परिभाषा

(तांत्रिक शब्द या पानावरून पुनर्निर्देशित)

परिभाषा म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये वापरावयाची भाषा. ही भाषा सामान्यत: व्यवहार भाषेपेक्षा वेगळी असते. परिभाषेमध्ये अर्थातील नेमकेपणा अपेक्षित असतो. हा नेमकेपणा ज्या शब्दांनी साधला जातो त्या शब्दांना ‘पारिभाषिक संज्ञा’ म्हणतात. विज्ञानात अशा शब्दांची ते वापरण्यापूर्वी व्याख्या दिलेली असते. त्यामुळे पारिभाषिक संज्ञेला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो.[ संदर्भ हवा ]

संशोधन, शब्दसंपत्ती व ज्ञानभाषा

संपादन

मराठी भाषेच्या समृद्धीसाठी संशोधन, शब्दसंपत्ती व ज्ञानभाषा

मराठी भाषा समृद्ध व्हायची असेल तर ती ज्ञानभाषा झाली पाहिजे व परिभाषेच्या सहाय्याने शब्दसंपत्ती वाढविली पाहिजे. ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील मूलभूत संशोधन हाती घेण्याचा प्रयत्न ज्या भाषेत होतो तीच भाषा ज्ञानाची भाषा होऊ शकते. आज आपल्या भाषेचा अभिमान असतानाही एक गोष्ट मान्य करावीच लागेल ती म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रात मूलभूत संशोधनाचे काम करणाऱ्या इंग्रजी सारख्या ज्या भाषा आहेत, त्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. जगामध्ये विज्ञानाच्या क्षेत्रात होणा-या प्रगतीशी संबंध ठेवायचा असतो अशांना त्या भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता वाटते. याचे कारण या क्षेत्रातील मूलभूत संशोधनाचे काम या भाषेमधून होत असते. मराठी भाषेबद्दलचा आपला अभिमान ख-या अर्थाने पहिल्या प्रतीचा राहणार असेल तर हे काम मराठी भाषेमध्येही त्वरित झाले पाहिजे. तथा प्रकारची परिस्थिती आपल्याला येथे निर्माण करणे शक्य आहे सुद्धा भावना आपल्या समस्त लेखक, साहित्यिक मंडळींच्या मनापर्यंत जर जाऊन पोहोचली तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल.

रशिया, चीन, जपान इ. विकसनशील देश स्वतःच्या भाषांमधून मूलभूत संशोधन पूर्वीपासूनच करत आहेत. त्यांचे इंग्रजीशिवाय चालते, जपानसारख्या अतिशय छोटा देश जगाच्या बाजारपेठेवर राज्य करतो आहे. तरा आपला हा खंडप्राय असलेला देश का करू शकणार नाही ? आपणही हे निश्चित करू शकतो, त्यासाठी आपण आपल्या प्रादेशिक भाषा समृद्ध करू शकतो. इतर भाषांमध्ये वाङमय संशोधन जसे मराठीमध्ये येण्याची आवश्यकता आहे, तसे मराठीतील वाङमय देखील अन्य भाषांमध्ये जाण्याची गरज आहे. उत्तम ग्रंथांचे भाषांतर शासनामार्फत तसेच इतर संस्था व्यक्ति यांच्यामार्फत केले गेले पाहिजे त्यासाठी लागणारे नवीन शब्द परिभाषेच्या सहाय्याने सतत तयार करत राहिले पाहिजे.[ संदर्भ हवा ]

पारिभाषिक संज्ञा

संपादन

आजच्या प्रगतीशील शास्त्रीय जगात मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्राचा विकास व विस्तार होत आहे. आणि त्यांच्या बरोबरीने भाषेलाही आपली पावले टाकावी लागत आहेत.शास्त्रीय व तांत्रिक स्वरूप असलेल्या प्रत्येक व्यवहाराच्या भाषेमध्ये वेगळेपण आलेला आहे. ही व्यवहारविशिष्ट वेगळी भाषा म्हणजेच त्या त्या व्यवहारातील त्या विषयाची परिभाषा होय. अशा परिभाषेत तांत्रिक स्वरूप असलेला त्याच शास्त्राच्या विशिष्ट पारिभाषिक संज्ञा असतात. चेंबर्स टेक्निकल डिक्श्नरी अन्वये, एखाद्या विज्ञानाच्या क्षेत्रातील शब्दांचे वा वाक्य प्रयोगांचे विशेष महत्त्व असते. त्यांच्या साहाय्याने त्यातील कल्पना नेमकेपणाने शब्दबद्ध करतात त्यांना पारिभाषिक संज्ञा म्हणतात.

