दिनकर धारणकर
दिनकर त्रिंबक धारणकर (जन्म : इ.स. १९३६; - सावंतवाडी, १३ फेब्रुवारी, इ.स. २०१४) हे सावंतवाडीत राहणारे एक मराठी नाट्यकर्मीं, साहित्यिक व ‘सत्य प्रकाश’ या साप्ताहिका’चे माजी संपादक होते.
धारणकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावंतवाडीत झाले. ते विज्ञान विषयातून बी.एस्सी झाले. सावंतवाडीतल्या वि.स. खांडेकर हायस्कूलमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. तत्पूर्वी दिनकर धारणकर यांनी राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्येही दोन वर्षे शिक्षक म्हणून काम केले होते. सायन्सचे विद्यार्थी असूनदेखील ते मराठी चांगले शिकवत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले होते. विद्यार्र्थिप्रिय शिक्षक होते.
वडिलांच्या निधनानंतर दिनकर धारणकरांनी वेलकम छापखान्याची व साप्ताहिक सत्यप्रकाशची धुरा सांभाळली. मख्याध्यापक संघाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. `सत्यप्रकाश’मध्ये त्यांनी लिहिलेली `झेलम एक्स्प्रेस’ ही मालिका गाजली. धारणकर यांनी सावंतवाडीत सामाजिक चळवळीतही सहभाग घेतला होता.
कुटुंब
संपादनदिनकर धारणकर हे `सत्यप्रकाश’चे आजचे (२०१५सालचे) संपादक हर्षवर्धन धारणकर व रोटरी क्लबचे सत्यजीत धारणकर यांचे वडील तर सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिक मीराताई जाधव यांचे बंधू होत.
नाट्यचळवळ
संपादनसावंतवाडी परिसरात नाट्यचळवळ रुजावी, यासाठी दिनकर धारणकरांनी इ.स. १९९५मध्ये ’नाटय़दर्शन’ या संस्थेची स्थापना केली. धारण्कर हे नाट्यशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. नाटकातील अनेक संवाद, गाणी त्यांच्या मुखोद्गत होती. नाटकावर त्यांचे प्रेम होते. नाट्यसंगीताबद्दलही त्यांना आस्था होती. त्यांनी सामाजिक व ऐतिहासिक नाटकांचे दिग्दर्शन आणि भूमिकाही केल्या होत्या. ल.मो. बांदेकर यांनी लिहिलेल्या `आर्यचाणक्य’ नाटकातील त्यांची `चाणक्य’ची भूमिका गाजली. राज्य नाटय़स्पर्धेत त्यांच्या या भूमिकेला रौप्यपदक मिळाले.
सत्कार
संपादन- इ.स. २०१३मध्ये सावंतवाडीत धारणकर यांचा नागरी सत्कार झाला होता.
- दिनकर धारणकर स्मृतिप्रित्यर्थ सावंतवाडी नगरपालिका आणि क्षितिज इव्हेंटतर्फे तीन दिवसांच्या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (१३,१४,१५-२-२०१५)