दी सेकंड वेव्ह: ए रीडर इन फेमिनिस्ट थियरी

लिंडा निकोल्सन यांनी सदर पुस्तक संपादित केलेले असून १९९७ मध्ये ते प्रकाशित झाले होते. विविध तज्ञांचे लेख यामध्ये समविष्ट असून स्त्रीवादी चळवळी मधून स्त्रीवादी सिद्धांकन कसे निर्माण झाले याचा सविस्तर ऐतिहासिक आढावा यामध्ये घेतला आहे.

प्रस्तावना संपादन

बदलत्या काळानुसार झालेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक संदर्भातील बदलांच्या अनुषंगाने स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये देखील बदल झाले. १९६० च्या दशकात उदयाला आलेल्या स्त्रीवादाच्या दुस-या लाटेमध्ये स्त्रीवादी सिद्धांकनाच्या क्षेत्रात मोठी भर पडू लागली. स्त्रीवादी चळवळी सोबत जोडलेल्या स्त्रीवादी विचारवंतानी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर विस्तृत मांडणी करण्यास सुरुवात केली. Linda Nicholson यांनी संपादित केलेल्या सदर पुस्तकामध्ये स्त्रीवादी सिद्धांकनावर आधारित अनेक महत्त्वाच्या लेखांचा समावेश केला आहे. स्त्रीवादी विचारसरणीमध्ये यांचे महत्त्वाचे योगदान असून स्त्रीवादी इतिहासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांची निर्मिती झाली असल्याने स्त्रीवादी सिद्धांतामध्ये ऐतिहासिक संदर्भातसुद्धा त्यांची दखल घेण्याची आवश्यकता आहे. स्त्रीवाद आणि मार्क्सवाद यांच्यातील गुंतागुंतीचे आंतरसंबंध स्त्रीवादाच्या दुस-या लाटेचा “gynocentric turn”, स्त्रिया-स्त्रियांमधील भिन्न्त्वाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण असे विविध विषय या पुस्तकात एकत्र करण्यात आले आहेत.

स्त्रीवादी चळवळी आणि स्त्रीवादी सिद्धांकन संपादन

प्रारंभी ‘स्त्रीवादाची दुसरी लाट’ या संकल्पनेची चिकित्सा करताना लेखिका नमूद करतात, की स्त्रीवादी सिद्धांकन निर्मितीचा ऐतिहासिक आढाव घेण्यासाठी १९६० च्या दशकामध्ये आणि त्यानंतरच्या काळात घडलेल्या चळवळींमधील राजकीय बदलांचा संदर्भ घेणे अनिवार्य ठरते. त्या काळामध्ये लिंगभाव या संकल्पनेची खाजगी व सार्वजनिक जीवन या दैवतांच्या पलीकडे जाऊन चिकित्सा करण्याची गरज असल्याचे मांडले जाऊ लागले. याची सुरुवात १९६० च्या दशकात US मध्ये झालेल्या दोन चळवळींमधून झाली. या पुस्तकाचे महत्त्वाचे योगदान हे देखील आहे, की स्त्रियांच्या हक्कांची चळवळ आणि स्त्री-मुक्तीची चळवळ यांच्यातील विभागणी करून मांडणी केली आहे. ६० च्या दशकाच्या सुरुवातीला स्त्रियांच्या हक्कांची चळवळ सुरू झाली. ज्यामध्ये वेतनासाठी काम करणा-या स्त्रियांनी कामाच्या मूल्यामध्ये होणा-या शोषणाविरुद्ध आवाज उठवत राज्यसंस्थेकडे कामगार म्हणून स्त्रियांच्या हक्कांची मागणी केली. अनेक मध्यमवर्गीय गृहिणी या चळवळीमधून होणा-या मर्यादित मागण्यांसंदर्भात असमाधानी होत्या. ६० च्या दशकाच्या शेवटी डाव्या विचारसरणीने प्रेरित अशी स्त्री-मुक्तीची चळवळ उभी राहिली. स्त्रीवादाच्या दुस-या लाटेमध्ये सिद्धांकनाच्या पातळीवर जी ज्ञाननिर्मिती झाली ती बहुतांशी या चळवळींच्या माध्यमातून. स्त्रियांच्या शोषणाची मूळ कारणे हा विषय तत्कालीन स्त्रीवादी सिद्धांकनाच्या केंद्रस्थानी होता.

