धूळपाटी/पसायदानाचा अध्यात्मिक आशय
ज्ञानेश्वरांनी 'श्रीमत् भगवत गीतेवरील' टिका म्हणजे ज्ञानेश्वरी, हा ग्रंथ लिहिला आहे. लेखन पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर विश्वात्मक असा जो देव आहे, त्याला मागणे मागत आहेत की, त्याने ह्या वाङमय यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला प्रसादाचे दान द्यावे. ज्ञानेश्वरी ग्रंथातील १८ व्या अध्यायातील ओवी क्रमांक १७९४ ते १८०२ या ९ ओव्या पसायदान म्हणून ओळखल्या जातात. त्या ओव्या व त्यांचा आध्यात्मिक आशय पुढील प्रमाणे,
आता विश्वात्मके देवे, येणे वाङयज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ।
गद्य - हे विश्वात्मक देवा, आता हा वाङयज्ञ पूर्ण झाल्यामुळे आपण संतोष पावून मला प्रसादाचे दान द्यावे.
सर्व विश्व हेच माझे घर आहे नव्हे तर आपणच सर्व विश्व जो झाला आहे, अशा आत्मानुभूतीने संपन्न ज्ञानेश्वर महाराज ही विनम्र विनंती करीत आहेत. यज्ञ म्हणजे निष्काम भावाने केलेले कर्म अशी व्याख्या गीतेने केली आहे. गीतेवरील टिका लेखन म्हणजे ज्ञानेश्वरी! हा वाङमय यज्ञ आहे, असे ते म्हणतात. या यज्ञाने प्रसन्न होऊन विश्वात्मक देवाने प्रसाद द्यावा, असे त्यांचे मागणे आहे. हा देव कोणत्याही धर्म, पंथ वा संप्रदायाचा नसून सर्व विश्व ज्या शक्तीने निर्माण झाले आहे, ती शक्ती होय. त्यास माणूस निरनिराळी नाव देऊन अहंअहंमीकेने भेदभाव करत असतो. ज्ञानेश्वर त्याला सर्व धर्मातीत देव, या अर्थाने विश्वदेव म्हणून संबोधतात.
कोणत्या प्रसादाचे दान, तर...
जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे ।
गद्य - खलांचा वाकडेपणा निघून जावो, त्यांना सत्कर्मात आवड निर्माण होवो व त्यामुळे जीवांची आपापसात मैत्री होवो.
खल म्हणजे कुकर्मी, दुष्ट व्यंकटी म्हणजे वाकडेपणा! सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण सुटावे, असे मागणे मागितले आहे. त्यामुळे सत्कर्माची आवड उत्पन्न होईल. असे झाले म्हणजे कोणीच कोणाचे शत्रु राहणार नाहीत आणि सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीचा व्यवहार होईल. मनुष्याच्या प्रवृत्तीला व कर्माला तो स्वतःच जबाबदार आहे, सुसंगतीने त्याने सत्कर्माला लागून स्वतःच स्वतःचा उद्धार करायचा आहे, असे ज्ञानेश्वर महाराज येथे सुचवतात.
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ।
गद्य - दुष्टांच्या मनातील अंधार नष्ट होवून त्या उजेडात स्वधर्म प्रकाशित होवो. असे झाल्यास त्यांच्या ज्या ज्या ईच्छा असतील त्या त्या पूर्ण होवो.
दुरित म्हणजे दुष्ट, पापी, तिमिर म्हणजे अंधार अथवा अज्ञान! ज्ञानाला प्रकाशाची तर अज्ञानाला अंधाराची उपमा दिली जाते. अज्ञानातून पाप घडत असते म्हणून पापी जनांचे अज्ञान दूर होवो. त्यामुळे ते दुष्ट, सुष्ट म्हणजे सज्जन होतील व मगच सर्व प्राण्यांना ज्याला जे जे हवे असेल ते मिळो, असे मागणे आहे.
पाप म्हणजे पतन प्राप्त करणे अथवा आहे त्या अवस्थेपासून ढळणे होय. सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या कमी-अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. रज, तम च्या जोराने काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे वृत्तीरुपशत्रू बलवान होतात व मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. सत्व गुणांमुळे मानव सात्विक राहून, त्याचा सात्विक भाव जागृत होईल व आत्म उघ्दाराचा मार्ग मोकळा होईल. या स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वांना पाहिजे ते मिळो, असे ज्ञानेश्वर म्हणतात. अधर्माचे उच्चाटन व धर्माची स्थापना, ती हिच!
वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ।
गद्य - या भूमंडलावर संपूर्ण मांगल्याचा अखंड वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा समूह सर्व प्राण्यांना भेटो.
श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचे समाज अनुकरण करतो. त्याच्या वागण्यातून सामान्यांना धर्म कळतो. त्याच्या हृदयातील ज्ञानदिपाच्या प्रकाशात योग्य मार्ग दिसतो. ईश्वरनिष्ठ आपल्या आत्मज्ञानाने पूर्णतया मुक्त झालेला असतो, पण समाज हिताकरता त्याने कर्मत्याग न करता लोकसंग्रह करीत समाजाचा एक घटक म्हणून जगले पाहिजे. गीतेची हीच शिकवण आहे. समाजातील सर्वांचेच आचरण शुद्ध झाले पाहिजे, तरच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे मोठा समूह तयार होईल. हे श्री ज्ञानदेवांचे मागणे आहे. आत्मतत्त्ववाचे अवतरण, ते हेच!
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव, पीयूषांचे ।
गद्य - चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचे, चैतन्यपूर्ण चिंतामणीचे गाव आणि अमृताचा बोलणारा समुद्र या भूमंडळी असावा.
ईश्वर निष्ठांचे वर्णन करण्यासाठी येथे ज्ञानेश्वरांनी तीन काव्यमय उपमा दिल्या आहेत. जे चालणारे कल्पतरूंचे बगीचे आहेत, सजीव अशा चिंतामणीचे गाव आहे आणि अमृताचा बोलणारा समुद्र आहे.
चल म्हणजे चालणारा. कल्पतरू म्हणजे जे मागाल ते देणारे वृक्ष, पण त्याच्याकडे आपल्याला जावे लागते. तर सज्जन मात्र कल्पतरू आहेतच, शिवाय तेच स्वतःच तुमच्याकडे येतात. शिवाय ते कल्पतरू प्रमाणे एकच नाहीत, तर त्यांची बागच आहे. चिंतामणी म्हणजे जे चिंताल ते देणारा. ईश्वरनिष्ठही जे चिंताल ते देतात, करून दाखवतात म्हणून ते चिंतामणी आहेत. शिवाय ते सजीव असल्याने देताना योग्य व अयोग्य याचा विवेक बाळगतात आणि चिंतामणी रत्नाप्रमाणे ते दुर्मिळ नाहीत, तर त्यांचे समूह म्हणजे गाव आहे. अमृताचा एक थेंब अमरत्व देतो, ईश्वरनिष्ठ हे अमृताचा बोलणारा सागर आहेत म्हणून ते साऱ्या समाजाला प्रबोधन करून अमर करू शकतात.
चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे होतु ।
गद्य - इथे डाग रहित चंद्र, उष्णता रहित सूर्य असे सज्जन सर्वांचे सदासाठी नातेवाईक होवोत.
येथे सज्जनांची तुलना चंद्र आणि सूर्याशी केली आहे. जे डाग नसलेले चंद्र आहेत, उष्णता नसलेले सूर्य आहेत, असे सज्जन सर्वांचे सोयरे, नातेवाईक होवोत अशी प्रार्थना ते करतात. सज्जन चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. चंद्र प्रकाशाचा वर्षाव करून रात्रीचा अंधार नाहीसा करतो, तसेच संत ज्ञानाचा प्रसार करून पाप्यांचा अंधार नाहीसा करतात व मंगलतेचा वर्षाव करतात. चंद्रावर डाग आहेत, पण सज्जनाचे चारित्र्य निर्मल आहे, ते दोषरहित आहेत.
सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो, पण तो दाहक आहे, सज्जन ज्ञानाचा प्रकाश देतात पण ते दाहक नाहीत, क्रोधी, कपटी वा द्वेष्टे नाहीत. अशाप्रकारे गीतेतील तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप असे जे सज्जन, त्यांचे श्रेष्ठत्व श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात.
किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरुखी, अखंडित ।
गद्य - अशा प्रकारे जीव या तिन्ही लोकात पूर्णपणे सर्वसुखी होवून आदिपुरुषाचा अखंड भक्त व्हावा.
स्वर्ग, नरक आणि भूः या तिन्ही लोकातील सर्वांनी सर्व प्रकारे सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाशी अखंडित जोडले जावे, अशी प्रार्थना ज्ञानेश्वर करतात.
