संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या ऑरर्थाप्टेरा (ऋजू पंखी) गणातील अॅक्रिडिटी कुलातील नऊ जातींच्या कीटकांना टोळ म्हणतात. टोळाचे इंग्रजी भाषेतील ‘लोकस्ट’ हे नाव लॅटिन भाषेतून आलेले असून त्याचा अर्थ ‘जळालेली जमीन’ असा होतो. टोळधाड येऊन गेल्यावर जमीन जळून गेल्यासारखी दिसते. टोळ जगभर सर्वत्र आढळत असून आफ्रिका खंडात त्यांचा उपद्रव जास्त आहे. स्थल आणि रंगानुसार त्यांना वाळवंटी, प्रवासी, मुंबई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मोरक्की, डोंगरी, तांबडे व तपकिरी टोळ अशी नावे देण्यात आली आहेत. भारतात शिश्टोसर्का ग्रिगेरिया ही जाती मोठ्या प्रमाणावर आढळते. तिच्यामुळे वनस्पतींचे अतोनात नुकसान होते.
टोळ टोळाचे शरीर अरुंद, लांब, दंडगोलाकार आणि व्दिपार्श्वसममित असून लांबी ८ सेंमी. पर्यंत वाढू शकते. रंग पिवळा, तपकिरी, हिरवट वा राखाडी असून त्यावर वेगवेगळ्या रंगांचे ठिपके व रेषा असतात. शरीराचे डोके, वक्ष व उदर असे तीन भाग असतात. डोळे मोठे असून मुखांगे गवत व पाने चावण्यायोग्य असतात. शृंगिका आखूड असतात. वक्ष भागात पायांच्या तीन जोड्या असतात. पहिली जोडी सर्वांत लहान आणि तिसरी जोडी सर्वांत मोठी व दणकट असते. नर लहान असून उदराचा शेवटचा भाग गोल व वरच्या बाजूस वळलेला असतो. मादी मोठी असून तिच्या उदराच्या शेवटच्या भागामधून टोकदार अंडनिक्षेपक निघते. त्याला चार टोकदार अवयव असतात. अंडी घालताना अंडनिक्षेपक मातीत खुपसण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ओलसर मातीत मादी ७.५–१५ सेंमी. भोक पाडून ३–६ महिन्यांच्या काळात ३००–५०० अंडी घालते. अंडी एकमेकाला चिकट स्रावाने जोडलेली असून शेंगेप्रमाणे दिसतात. अंड्यांतून १२–१४ दिवसांनी पंखविरहीत पिले बाहेर पडतात. पिले पाचवेळा कात टाकून चार आठवड्यांनी प्रौढावस्थेत जातात. जीवनचक्र अर्धरूपांतरण पद्धतीचे असून त्यात अंडी, उड्या मारणारी पिले व पंख असलेले टोळ असे टप्पे असतात.