दामोदरबुवा निंबर्गी

जीवन आणि पार्श्वभूमी

पं.दामोदर रामचंद्र निंबर्गी (डी. आर. निंबर्गी किंवा निंबर्गीबुवा) यांचा जन्म 1913 मध्ये कर्नाटकातील जैनापूर येथे एका संगीतमय कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा विष्णूभट निंबर्गी रुद्र वीणा वादक होते आणि त्यांचे वडील रामचंद्र निंबर्गी हे संस्थान रामतीर्थ येथील पुजारी होते. आई सीताबाई गृहिणी होत्या. ते कर्नाटकच्या जमखंडी येथे राहत असत. निबर्गीबुवांना चार भाऊ आणि तीन बहिणी होत्या. लहान दामोदर शाळेत जाऊ लागले होते. ते शालेय गाण्याच्या स्पर्धांमध्ये गाणी गात असत आणि प्रथम येत असत. त्यांचा आवाज मधुर होता. प्रत्येकजण त्यांच्या आवाजाचे कौतुक करत असे. त्यावेळी आप्पासाहेब (सीताराम) पटवर्धन हे महान नेते आणि महात्मा गांधींचे शिष्य होते. एके दिवशी आप्पासाहेबांनी लहान दामोदरचे गाणे ऐकले आणि त्यांनी दामोदरच्या वडिलांना प्रख्यात गुरूकडून आपल्या मुलास शिकवण्यास सांगितले. त्यावेळी पं.अनंत मनोहर जोशी (अंतुबुवा) एक प्रसिद्ध गायक होते आणि औंध संस्थानमधील ग्वाल्हेर घराण्याचे गुरू म्हणून सुप्रसिद्ध होते. सध्या औंध संस्थान सातारा औंध म्हणून लोकप्रिय आहे. लहान दामोदरने वयाच्या 8 व्या वर्षी अंतुबुवापासून गाण्याच्या शिक्षणाला सुरुवात केली आणि पुढे दहा वर्ष शिकले. त्याचवेळी अंतुबुवांचे सुपुत्र गजाननबुवा जोशी सुद्धा निंबर्गीबुवांबरोबर शिकत होते. दहा वर्ष तालमीनंतर निंबर्गीबुवा जमखंडीला परतले आणि कठोर सराव चालू ठेवला. 1932 मध्ये ते मुंबईला गेले आणि मुंबईत व्हायोलिनचे विद्यार्थी आणि त्यांचे धाकटे भाऊ गजाननबुवा निंबर्गी(जी.आर.निंबर्गी) यांच्यासमवेत गिरगाव ब्राह्मण कॉलनीत राहत असत. त्यानंतर निंबर्गीबुवा यांनी आपला भाऊ जी.आर.निंबर्गी यांनाही गायन शिकवले ज्याला त्यानंतर ऑल इंडिया रेडिओ धारवाड येथे नोकरी मिळाली. आज त्याचा मुलगा वादिराज निंबर्गी आकाशवाणी धारवाड येथे व्हायोलिन प्लेयर म्हणून कार्यरत आहे.

निंबर्गीबुवा यांनी मुंबईत मॅट्रिक पूर्ण केले आणि गायनाला कारकीर्द म्हणून निवडले. 1942 मध्ये त्यांचा लक्ष्मीबाई हिप्परगीशी विवाह झाला परंतु त्यांची पहिली मुलगी सुनंदा निंबर्गीच्या प्रसूतीनंतर लक्ष्मीबाईचा मृत्यू झाला. नंतर निंबरगीबुवाचे लग्न राधाबाई रामदासीशी झाले आणि त्यांपुढे दोन अपत्ये झाली अनुक्रमे एक मुलगा आणि मुलगी. राधाबाई यांनी सुनंदा,श्रीकांत आणि वीणा निंबर्गी यांचे संगोपन केले. निंबर्गीबुवा गिरगाव सोडून दादरला आले आणि कोळी वाड्यात राहत असत आणि खासगी शिक्षक म्हणून हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शिकवू लागले आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम करू लागले. नंतर मुंबईच्या डोंबिवलीमध्ये स्थायिक झाले. पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं.C R व्यास, पं.K G गिंडे हे देखील निंबर्गीबुवांचे स्नेही होते. निंबर्गीबुवा आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी धारवाडचे ‘ए’ ग्रेडचे कलाकार होते आणि पुढे त्यांना अनेक स्थानिक पुरस्कार प्राप्त झाले. 28 एप्रिल 1994 रोजी निंबर्गीबुवा यांचे निधन डोंबिवली येथे झाले.

वारसा

निंबर्गीबुवांनी अनेक विद्यार्थ्यांना ग्वाल्हेर गायकीचे मूलभूत प्रशिक्षण दिले. त्यांच्या प्रख्यात विद्यार्थ्यांपैकी काही खालील प्रमाणे आहेत. विदुषी कौसल्या मांजेश्वर, विदुषी वीणा सहस्रबुद्धे, पंडित प्रभाकर करंदीकर, श्रीमती सुनंदाताई निंबर्गी (वंदनाताई खोंड), डॉ. रसिका फडके, अर्जुन शेजवाल, विठ्ठल शेजवाल, बाबूराव कोकाटे, सुलभा मोहिले, ज्योत्स्ना मोहिले, श्री. घुले, श्री. भागवत, श्री. थत्ते, श्री. रायकर, श्रीमती. घाणेकर, श्रीमती साखरे, श्रीमती. मंदाकिनी भेंडे, श्रीमती विमल तांबे.

बाह्य दुवे :

1. http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=116098:2010-11-20-16-25-19&Itemid=1 Archived 2021-01-21 at the Wayback Machine.

2. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/Hindustani-and-Carnatic-exponents-come-face-to-face-at-Jugalbandi/articleshow/16115203.cms

3. http://jaipurgunijankhana.com/2018/10/15/kausalya-manjeshwar/ Archived 2021-01-22 at the Wayback Machine.