खटला

(दिवाणी खटला या पानावरून पुनर्निर्देशित)

खटला म्हणजे फिर्याद किंवा फौजदारी कारवाई. या शब्दाचे सर्वसाधारण व्यवहारात पत्नी, धंदा, उदीम, परिवार, भांडण, तंटा यांसारखे अनेक अर्थ असले, तरी कायद्याच्या परिभाषेत फिर्याद किंवा फौजदारी कारवाई या अर्थाने त्याचा वापर साधारणत: करण्यात येतो.

कायदेशीर बाजू संपादन

गुन्हा करणाऱ्याविरुद्ध पोलीस किंवा लोक-अभियोक्ता व प्रसंगी खाजगी व्यक्तीही न्यायालयात खटला दाखल करू शकते. खटला न्यायालयात चालण्यापूर्वी तक्रारीसंबंधीची नोंद पोलीस ठाण्यात अथवा फौजदारी न्यायालयात करण्यात येते. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन फौजदारी न्यायालय आवाहन-पत्र किंवा अधिपत्र काढते. पोलीसही आरोपीला अधिपत्राच्या साहाय्याने पकडू शकतात. गुन्ह्याची चौकशी चालू असता आरोपीची जामिनावर सुटका होऊ शकते. साधारणत: प्राथमिक चौकशी करून न्यायालय आरोपीवर दोषारोप ठेवते किंवा त्यास आरोपमुक्त करते. जर दोषारोप ठेवण्यात आला, तर खटला रीतसर चालविण्यात येऊन आरोपीस दोषमुक्त करण्यात येते किंवा त्यास सजा देण्यात येते.[१]

सार्वजनिक किंवा नैतिक दुष्कृतीच्या खटल्यात साधारणत: तडजोडीला वाव नसतो. उदा., दंगा, खून, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांत आरोपीची किंवा फिर्यादीची इच्छा असली, तरी तडजोड होऊ शकत नाही. पण पोलीस किंवा लोक-अभियोक्ता खटला काढून घेऊ शकतो. मारामारीसारख्या एखाद्या खाजगी स्वरूपाच्या गंभीर नसलेल्या फिर्यादीत न्यायालयाच्या परवानगीने तडजोड होऊ शकते.

सार्वजनिक आणि नैतिक दुष्कृतीच्या खटल्यात आरोपी स्वतःच्या बचावाकरिता काही कारणांमुळे वकील देऊ शकला नाही, तर न्यायालय स्वतः एखाद्या वकिलाची नेमणूक त्याच्या बचावाकरिता करते. हेतू हा की, आरोपीला विधिज्ञाचे विधिसाह्य उपलब्ध व्हावे आणि त्याच्यावर अन्याय होऊ नये.

संदर्भ संपादन

  1. ^ "खटला". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-01-05 रोजी पाहिले.