द्विनोंदी पद्धत (वाणिज्य)

आधुनिक पुस्तपालनाच्या संकेताप्रमाणे द्विनोंदी पद्धतीने लेखा लिहिले जातात.इटलीमधील व्यापारी गणितज्ञ आणि तत्वज्ञ असणारा ल्युका डी बर्गो पासीअलो यांच्याकडे १४९४ मध्ये द्विनोंदी पद्धत विकसित करण्याचे श्रेय जाते. लिओनार्डो दा विन्ची चा वर्गमित्र असणाऱ्या लुका ने आपल्या "समा डी अरीथमेटिका" या १४९४ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात या पद्धतीची माहिती दिली आहे.[१]

कुठल्याही व्यवहाराला किमान दोन बाजू असतात या साध्या तत्वावर द्विनोंदी पद्धत आधारित आहे. प्रत्येक व्यवहारात किमान दोन लेखे अंतर्भूत असतात. देणारा आणि घेणारा, संपत्ती किंवा देयता, उत्पन्न किंवा खर्च या प्रकारच्या लेख्यांमधेच एखादा व्यवहार होत असतो. जेव्हा एखाद्या लेख्यात जमा होते तेव्हा दुसऱ्या लेख्यात तेवढीच रक्कम नावे होते.

लेखापुस्तकात व्यवहाराची नोंद एका खात्यास नावे करणे आणि दुसऱ्यास जमा करणे म्हणजेच द्विनोंदी पद्धत होय.

व्याख्यासंपादन करा

द्विनोंदी पद्धतीनुसार नोंदी करताना असे आढळते की प्रत्येक व्यवहाराचे दोन प्रभाव होत असतात जो लेखा फायदा प्राप्त करतो तो जमा होतो आणि जो फायदा देतो त्या लेख्याला नावे केले जाते - विल्यम पिकल्स

प्रत्येक व्यापारी व्यवहाराचे दोन विरुद्ध बाजूंवर परिणाम होतात. अशा व्यवहारांच्या नोंदी करायच्या झाल्यास एका लेख्याच्या नावे बाजूवर आणि दुसऱ्या लेख्याचा जमा बाजूवर करणे आवश्यक असते असे दोन परिणाम करणारे व्यवहार द्विनोंदी पद्धतीस जन्म देतात - जे आर बाटलीबॉय

मुलतत्वेसंपादन करा

१) प्रत्येक व्यवहाराला किमान दोन पक्ष असतात.

२) दोन पक्षात दोन लेखांचा समावेश असतो.

३) दोन लेख्यांपैकी एक लाभ देणारा तर दुसरा लाभ घेणारा असतो.

४) एक लेख नावे होतो आणि दुसरा लेखा जमा होतो. दोन्ही ठिकाणी समान रक्कम असते. म्हणजेच कुठल्याही क्षणी पुस्तांमध्ये जमा आणि नावे असणारी रक्कम समान असते.

फायदेसंपादन करा

१) अचूकता - दोन्ही बाजूना, म्हणजेच जमा आणि नावे असा समान परिणाम होत असल्याने द्विनोंदी पद्धत जास्ती अचूक मानली जाते. गणितीय अचूकता सिद्ध करण्यासाठी तेरीज पत्रक या सारखा ताळा करता येतो.

२) व्यावसायिक निष्कर्ष - द्विनोंदी पद्धतीचा वापर करून व्यवसायाचा नफा, तोटा, उत्पन्न, खर्च , देयता, संपत्ती अशा अनेक गोष्टींची माहिती समजते. व्यवसायाची आर्थिक परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो.

३) परिपूर्ण नोंद - व्यवहारांची नोंद परिपूर्ण ठेवली जाते.

४) तुलनात्मक अभ्यास करणे सोपे जाते.

५) सर्वमान्यता - शासकीय तसेच इतर व्यापारी संघटना या पद्धतीस मान्यता देतात.

संदर्भसंपादन करा

  1. ^ http://www.encyclopedia.com/social-sciences-and-law/economics-business-and-labor/businesses-and-occupations/accounting