रोजच्या सामान्य व्यवहाराच्या गरजा भागविण्यासाठी नित्यपरिचित व मर्यादित स्वरूपाचा शब्दसंग्रह पुरा पडतो. परंतु विज्ञानाच्या क्षेत्रातील विशिष्ट व नेमक्या गरजा भागविण्यासाठी तसेच त्यांचा विशेष आशय व्यक्त करण्यासाठी सामान्य शब्दातून वेगळा व स्वतंत्र असा शब्दसंग्रह तयार करावा लागेल. विज्ञानाच्या क्षेत्रातील निरनिराळया शाखांची सध्या जी झपाटयाने वाढ झालेली आहे, त्यामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व्यक्त करण्यासाठी नवेनवे शब्द शोधून काढण्याची नितांत आवश्यकता भासत असते. या नवीन शब्दाचा अर्थ हा त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील व्यवहार सिद्ध अनुभव किंवा तथ्ये व्यक्त करीत असतात. परिभाषा निर्मितीचे एक स्वतंत्र तंत्र निर्माण झालेले असून परिभाषेची लक्षणे व ती योग्य रीतीने निर्माण करण्याची पद्धती ठरलेली आहे. परिभाषेच्या निर्मितीसाठी ज्या प्रकियेने शब्दसिद्धी करण्यात येते त्या प्रक्रियेत पुढील प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो :-

  1. एखादा अगदी नवीन शब्द तयार करण्यात येतो.
  2. आधीच्याच एखाद्या शब्दावरून शब्दसिद्धिच्या नेहमीच्या प्रक्रियेने दुसरा शब्द निर्माण करण्यात येतो.
  3. दुस-या एखाद्या भाषेतून एखाद शब्द उसनवार घेण्यात येतो.
  4. अस्तित्वात असलेल्या शब्दाला त्या त्या संदर्भात वेगळा अर्थ देण्यात येतो, कधी कधी गरजेनुसार मिश्र शब्द सुद्धा तयार करावे लागतात.
  5. शब्दामधील अर्थछटा व सुक्ष्मता व्यक्त करण्यासाठी जवळच्या शब्दांचे एक कूळ बनवून प्रत्येक शब्दासाठी योग्य असे पर्याय घेण्यात येतात.

परिभाषा निर्माण करताना अनेकदा जे नवीन शब्द तयार करावे लागतात त्यासाठी संस्कृत भाषेचा आधार घ्यावा लागतो. उपसर्ग आणि प्रत्यय प्रक्रियेने नवीन नवीन शब्द तयार केले जातात किंवा नाम अथवा धातू यापासून साधित शब्द बनविले जातात. कोणताही शब्द अवघड किंवा सोपा नसतो, तो परिचित किंवा अपरिचित असतो. परिचयाने वापर केल्याने तो सोपा वाटतो. वरील परिभाषा तयार करण्याच्या पद्धतीचा वापर करून केंद्र सरकारच्या शास्त्रीय व तांत्रिक परिभाषा (CSTT) आयोगाच्या धोरणानुसार व भाषा सल्लागार मंडळाने वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेच्या निर्मितीसाठी आधारभूत ठरवलेली निदेशक तत्त्वे विचारात घेतली आणि राज्यातील प्रत्येक विद्यापीठाचा त्या त्या विषयातील तज्ञ प्राध्यापक व मराठी विज्ञान परिषदेचा एक प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या विषयावर उपसमित्या स्थापन करून त्यांच्या सहकार्याने भाषा संचालनालयाने आतापर्यंत सुमारे २५ विषयांचे परिभाषा कोश तयार केलेले आहेत. यामधील एकूण्‍ सुमारे दोन लाख सदुसष्ट हजार शब्द श्री. संजय भगत, पुणे यांनी इंटरनेटवर उपलब्ध करून दिले आहेत. तथापि विज्ञान क्षेत्रात दररोज होणारे नवीन संशोधन आणि त्यासंबंधातील नवीन आव्हाने पेलण्यास ही परिभाषा अपुरी ठरते. त्यासाठी त्यांच्या सुधारित आवृत्या काढण्याचे तसेच उच्च माध्यमिक व महाविज्ञालयीन अभ्यासक्रमात नव्यावे समावेश झालेल्या विषयांची परिभाषा तयार करण्याचे काम करणे गरजेचे आहे. याचप्रमाणे मराठी भाषेच्या विविध बोली, आधुनिक संगणक शास्त्र, अवकाश विज्ञान तंत्रज्ञान, उद्योग, वाणिज्य, विधी व न्याय आणि उच्चशिक्षण यामध्ये मराठी भाषेचा वापर व प्रमाणीकरण करण्यासंबंधात येणा-या विविध अडचणी व उपाययोजना इ. संबंधात प्रत्येक मराठी भाषा विभाग प्रमुखांनी मूलभूत संशोधन करणे, मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाढविणे आणि मराठी भाषा ज्ञानभाषा करणे ही मराठी भाषा समृद्ध करण्याची महत्त्वाची साधने आहेत. त्यांचा उपयोग करून मराठी भाषा चांगली समृद्ध करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन