महाराष्ट्रातील दहा बारा जिल्ह्यात मिळून एकूण दोनशे ते सव्वादोनशे किल्ले आहेत. त्यांपैकी बरेचसे डोंगरावरचे गिरिदुर्ग, काही समुद्रावरचे सागरी किल्ले आणि काही जमिनीवरचे भुईकोट किल्ले आहेत. काही किल्ल्यांची व्यवस्था भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आहे. असे असले तरी या किल्ल्यांतील अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील असे किल्ले बऱ्या अवस्थेत आहेत. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वेच्छेने व स्वयंसेवक वृत्तीने अंगमेहनत करणाऱ्या तरुणांनी स्थापिलेल्या ३५हून अधिक दुर्ग संवर्धक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांचा एक महासंघदेखील आहे. मिलिंद मधुसूदन क्षीरसागर हे या महासंघाचे सध्याचे (२०१३सालातील) अध्यक्ष असून राजेंद्र टिपरे हे सचिव आहेत.

हा दुर्ग संवर्धक महासंघ आपल्या कार्यकर्त्यांचे अधूनमधून संमेलन भरवितो. २७-२८ जुलै२०१३ या दिवशी त्यांचे पुणे शहरात दोन दिवस चालणारे दुसरे संमेलन भरले होते. या संमेलनात ४५ दुर्ग संवर्धक संघांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. औरंगबाद उपवन संरक्षक अजित भोसले, रत्‍नागिरीच्या पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक भालचंद्र कुलकर्णी, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाचे संशोधक सचिन जोशी, डॉ. राहुल मुंगीकर, डॉ. विजय देव, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, प्रमोद मांडे, महेश तेंडुलकर आदींनी संमेलनात मार्गदर्शन केले. संमेलनाची स्मरणिकाही प्रकाशित होणार आहे. या संमेलनात किल्ले वसई मोहिमेचे श्रीदत्त राऊत यांना ’हिराजी इंदलकर दुर्ग संवर्धक पुरस्कार’ देण्यात आला.[ संदर्भ हवा ]

दुर्ग संवर्धक महासंघातर्फे राज्यांतील किल्ल्यांवर विविध संस्थांतर्फे केल्या जाणाऱ्या कामाबद्दल एक माहितीपट बनविला जात आहे.