दादू इंदुरीकर (जन्म : मार्च १९२८; - १३ जून १९८०). यांचे खरे नाव गजानन राघू सरोदे असे होते. त्यांनी गाढवाचं लग्न हे वगनाट्य मराठी रंगभूमीवर आणले. या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते.[]

‘कहाणी वगसम्राटाची’ हे दादू इंदुरीकर यांच्या जीवनाची वाटचाल सांगणारे पुस्तक आहे.

या वगात गंगीचे काम करणाऱ्या प्रभा शिवणेकर यांचे ‘एका गंगीची कहाणी’ नावाचे चरित्र प्रभाकर ओव्हाळ यांनी लिहिले आहे. पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनाने हे चरित्र पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे.

बालपण

संपादन

इंदुरीकर यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण इयत्ता सातवीपर्यंत झाले. त्यांचे वडील राघोबा इंदुरीकर यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे लावणी क्षेत्रातील शिक्षण झाले. दादू इंदुरीकरांचे मूळ नाव गजानन सरोदे; आईचे नाव नाबदाबाई. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदुरी नावाच्या गावात दादू इंदुरीकरांचा जन्म झाला. दादुंचे वडील राघु इंदुरीकर हे भेदिक कवने रचणारे व गाणारे नामांकित तमासगीर होते. त्यामुळे लहानपणीच दादुंचा लोककलेशी परिचय झाला व त्यांच्या मनात लोकनाट्य आणि रंगभूमीविषयी आवड निर्माण झाली. पुढे व्हर्न्याक्युलर फायनल म्हणजेच सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दादूंनी नोकरी न करता तमासगीर होण्याचे ठरवले.

तमाशात काम करताना सुरुवातीला प्रसिद्ध तमासगीर बाबुराव पुणेकर यांच्या फडबारीत काम करताना दादूंना विनोदाचा सूर सापडला. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने ‘दादू मारुती इंदुरीकर’ ह्या नावाने स्वतःची फडबारी उभी केली आणि तिचगया माध्यमातून विविध लोकनाट्यांत कामे करण्यास सुरुवात केली. सहज-साधा मुद्राभिनय, शारीरिक लवचीकता, शब्दांची अचूक फेक, साध्या-साध्या शब्दांतून विनोद निर्माण करण्याची विलक्षण हातोटी, दर प्रयोगाला नवीन नवीन कोट्या करण्याचे कौशल्य, हजरजबाबीपणा ह्या गुणांमुळे दादू इंदुरीकर लवकरच कसदार सोंगाड्या म्हणून नावारूपास आले.

गाढवाचं लग्न, हरिश्चंद्र तारामणी, मल्हारराव होळकर, मराठशाहीची बोलती पगडी, मिठ्ठाराणी ह्या वगनाट्यांतील आणि काळ्या माणसाची बतावणी, रंगीचा हिसका पाटलाला धसका, काय पाव्हणं बोला मेव्हणं ह्या फार्सांतील त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या. मराठी दूरदर्शन वाहिनीवरून सर्वप्रथम प्रसारित झालेल्या येड्या बाळ्याचा फार्स (१९६०) ह्या फार्समध्येही इंदुरीकरांनी महत्त्वाची भूमिका केली होती.

गाढवाचं लग्न या वगनाट्यातील इंदुरीकर यांची भूमिका प्रसिद्ध पावलेली आहे. यामध्ये त्यांनी सावळा कुंभार ही भूमिका साकारलेली आहे. याजोडीने त्यांनी आतून कीर्तन वरून तमाशा, राणी अहिल्याबाई होळकर या वगनाट्यामधून भूमिका केल्या आहेत.[]

दादू इंदुरीकरांमुळे ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य महाराष्ट्रभर गाजले. त्याचे हजारो प्रयोग झाले. गाढवाचं लग्नमधील तुफान विनोदी भूमिकेमुळे दादुंना अमाप लोकप्रियता मिळाली. पु. ल. देशपांडेंनी इंदुरीकरांना ‘महाराष्ट्राचा पॉलमुनी’ म्हणले तर शंकर घाणेकरांनी त्यांना ‘वगसम्राट’ अशी पदवी दिली. गाढवाचं लग्नच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा भाग असलेली तमाशाकला दादुंनी शहरी भागातील पांढरपेशा वर्गामध्ये सुप्रसिद्ध केली. दादुंचा पोट धरून हसायला लावणारा विनोद ग्रामीण-शहरी अशा दोन्हीकडच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे तमाशाला वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली. तमाशा परिषदेकडून सोंगाड्याच्या भूमिकेसाठी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दादुंना मिळाले (१९६९). १९६९ ते १९७३ ह्या काळात तमाशा परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये त्यांच्या फडबारीला प्रत्येक वर्षी पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला. राष्ट्रीय संगीत नाट्य अकादमीकडून दिला जाणारा पारंपारिक लोककलेचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला(१९७३). तेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते दादूंचा सन्मान करण्यात आला. पुढे तमाशा परिषदेने दादुंना ‘विनोदमूर्ती’ हा बहुमान बहाल केला. जनता दादुंना ‘सोंगाड्यादादांचा दादा’ म्हणून नावाजू लागली.

दादुंनी लोककलेची जोपासना करताना सामाजिक भानही राखले. गाढवाचं लग्नच्या प्रयोगांतून प्राप्त झालेल्या धनाचा काही भाग त्यांनी मंदिरे, शाळा, अनाथ मुला-मुलींसाठीचे वसतीगृह ह्यांच्या उभारणीसाठी खर्च केला. प्रसिद्ध सिनेअभिनेते दादा कोंडके ह्यांनी सोंगाड्या ह्या चित्रपटासाठी दादुंचे मार्गदर्शन घेतले होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ "दादू इंदुरीकर (Dadu Indurikar)". मराठी विश्वकोश. 2019-07-22. 2021-06-13 रोजी पाहिले.
  2. ^ "वगसम्राट दादू इंदुरीकरांचे महाराष्ट्राला विस्मरण". eSakal - Marathi Newspaper. 2021-06-13 रोजी पाहिले.