सदस्य:Sonali yogiraj/एनर्कॉन

(धूळपाटी/एनार्कोन या पानावरून पुनर्निर्देशित)

“महाराष्ट्र हा कृष्णपाषाणदेही” माधव जूलियन गातात, “तरी लोहपाणीहि अंगात या । नद्या सेविती तापि, कृष्णा नि गोदा, भिमा, मांजरा, वैनगंगा तया।”. या नद्यांवर महाराष्ट्राने अपरंपार प्रेम केले आहे. ह्यातल्या गोदा, भीमा, कृष्णा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून उगम पावतात, त्या उगमस्थानांपाशी त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि महाबळेश्वरांचे अधिष्ठान मांडून, तिथे देवराया राखून जपले आहे.  नव्या जमान्यात आपण गुप्तभीमेच्या देवराईच्या आसमंतात भीमाशंकर अभयारण्य घोषित केले आहे, महाबळेश्वर-पांचगणी परिसरात ईकोसेन्सिटिव्ह झोन घोषित केला आहे.

ह्यातला भीमाशंकर अभयारण्याच्या दक्षिणेचा पट्टा एनर्कॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमुळे गाजतो आहे. गोव्यातील काही खाणी अभयारण्यांवर, राष्ट्रीय उद्यानांवर अतिक्रमण करत आहेत, इतर अनेक अशा संरक्षित क्षेत्रांच्या अगदी नजीक नासधूस करत आहेत अशी जाणीव निर्माण झाल्यावर २००२ साली भारतीय वन्य जीव मंडळाने सर्व संरक्षित क्षेत्रांच्या दहा किलोमीटर परिघात संवेदनशील परिसरक्षेत्राची आखणी करावी असा ठराव मंजूर केला. संपूर्ण पश्‍चिम घाटभर वन विभागांनी न्यायालये वरचेवर बजावत असतानाही २०१० पर्यंत काहीही कारवाई सुरू केली नाही. ह्यामागे काय हितसंबंध असावेत हे भीमाशंकर अभयारण्याच्या आसमंतात जे काय घडले त्या वरून दिसून येते. हा परिसर आपल्या शेकरू या राज्यपशूसाठी प्रसिद्ध आहे. तिथल्या वनराजीत आढळणाऱ्या Heterophragma quadriloculare या वृक्षाच्या चिरांच्यात Xylocopa tranquebarica हा रात्रीच्या अतिशय मंद प्रकाशातही रंग ओळखू शकणारा भुंगा सापडतो.  इथे विशेषतः पावसाळ्यात अनेक औषधी वनस्पती उगवतात.  २००८ साली या टापूत पवनचक्क्या उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

अतुल काळे या तरुण पत्रकाराच्या आणि त्याचे वडील डि.के. काळे यांच्या खटाटोपाइतून पघापतग चे लक्ष या प्रकल्पाकडे वेधले गेले. त्यांच्या गावाचे पवनचक्कीने बरेच नुकसान झाले होते आणि त्यांनी माहिती हक्क कायद्याच्या आधारे प्रकल्पाबद्दल माहिती मिळवली होती. माझी पघापतग  वरील सहकारी रेने बोरजेस ह्या परिसराशी परिचित होती आणि तिने प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्पातील अनेक दोष उघडकीला आणले होते.  मी १४ एप्रिल २०११ला तिथे गेलो असता वनविभागाच्या रक्षकाने आम्हाला एका फाटकापाशी थांबवले. अशा रीतीने वाहतूक थांबवणे हे पूर्णपणे बेकायदेशीर होते. जेव्हा मी अधिकृत भेट देण्यास आलो आहे हे त्या वनरक्षकाच्या ध्यानात आले, तेव्हा त्याने आमची गाडी पुढे जाऊ दिली. परंतु १०० मीटर आत एक बुलडोझर रस्ता अडवून थांबवला होता. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने बुलडोझर काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बंद पडला आहे आणि हलवता येणार नाही अशी लंगडी सबब मला सांगितली. पण मला रोखण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आणि त्यांनी बेकायदेशीरपणे हाकलून देण्याच्या आधी धनगर गवळ्यांच्या गुरांनी पाडलेल्या पायवाटेने मी त्या चढावरून भराभर चढून गेलो. वाटेवर रस्ता अतिशय निष्काळजीपणे बांधल्यामुळे झालेळी अनेक छोटी भूस्खलने दिसत होती. या दरडी कोसळल्याने खालच्या गावांचे निरनिराळ्या प्रकारे नुकसान झाले होते. तो राडारोडा त्यांच्या शेतांवर पसरला होता आणि त्यांचे शेतीच्या पाणी पुरवठ्याचे आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले होते. त्यापुढे या भूस्खलनांतून भीमा भामा धरणांच्यात जास्त झपाट्याने गाळ साचू लागला होता.

ह्याबाबत तिथल्या फॉरेस्ट रेंजरने प्रामाणिकपणे अहवाल देताना खालील मुद्दे मांडले: [१] हा चाकण वनक्षेत्रातील सदाहरित वनाच्छादित टापू आहे. [२] भीमाशंकर अभयारण्यातील व ह्या वनांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते, [३] पवनचक्क्या आल्यास वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान व आढळ ह्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. येथे दुर्मिळ शेकरू खार, लांडगा, कोल्हा, तरस, मोर, बिबट्या आढळतात. [४] प्रकल्पांतर्गत रस्त्यांमुळे पर्यटकांची ये-जा वाढल्यास सदाहरित जंगलास हानी पोचण्याची शक्यता आहे. हा अहवाल ताबडतोब दडपण्यात आला व अरण्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथे सदाहरित वन नाही, काहीही महत्वाचे वन्य जीव नाहीत असे धादांत खोटे-नाटे निवेदन करत पवनचक्क्यांना परवानगी दिली. मी मुद्दाम चार दिवस तेथील एका प्राथमिक शाळेत राहून पहाणी केली, तेव्हा फॉरेस्ट रेंजरांनी दिलेली माहिती पूर्णपणे खरी होती हे स्पष्ट झाले. वर हेही दिसले की जो वनविभाग महाबळेश्वरला संरक्षित क्षेत्राच्या सबबीवर असहाय्य खेडुतांच्या गावांचे दळण-वळण तोडत आहे, तोच वनविभाग इथे पवन चक्क्यांसाठी घनदाट राखीव जंगल बेधडक तोडून रस्ते बनवून देतोय! ह्या पवनचक्क्यांसाठी निष्काळजीपणे बांधलेल्या रस्त्यांनी दरडी कोसळताहेत, गाळाने ओढे, नदी-नाले-धरणे भरताहेत, शेतीची नासाडी होते आहे.[१]

संदर्भ

  1. ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-06-23 रोजी पाहिले.