दिनकर बाळू पाटील

भारतीय राजकारणी
(दिनकर बाळु पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)


दिनकर बाळू उपाख्य दि.बा. पाटील (जन्म : जासई-रायगड जिल्हा, १३ जानेवारी १९२६; - पनवेल, २४ जून २०१३) हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. बाळू गौरू पाटील हे त्यांचे वडील. ते शेतकरी आणि शिक्षक होते. दि.बा. पाटलांच्या आईचे नाव माधूबाई होते. २८ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवी मुंबई विमानतळाला "दि. बा. पाटील" यांचं नाव देण्याला होकार असल्याचं सांगितलं आहे.

शिक्षण

संपादन

दि.बा. पाटलांच्या वडिलांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावांत शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. असे असून दि.बा. पाटील यांचे शिक्षण खडतर परिस्थितीत झाले. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांचे बंधू आत्माराम बाळू पाटील यांनीदेखील दि.बां.च्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला.

पत्नी

संपादन

दि. बा. पाटलांच्या पत्नी ऊर्मिला या पनवेल येथील के.व्ही. कन्या विद्यालयात शिक्षिका होत्या.

राजकीय व सामाजिक कारकीर्द

संपादन

दि.बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे 5 वेळा आमदार,1 वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य ,महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार, पनवेल नगर परिषदेचे लोकनियुक्त पहिले अध्यक्ष, कुलाबा लोकल बोर्डचे सदस्य होते.महाराष्ट्राच्या सीमा लढ्यात त्यांनी 11 महिन्यांचा करावास भोगला. महाराष्ट्र विधान सभेत अनेक महत्वाच्या कायद्याच्या मसुदा मंजुरीसाठी त्यांचे महत्व पूर्ण योगदान होते.सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते.

दि.बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. “दिबा” उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरवी. शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्त्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही.

शेतकऱ्यांसाठीचे लढे

संपादन

आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळीत अष्टी किंवा चिरनेर येथे जे जोरदार लढे झाले त्या लढ्यासारखाच सिडकोविरोधातला शेतकऱ्यांचाच्या हिताचा लढा दि. बा. यांनी लढवला. जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला.

रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शेवटपर्यंत कष्टकऱ्यांसाठी लढले.

शिवसेनेत प्रवेश

संपादन

दि.बा. पाटील पुढे शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेना पक्षात आले. मात्र, नंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

दिबा पाटलांचे विचार

संपादन

दि. बा. पाटील देव मानत नसत.मात्र, अंधारात पडलेल्या आपल्या आगरी समाजासाठी काहीतरी करण्याच्या त्यांच्या ऊर्मीनेच आगरी समाज वाचला. त्यांचा कर्मकांडाला, अंधश्रद्धेला, आगरी समाजातल्या मोठमोठे साखरपुडे, दारू पिऊन हळदी यांसारख्या काही चालीरीतींना विरोध होता.

शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभर झटणारे नेते

संपादन

•    १९५७ – शे.का.प.चे मध्यवर्ती चिटणीस शे.का.प.च्या अनेक पदांवर कामे केली.

•    १९५७-१९६२,१९६२-१९६७,१९६७-१९७२,१९७२-१९७७,१९८०-१९८४ – असे पाच वेळा विधानसभेवर निवडून आले.

•    १९६०- पहिले हायस्कूल जासई गावात सुरू केले.त्यानंतर १० माध्यमिक शाळा सुरू केल्या.

•    १९६७ ते १९७२ -महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे अध्यक्ष.

•    १९७० – पनवेल वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय स्थापन केले.

•    १९७० पासून आजपर्यंत सिडको संग्राम चालूच आहे. १९८४चा सिडको लढा देशभर गाजला. प्रकल्पग्रस्तांना “साडेबारा टक्के"चा लाभ झाला. अजूनही जे.एन.पी.टी.चा लढा चालू आहे.

•    १९७२-१९७७- विधानसभेचे पक्ष प्रतोद. अंदाज समिती,लेखा समिती, उपविधान समिती, आश्वासन समिती आदि. समित्यांवर लक्षवेधी काम केले.

•    १९८२-८३- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.

•    १९७४- पनवेल नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले.

•    १९७५-च्या बेळगांव-कारावारसाठीच्या आंदोलनात ११ महिन्यांचा तुरुंगवास.

•    १९७७-१९८४-खासदार म्हणून २ वेळा निवडून आले.

•    १९९६ - महाराष्ट्र शासनाचा पहिला उत्कृष्ट वक्ता संसदीय पुरस्कार.

•    “आगरी दर्पण” मासिकाचे नियमित प्रकाशन सुरू केले.

•    म.फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे आग्रही प्रचारक.

•    आगरी कोळी कराडी अशा भुमीपुत्रांचे श्रद्धास्थान, मार्गदर्शक, लोकनेते.

• २०१३ - पनवेल येथे त्यांच्या राहत्या घरी २४ जून २०२३ रोजी निधन.

संदर्भ

संपादन