हे तिन्ही लोक भौगोलिक स्थाने नसून जीवात्म्याच्या दृश्य व अदृश्य अवस्था आहेत. भूलोकी जीवात्मा शरीर धारण करून व्यक्त होतो. जड चक्षूंना म्हणजेच डोळ्यांना तो दिसतो. आपापल्या सृष्ट व दुष्ट कर्म गतीमुळे मृत्यूनंतर जीवात्मा अनुक्रमे स्वर्ग व नरक या अवस्थेत असतो. ज्यांचे ज्ञानचक्षू उघडले आहेत, अशांना ते दिसतात. या तिन्ही लोकातील सर्वांना उत्तम गती मिळून ते आत्मतत्त्वाशी जोडले जावेत, त्यांना आत्मानुभूती व्हावी अशी मागणी ज्ञानेश्वर महाराज इथे करतात.
दुष्टांची दुर्बुद्धी नाहीशी होऊन त्यांना सत्कर्मात आवड उत्पन्न होवो, पाप्यांच्या मनातील अज्ञान नाहीसे होऊन स्वधर्माचा सूर्योदय होवो, ईश्वर निष्ठांचे समूह मांगल्याचा वर्षाव करोत, चारित्र्यवान पुरुष सर्व प्राणिमात्रांचे सोयरे होवोत व अशा सज्जनांची संख्याही वाढो, असे आदर्श समाजचित्र ज्ञानेश्वरांना दिसत आहे. समाजातील सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय सर्वजन सुखी होणार नाहीत. या आदिपुरुषाशी सर्वजण जोडले जावेत, हेच त्याचे पसायदान आहे.
आता विशेष लोकांसाठी ज्ञानेश्वर महाराज दान मागत आहेत.
आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीं इये, दृष्टादृष्ट विजयें, होआवें जी ।
गद्य - आता ग्रंथोपजीवी असे विशेष लोक, दृष्ट आणि अदृष्ट अशा दोन्हींवरती विजयी होवोत.
ग्रंथोपजीवी म्हणजे ग्रंथ हेच ज्यांच्या जीवीकेचे म्हणजे चरितार्थाचे साधना आहे, अशा लोकांना ज्ञानेश्वर विशेष असे संबोधतात. सामान्य मनुष्य जे ऐकतो, अनुभवतो तेवढेच त्याला ज्ञान होत असते, परंतु ज्यांना ग्रंथ म्हणजे पुस्तके वाचता येतात त्यांच्याकडे अगाध ज्ञान असते. व्याख्यान, किर्तन, वादविवाद, इत्यादींमध्ये ही माणसे अग्रेसर असतात. परंतु ग्रंथांमध्ये लिहिलेले ज्ञान, त्यांनी अनुभवले असेलच, असे नाही. अशा व्यक्तींना माहिती तर खूप असते म्हणजे ते दृष्ट आहेत परंतु ही माहिती अनुभवजन्य नसल्यामुळे त्यांना याचे ज्ञान नाही. अध्यात्म हा तर इंद्रियांचा विषय नाही, हे जग आपल्या डोळ्यांना आकलन होणारे नाही म्हणून हे जग अदृष्ट आहे. तेथे अनुभवच पाहिजे. म्हणून या विशेष लोकांना दृष्ट आणि अदृष्ट अशा दोन्ही जगांचा अनुभव येवो, दोन्ही जगांवर ते विजयी होवोत, अशी मागणी ज्ञानेश्वर महाराज करत आहेत.
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ।
गद्य - तेंव्हा विश्वेश्वर म्हणाले “या प्रसादाचे दान मिळेल.” या वरामुळे ज्ञानेश्वर संतुष्ट झाले.
ही ग्रंथरचना करताना ज्ञानेश्वरांनी गीतेतील ज्ञान-विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला होता. या मराठी भाषेतील ग्रंथामार्फत ब्रह्मविद्या सर्वांपर्यंत पोहोचावी, मन एकाग्र करून या ग्रंथाचे वाचन, श्रवण, मनन व चिंतन करावे आणि त्याप्रमाणे आचरण ठेवून त्यांनी सुखी व्हावे, अशी इच्छा ज्ञानेश्वरांची होती. आता तर प्रत्यक्ष विश्वात्मक देव, विश्वेश्वर यांनीच वर दिल्यामुळे वाङयज्ञाचा उद्देश पूर्ण झाला, म्हणून ज्ञानेश्वरांना संतोष झाला.