मार्क्सवाद आणि स्त्रीवादी सिद्धांकनातील आंतरसंबंध संपादन

अनेक काळापासून होणारे स्त्रियांचे शोषण, त्यामागील सामाजिक करणे आणि विविध समाजांमध्ये त्याचे बदलत जाणारे स्वरूप याही चिकित्सा स्त्रीवाद्यांनी करण्यास सुरुवात केली. तत्कालीन स्त्रीवादी हे डाव्या विचारसरणीमधून पुढे आले असल्याने त्यांना स्वतःचे सिद्धांत आणि मार्क्सवादासोबत त्यांचे आंतरसंबंध मांडणे निकडीचे झाले. प्रारंभीच्या जहाल स्त्रीवादी सिद्धांतामधून प्रस्तापित करण्यात आले होते, की शोषणाच्या इतर प्रकारांपेक्षा स्त्रियांचे होणारे शोषण हे खूप जुने आणि प्राथमिक आहे. त्यामुळे मार्क्सवादातील शोषणाचे जे सिद्धांत आहे त्यापेक्षा वेगळे आणि विस्तृत असे विश्लेषण करणे स्त्रीवादी सिद्धांतासाठी गरजेचे आहे. पुस्तकातील काही लेखांमधून मार्क्सवाद आणि स्त्रीवाद यांच्या संदर्भात श्रमाचे उत्पादन, पुनरुत्पादन, त्यातून स्त्रियांचे होणारे शोषण या अनुषंगाने चर्चा केली आहे. दुस-या लाटेतील स्त्रीवाद्यांचे महत्त्वाचे काम म्हणजे स्त्रियांच्या होणा-या शोषणाची मांडणी ही मार्क्सवादाला प्रतिसाद म्हणून करण्यात आली; तसेच महत्त्वाचे म्हणजे लिंगभावाची चर्चा ही अधिक गुंतागुंतीची होऊ लागली. ७० च्या दशकामध्ये दोन परस्परविरुद्ध विचार रूढ होऊ लागले. एक म्हणजे स्त्रिया व पुरुषांमधील फरक हे नैर्सगिकरित्याच खोलवर रुजलेले आहेत. दुसरे म्हणजे प्रत्यक्षात स्त्रिया आणि पुरुष सारखे असतात. भिन्नत्व या संकल्पनेची चिकित्सा स्त्रीवाद्यांनी करण्यास सुरुवात केली. स्त्रियांचे म्हणून जे प्रचलित गुणधर्म समजले जातात त्यावर आधारित नेहमी स्त्री-पुरुषांमधील फरक सांगितला जातो. स्त्रीवादी सिद्धांताच्या या टप्प्याला “gynocentric feminism” असे म्हटले गेले. Difference किंवा “geocentric feminism” या संदर्भातील ज्या विरुद्ध मांडणी करण्यात आल्या ते स्त्रीवादी सिद्धांतासाठी मोलाचे ठरले. Mac Cannon, Chodorow, Gilligan या स्त्रीवाद्यांच्या लेखनातून वरील विषय सविस्तरपणे मांडला गेला. गो-या स्त्रियांचे अनुभव हे सर्व स्त्रियांना लागू करणे, गो-या स्त्रियांचे अनुभव हे वर्णवादाने युक्त नसतात असे गृहीत धरणे याला तत्कालीन सैधांतिक मांडणीतून आव्हान दिले गेले. Judith Butler, Monique Wittig, Elsa Brown यांनी त्यांच्या अभ्यासातून भिन्नत्व या संकल्पनेची सैधांतिक मांडणी केली आहे.

