दारात उभे राहून वास्तूचे रक्षण करणारे ते द्वारपाल होत. हे देव सदृश्य योनीतील मानले जातात. मोठ्या देवळांमध्ये आणि प्राचीन लेण्यांमध्येही असे द्वारपाल आढळतात. चंड-प्रचंड, जय-विजय, हराभद्र-सुभद्र, पद्मपाणी-वज्रपाणी अशी त्यांची नावे आहेत. शिल्पसंग्रह या ग्रंथात यांचे वर्णन दिलेले आढळते. द्वारपाल हे दोन हातांचे, गदाधारी, असतात. त्यांचे दात पुढे आलेले असतात. चेहरा कुरूप असतो. कमरेचा खालचा भाग किंचित वाकलेला असतो. शंकर किंवा विष्णू यांच्या मंदिराचे जे द्वारपाल असतात त्यांच्या हातात त्या देवतांची आयुधेही दिसतात. कर्नाटकातील हळेबीड, बेलूर येथील मंदिरांचे द्वारपाल वैशिष्ट्य पूर्ण आहेत.[१]

विष्णूचे द्वारपाल संपादन

खुप जणांना माहित असलेले जय विजय हे विष्णू देवतेचे खरेतर द्वारपाल पण विष्णूला हे दोनच प्रतिहार नसतात तर अशा (द्वारपाल) संख्या 8 आहे.

त्यांची नावे :चंड, प्रचंड, जय ,विजय, धाता, विधाता, भद्र व सुभद्र.

मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने यांना वामनाकार बनवावे असे सांगितलेले असून मंदिरात विष्णूच्या आयतन योजनेनुसार प्रत्येकाचे स्थान असते. जसे की पुर्वेला चंड प्रचंड. पश्चिमेला धाता विधाता, दक्षिणेस जय विजय व उत्तरेस भद्र सुभद्राची जागा असते. विष्णूची जी आयुध असतात तीच द्वारपालांकडे असतात म्हणून काहींना ती मूर्ती विष्णूची वाटते पण कधीही त्रिभंग अवस्थेतील व दरवाजाबाहेरील मूर्ती ही देवता नसून द्वारपालच समजावी.

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा