जयराम पोतदार
पं. जयराम पांडुरंग पोतदार हे एक हार्मोनियमवादक आहेत. त्याशिवाय ते उत्तम लेखक आहेत. मराठी संगीत नाटके आणि त्यांतील गायक-कलावंत यांच्याविषयी त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत.
जयराम पोतदार ह्यांनी मराठी साहित्यात एम.ए. केले असून, ते पत्रकारिता आणि ग्रंथालय शास्त्र पदवीधर आहेत. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण वडील डॉ. पांडुरंग यांच्याकडे घेतले. त्यानंतर पं. मनोहर बर्वे, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याकडूनही धडे घेतले. त्यांना ऑर्गनचे मार्गदर्शन पं. विष्णूपंत वष्ठ यांच्याकडून मिळाले.
भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागात ते उच्चपदस्थ अधिकारी आहेत. १९७५पासून जयराम पोतदार हे आकाशवाणीचे व दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलावंत आहेत.
जयराम पोतदार हे वयाच्या १५व्या वर्षापासून स्वयंवर, मानापमान, सौभद्र, शारदा, विद्याहरण, संशयकल्लोळ, सुवर्णतुला, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांमध्ये ऑर्गन वाजवत आले आहेत. किशोरी आमोणकर, पं. कुमार गंधर्व, गंगूबाई हनगळ, पं. सी.आर. व्यास, पं. जसराज, माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे यांच्या संगीताच्या देशविदेशांतील कार्यक्रमांत ते हार्मोनियमवर असत. पं. जयराम पोतदार यांना अनेक संस्थांचे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
पं. जयराम पोतदार यांची पुस्तके
संपादन- कथामय नाट्यसंगीत†
- बहुआयामी नाट्यसंगीत
- वेध मराठी नाट्यसंगीताचा
- संगीतसूर्य डाॅ. वसंतराव देशपांडे
†रत्नागिरीतील खल्वायन संस्थेने २०१८ साली दिवाळी पाडव्यानिमित्त‘संगीत एकच प्याला’ या शतकमहोत्सवी नाटकावर आधारलेला ‘कथामय नाट्यसंगीत’ नावाचा विशेष कार्यक्रम केला होता. खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. १९९७मध्ये स्थापन झालेल्या खल्वायन संस्थेची ही ४१वी विशेष मैफल होती. संगीत एकच प्याला या नाटकाचे शताब्दी वर्ष, राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष, नटसम्राट बालगंधर्व यांची ५१वी पुण्यतिथी आणि संगीतसूर्य डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्ताने संस्थेने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटिडेच्या साहाय्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
'कथामय नाट्यसंगीता'मध्ये अजिंक्य पोंक्षे, पं. जयराम पोतदार, पौर्णिमा साठे, वामन जोग व हिमानी भागवत ह्या नाट्य कलावंतांनी सादरीकरण केले होते. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व ऑर्गनसाथ अश्या भूमिका पं. जयराम पोतदार यांच्या होत्या.
पुरस्कार आणि सन्मान
संपादन- नवी दिल्लीतल्या संगीत नाटक अकादमीची मराठी नाट्यसंगीतावर संशोधन करण्यासाठीची सीनिअर फेलोशिप (२००३).