Early Statements संपादन

पुस्तकामध्ये पाच विभाग असून प्रत्येकात दुस-या लाटेतील स्त्रीवादी सिद्धांत निर्माण करणारे लेख हे इतिहासाच्या बदलत्या टप्प्यानुसार समाविष्ट करण्यात आले आहेत. Early Statements या पहिल्या विभागामध्ये लिंगभाव आणि स्त्रियांचे शोषण याबद्दल झालेल्या प्राथमिक अभ्यासाचा समावेश आहे ज्यातून स्त्रीवादी चळवळ आणि सिद्धांत या दोन्हींच्या अनुषंगाने मांडणी केली आहे. पहिले प्रकरण सिमोन-दे-बोव्हा लिखित 'सेकंड सेक्स' (१९५३) या पुस्तकाची प्रस्तावना असून त्यामध्ये स्त्रियांचे एक सामाजिक समूह म्हणून शोषण कसे होते आणि हे शोषण ऐतिहासिक कसे आहे हे दाखवून दिले आहे. लेखिका उल्लेख करतात की, स्त्रिया व पुरुषांमधील जो शारीरिक भेद आहे त्यामुळे पुरुषांना स्वतःला 'कर्ते' म्हणवून घेण्याची संधी मिळते आणि स्त्रियांना 'इतर' म्हणून वागवले जाते. शारीरिक भेदावरून होणारे शोषण हे लिंगभावाचे निकष निश्चित करतात. दुसरे प्रकरण हे शुलामीथ फायरस्टोन यांचे 'द डायलेक्टीक ऑफ सेक्स' (१९७०) यामधील आहे. मार्क्स आणि एंगल्स यांच्या मांडणीतून प्रेरणा घेऊन फायरस्टोन या स्त्रियांच्या शोषणाची करणे त्यांच्या जैविकतेमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात. स्त्री-पुरुषांमधील शारीरिक भेद, स्त्रिया करतात ते जैविक पुनरुत्पादन या सर्व बाबतीत स्त्रियांचे शोषण होते कारण मूल जन्माला घालण्याची त्यांची क्षमता ही प्रत्यक्षात त्यांना पुरुषांवर अवलंबून राहण्यास भाग पडते आणि पुरुषांना स्त्रियांचे शोषण करण्याचा अवकाश देखील मिळवून देते. तिसरे प्रकरण ही गेल रुबिन यांच्या 'द ट्राफिक इन वूमन' (१९७५) यावर आधारित असून नातेसंबंधांमध्ये स्त्रियांची देवाणघेवाण कशी होते व त्यातून लिंगभावाधारित शोधन कसे रुजलेले असते हे नमूद केले आहे. रुबिन यांनी मार्क्स, लेवी-स्त्राउस यांची मानववंशशास्त्र यावरील मांडणी आणि फ्रोईड व ल्याकन यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण यांची मांडणी हे सर्व एकात एक गुफ़लेले आहे. चौथे प्रकरण हे ‘The Combahee River Collectives – A Black Feminist Statement’ (१९७९) काळ्या स्त्रीवाद्यांनी केलेल्या त्यांच्या हक्कांच्या मागण्यांचे निवेदन आहे. गोऱ्या मध्यमवर्गीय स्त्रियांच्या चळवळीमधील मर्यादा दाखवून काळ्या स्त्रीवाद्यांनी अस्मितांचे राजकारण, वेगळेपणाच्या राजकारणाला नकार आणि लिंगभावाधारीत शोषणाचा मुद्दा हाताळताना वर्ग आणि वर्णवाद यांना दुर्लक्षित करणे हे शक्य नसल्याचे मांडले. वेंडी विलियम्स लिखित 'द इक्वालिटी क्रायसिस' हा लेख म्हणजे पहिल्या विभागातील शेवटचे प्रकरण असून त्याची निर्मिती स्त्रियांच्या हक्कांच्या चळवळीमधून झाली आहे. The Equality Crisis: Some Reflections of Culture, Courte and Feminism (१९८२) यामधून उदारमतवादी स्त्रीवाद्यांसमोर प्रारंभीच्या काळात काय आव्हाने उभी राहिली, त्यातून स्त्रियांच्या होणाऱ्या शोषणाचा प्रश्न कसा पुढे आणला गेला आहे हे मांडले आहे.

संदर्भ सूची संपादन

https://purpleprosearchive.wordpress.com/2008/07/25/reading-feminism/