जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ
जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय हे मध्य प्रदेश राज्यातील एक कृषी विद्यापीठ आहे. त्याची जबलपूर येथे १ डिसेंबर १९६४ रोजी स्थापना झाली. त्या वेळी मध्य प्रदेश सरकारने आपल्या अखत्यारीखालील सहा कृषी महाविद्यालये व दोन पशुवैद्यक महाविद्यालये तसेच काही कृषी संशोधन संस्था विद्यापीठास जोडल्या. विद्यापीठाच्या कक्षेत मध्य प्रदेश राज्यातील कृषी व पशुवैद्यकसंबंधित बहुतेक सर्व महाविद्यालये व संशोधन संस्था अंतर्भूत होतात. त्यांत ९ घटक महाविद्यालये असून त्यांपैकी सहा कृषी, दोन पशुवैद्यक व एक कृषि-अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. विद्यापीठाचे संविधान इतर कृषी विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू हाच सर्वोच्च सवेतन अधिकारी असतो. विद्यापीठाच्या ग्रंथालयात ७३,७८२ ग्रंथ असून १६,३४१ नियतकालिके तेथे नियमित येतात. विद्यापीठाची विस्तार व्याख्यान योजना अभिनव असून या योजनेचा एक खास विभाग आणि तिचा एक संचालक आहे. या योजनेद्वारा कृषिसंशोधन खेड्यापाड्यांतून करण्यात येते. याशिवाय हा विभाग प्राध्यापकांसाठी प्रशिक्षणाचे वर्गही चालवितो.
विद्यापीठाचा अर्थसंकल्प १९७१–७२ मध्ये ३०७·४८ लाख रुपयांचा होता. विद्यापीठात १,९७५ विद्यार्थी शिकत होते (१९७२).