जनार्दन सखाराम करंदीकर

ज.स. करंदीकर (पूर्ण नाव जनार्दन सखाराम करंदीकर) (जन्म : कुंदगोळ-जमखिंडी संस्थान, १५ फेब्रुवारी १८७५; मृत्यः पुणे, १२ मार्च १९५९) हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या, लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या आणि इ.स. १९२०पासून द्विसाप्ताहिक झालेल्या केसरी या वृत्तपत्राचे इ.स. १९३३ ते १९४६ या काळात संपादक होते. ते एक हिंदुत्वनिष्ठ लेखक होते.

केसरीचे संपादकपद संपादन

केसरीचे संपादकपद न. चिं. केळकर यांनी सोडल्यानंतर ही जबाबदारी जनार्दन सखाराम करंदीकर यांच्याकडे सोपविण्यात आली. 5 जानेवारी 1931 रोजी त्यांनी ही सुत्रे स्वीकारली. त्याआधी १९ वर्षे करंदीकर केसरीच्या संपादकीय विभागात काम करत होते. टिळक हयात असतानाच १२ मार्च १९१२ रोजी करंदीकरांनी केसरीत प्रवेश केला. कायदेभंगाच्या चळवळीत करंदीकरांना दोन वर्षे सक्तमजुरी झाली. ६ ऑक्टोबर १९३३ रोजी तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांनी पुन्हा संपादकपदाची सूत्रे हातात घेतली. १९३७ साली ते केसरी मराठा संस्थेचे विश्वस्त झाले. ऑगस्ट १९४६पर्यंत त्यांची संपादकीय कारकीर्द सुरू होती.  

केसरीची लोकप्रियता वाढवली संपादन

दुसऱ्या महायुद्धामुळे बातम्यांसाठी त्यातही युद्धविषयक बातम्यासाठी वृत्तपत्रे वाचण्याची आवड वाढली. त्याचा फायदा केसरीला झाला. करंदीकरांनी युद्धविषयक बातमी जशीच्या तशी प्रसिद्ध न करता युद्धवार्तांचा अन्वयार्थ स्पष्ट करून महायुद्धाचे चित्र वाचकांना सहज समजेल अश्या पद्धतीने बातमीची रचना आणि मांडणी केली. त्याचा पत्राला फायदा झाला. करंदीकरांनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या हिंदुसभेचा पुरस्कार केला, त्याचा फायदा केसरीला झाला.

अग्रलेख संपादन

केसरीच्या संपादकाने राजकारणात पुढारीपणाने भाग घेतला पाहिजे ही टिळकांची परंपरा न. चि केळकरांनी काही प्रमाणात चालवली. पण करंदीकरांनी तसे केले नाही. त्यांचा तसा स्वभाव नव्हता. लेखनातील परंपरा पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सत्याग्रहपर्वातील त्यांचे लेख विशेष गाजले. त्यांची लेखणी बोचरी, प्रतिपक्षाला घायाळ करणारी होती. हिंदू-मुसलमान दंग्याच्या वेळी बंदोबस्त ठेवण्यात सरकारने जाणूनबूजून दुर्लक्ष केले, याची खात्री होताच सरकारी संगिनी कशाकरता असा परखड अग्रलेख त्यांनी लिहिला. आर्थिक प्रश्नावर त्यांनी बरेच लेखन केले.

करंदीकर यांचे इंग्रजी तिसरीपर्यंत (आत्ताच्या सातवीपर्यंतचे) शिक्षण कुंदगोळ येथे झाले. पुढे पुण्यात येऊन ते १८९७साली बी.ए. व नंतर एल्‌‍एल.बी. झाले. त्यांनी इ.स. १९०७ ते १० या काळात प्रा. विष्णू गोविंद विजापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी कोल्हापूर येथे काढलेल्या समर्थ विद्यालयात अध्यापनाचे काम केले. इ.स. १९११मध्ये करंदीकर पुण्याच्या केसरी साप्ताहिकात प्रथम लेखक म्हणून आले. ते १९१२मध्ये मुख्य उपसंपादक, आणि १९३३मध्ये मुख्य संपादक झाले.

ज.स. करंदीकरांनी १९२२साली मुळशी सत्याग्रहात आणि १९३०-३१मध्ये स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. सश्रम कारावासही भोगला.

करंदीकर हे गाढे विद्वान होते. त्यांनी महाभारत, गीता आदी ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. ते पत्रकार आणि ग्रंथकार तर होतेच, पण संशोधक व सूक्ष्म अभ्यासकही होते. ज्योतिष-पंचांग, प्राचीन अर्थशास्त्र यांपासून ते जातिवाद, ब्रिटिशांची राजनीती, ब्रिटिश राजवटीतील आर्थिक व्यवस्थापन इत्यादी विषयांवर त्यांनी सतत ३५ वर्षे वृत्तपत्रीय आणि ग्रंथात्मक लिखाण केले. करंदीकर हे हुंडणावळ, सुवर्णनिर्यात, सरकारी अंदाजपत्रक आदी विषयांचे तज्ज्ञ होते. या क्लिष्ट विषयांवरील त्यांचे लिखाण वाचकांना सुगम वाटे. करंदीकरांच्या लेखांचे एक पुस्तक ’श्री. ज.स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध’ या नावाने दोन खंडांत प्रसिद्ध झाले आहेत. करंदीकरांनी आपल्या आयुष्यात विविध विषयांवरची १०हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांपैकी काही पुस्तके अशी :-

  • अन्य लोकांप्रत सुगम यात्रा
  • आरंभी
  • कौटिलीय अर्थशास्त्र - दोन खंड (संस्कृत पंडित बळवंत रामचंद्र हिवरगावकर यांच्या सहकार्याने, १९२७)
  • गणेशोत्सवाची ६० वर्षे (१९५३)
  • गीता तत्त्वमंजरी अर्थात निर्लेप कर्मशास्त्र (१९४७)
  • जगातील क्रांतिकारक लढाया (१९०७) (एडवर्ड क्रिसी यांच्या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद) या पुस्तकात इ.स.पूर्व ४९० ते इ.स. १९०५ पर्यंतच्या जगाला कलाटणी देणाऱ्या १६ युद्धांचा इतिहास आहे.
  • नरसिंह चिंतामण केळकर यांच्या आठवणी
  • भोपटकर गुणगौरव ग्रंथ (संपादित)
  • महाभारत
  • महाभारत कथाभाग आणि शिकवण (१९५८)
  • श्रीसमर्थ चरित्र (१९५३)
  • हिंदुत्ववाद (१९४१)

(अपूर्ण))