दलित साहित्यातील युगस्तंभ: अण्णा भाऊ साठे आणि बाबुराव बागुल
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
दलित साहित्यातील युगस्तंभ : अण्णाभाऊ साठे आणि बाबुराव बागूल (प्र.आ. २०१९ ; सृजन प्रकाशन, मुंबई) हा समीक्षा ग्रंथ ज्येष्ठ अभ्यासक व समीक्षक डॉ. नंदा तायवाडे यांनी लिहिलेला आहे. दलित साहित्यात मौलिक योगदान देणाऱ्या अण्णा भाऊ साठे आणि बाबुराव बागूल यांच्या निवडक कथात्म साहित्यातील वाड्मयीन वैशिष्टयांचे विविध पैलू त्यांनी या ग्रंथातून उलगडले आहेत.
साठे यांचे बरबाद्या कंजारी ('स्मशानातील सोनं', 'सुलतान', 'भोमक्या', 'मुकूल मुलानी', 'प्रायश्चित', 'सापळा' आणि 'उपकाराची फेड' या कथा) आणि गजाआड ( 'जखम', 'कौर्य', 'शेरखान', 'गजाआडचा वेडा', 'भेकड', 'लख्या बारपाटा' आणि 'तरस' या कथा) हे दोन कथासंग्रह आणि फकीरा, वैजयंता आणि माकडीचा माळ या तीन कादंबऱ्या तसेच बाबुराव बागूल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती ('काळोखाचे कैदी', 'गुंड', 'वाटेवरची', 'दसऱ्याचा रेडा' , 'पेसूक', 'विद्रोह' आणि 'जेव्हा मी जात चोरली होती' या कथा) आणि मरण स्वस्त होत आहे ('मरण स्वस्त होत आहे', 'कवितेचा जन्म', 'जुलूम', 'मैदानातील माणसे', 'आई', सक्त मजुरी' आणि 'लुटालूट' या कथा) हे दोन कथासंग्रह आणि सूड, अघोरी आणि कोंडी या तीन कादंबऱ्या यांचा अभ्यास या समीक्षा ग्रंथात करण्यात आला आहे.
दोन्ही लेखकांच्या प्रातिनिधिक साहित्यातून त्यांच्या वाड्मयीन कार्यावर मौलिक भाष्य प्रस्तुत ग्रंथात करण्यात आले आहे. दोन्ही लेखकांच्या कथात्म साहित्यातील आशयद्रव्य, निवेदन, भाषाशैली, संघर्षमूल्य/ विद्रोहमूल्य आणि स्त्रीरूप दर्शन यावर डॉ. नंदा तायवाडे यांनी तपशीलवार तौलनिक विवेचन केले आहे.
अण्णा भाऊ साठे आणि बाबुराव बागूल हे दोन्ही साहित्यिक जातीय आणि वर्गीय अशा दोन्ही प्रकारच्या विषमतांचा विचार करणारे लेखक होते. या भेदभावपूर्ण सामाजिक वास्तवात स्त्रियांच्या दास्यत्वाच्या प्रश्नांचीही चर्चा त्यांनी आवर्जून केलेली आहे. त्यांच्या या व्यापक वैचारिक दृष्टीकोनामुळेच त्यांचे साहित्य वैशिष्ट्यपूर्ण ठरते. याविषयीची अभ्यासपूर्ण मांडणी तायवाडे यांनी प्रस्तुत ग्रंथात केलेली आहे. तायवाडे यांच्या मते, अण्णा भाऊ साठे आणि बाबूराव बागूल हे पोथीनिष्ठ आंबेडकरवादी आणि पोथीनिष्ठ मार्क्सवादी नाहीत. पोथीनिष्ठतेच्या पलीकडे जाऊन बदलत्या समाजाच्या गतिशास्त्राच्या आधारे हे दोन्ही लेखक जातवर्गीय वास्तवाचे द्वैत समजून घेतात. या दोन्ही लेखकांमधील साम्यतेविषयी पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. नंदा तायवाडे म्हणतात, "अण्णा भाऊ साठे व बाबुराव बागूल साम्यवादी-आंबेडकरवादी अशा व्यामिश्र मानवतावादी विचारपरंपरेची पताका खांद्यावर घेऊन निघालेले पांथस्थ. आपापली दार्शनिक मूल्ये सांभाळून कथा-कादंबरी वाड्मयातून त्यांनी नव्या यंत्रयुगातील नव्या मानवाचा ध्यास व शोध घेतलेला दिसून येतो. महानगरीय तसेच ग्रामीण संवेदना व जीवनजाणीवा, दलित-श्रमिक वर्गाची जगण्याची धडपड व आकांक्षा याचे सूक्ष्म रोपण कथा-वाड्मयाच्या प्रातांत दोनही शिलेदारांनी सशक्तपणे केलेले आहे." दलित साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व कलावंत भ. मा. परसवाळे या समीक्षा ग्रंथाविषयी म्हणतात, "अनेक मान्यवर समीक्षक, विचारवंताचे संदर्भ देत डॉ. नंदा तायवाडे यांनी अण्णा भाऊ साठे व बाबुराव बागूल यांच्या लेखनातील गुणदोषांची, मर्यादा व वैशिष्ट्यांची तटस्थपणे केलेली चर्चा; हे या 'दलित साहित्यातील युगस्तंभ : अण्णाभाऊ साठे आणि बाबुराव बागूल' पुस्तकाची जमेची बाजू आहे असे मला वाटते." (ग्रंथांच्या मागील पृष्ठावरून)
डॉ. नंदा तायवाडे यांनी या समीक्षा ग्रंथात प्राचीन सामाजिक - वाड्मयीन प्रकृतीचा वेध घेतला आहे. त्यातून शुद्रातिशूद्रांच्या अस्तित्वाचा आणि वाड्मयीन अभिव्यक्तीच्या अनेक महत्त्वपूर्ण संदर्भांना त्यांनी उजागर केले आहे. शिवाय प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आकार पावलेल्या विद्रोहाचे वाड्मयीन स्वरूपही उलगडले आहे. एकूण भारतीय समाजातील शुद्रातिशूद्रांसहित स्त्रियांच्या दास्यमुक्तीच्या लढ्यातील साहित्याची अनन्य साधारण भूमिका या दोन लेखकांच्या कथात्म साहित्यातून परिणामकारकतेने डॉ. नंदा तायवाडे यांनी मांडलेली आहे.