्थ डौलात उडणारा. रय म्हणजे वेग. जो पक्षी उडण्यात पटाईत आहे तो सुरय. लांबसडक, अरुंद, टोकदार पंखांची लयबद्ध हालचाल करत अत्यंत सहजपणे उडणारा सुरय हवेत मधूनच थांबतो, गिरकी घेतो आणि दगड पडावा तसा पाण्यात बुचकुळी मारतो. पाण्यातून बाहेर येतो तेव्हा त्याच्या चोचीत आडवा धरलेला मासा दिसतो. सुरय हा पाणपक्षी कबुतराच्या आकाराचा असला तरी त्याचा बांध शेलाटा असतो. उडत असताना त्याचं आणखी एक वैशिष्ट नजरेत भरतं ते म्हणजे त्याची दुबळ्यासारखी( म्हणजे फाटा असलेली) शेपूट. नद्या, तलाव आणि जलाशयांवर या पक्ष्यांचे थवे दिसतात.
वर्षभर भारत देशात सहजपणे दिसणारा सुरय टळटळीत उन्हात(मार्च ते मे) घरटे करतो. हे घरटे इतर पक्ष्यासारखे काडयाकाड्या जमवून केलेले नसून तर सरळ जमिनीवरच अंडी घालतो. बसून बसून त्या जागेवर एक खळगा तयार होतो. उन्हाळ्यात सुरय पक्ष्याची अंडी घालून पिल्लं वाढविण्यासाठी धडपड सुरू होते. या काळात तापमान कधी कधी ४०डिग्री सेल्शियसपर्यंत चढतं. अशा वेळी अंड्यांना उब देण्यापेक्षा ती उन्हात भाजून आतला जीव मरू नये यासाठी त्यांचं संरक्षण करणं महत्त्वाचं असतं.