दालन:वैद्यकशास्त्र/वैद्यकशास्त्रज्ञ/5
चरक चरक (जन्म इ.स.पू. ३००) हे एक आयुर्वेदावरील प्रमुख योगदानकर्ते होते. भारतात पूर्वी त्यांचे नाव गाजत होते. त्यांचा उल्लेख कधी कधी शरीरशास्त्राचे पितामह म्हणून होतो. चरकाने संपूर्ण शरीरशास्त्राचा व मानवी अवयवांचा अभास केला. त्याने शरीरात दातांसह हाडांची संख्या ही ३६० सांगितली. हृदय म्हणजे एक पोकळी असते असे त्याचे चुकीचे अनुमान होते पण त्याने हृदयास नियंत्रण केंद्र मानले ते सर्वथा बरोबर होते. त्याने प्रतिपादन केले की, हृदय हे १३ मुख्य वाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीराशी जोडले आहे. याव्यतिरिक्त, तेथे न मोजता येण्याजोग्या वेगवेगळ्या आकाराच्या नसा आहेत. त्या उतीला अन्नरस पुरवितात व टाकाऊ पदार्थ बाहेर जाण्यास जागा करून देतात. त्याने असेही नमूद केले की या प्रमुख वाहिन्यांस (नसांना) कोणताही अडथळा आल्यास तो शरीरात रोगोत्पत्ती वा व्यंग निर्माण करतो.
भारतातील प्राचीन वैद्य अत्रेय व अग्निवेश यांच्या मार्गदर्शनाखाली इ.स.पू. ८व्या शतकात लिहिल्या गेलेल्या विश्वकोषीय पद्धतीच्या लेखनात चरकाने सुधारणा करून 'चरक संहिता' म्हणून पुनर्लेखन केले. या संहितेला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. गेली दोन शतके आयुर्वेद या विषयावर त्याचे हे लेखन प्रमाण मानले जाते. अरबी व लॅटिन यांसह अन्य विदेशी भाषांमध्ये चरकसंहितेचे भाषांतर झाले आहे.