एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा किंवा मेळा असे म्हणतात.

लोक संपर्क वाढविणे हा जत्रेचा मुख्य उद्देश असतो. बऱ्याच ठिकाणी जत्रेमध्ये बोकड कापले जाते. एखाद्या देवाच्या नावाने लोकांना आमंत्रित करून त्यांना देवाचा प्रसाद म्हणून अन्न वाटले जाते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये अशी प्रथा आढळते. एका ठरविलेल्या दिवशी गावातील प्रत्येक कुटुंब आपापल्या पाहुण्यांना, मित्र मंडळींना आमंत्रित करून जेवू घालतात. त्या दिवशी गावामध्ये मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तमाशा हा त्यापैकीच एक असा मनोरंजनाचा प्रकार ग्रामीण भागामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये लोकसंपर्काच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी जत्रा ही एक अतिशय महत्त्वाची पद्धती आहे. अशा या जत्रेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व स्तरातील, सर्व जाती-धर्मातील समुदाय या जत्रेत मोठ्या आनंदाने सहभागी होताना दिसतात. या अशा जत्रेतून सामाजिक एकोपा जपला जातो. ह्या धार्मिक कारणां बरोबरच आर्थिक व व्यावहारिक उलाढालींसाठी सोयीचे केंद्र असते. (उदा. शहाद्या जवळील सारंगखेडच्या जत्रेतला घोडे बाजार कोट्यवधींच्या उलाढाली साठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. [१] [२]) काही गावामध्ये जत्रेच्या दिवशी लोकविधी म्हणून ' दशावतार ' हा लोक नाट्य प्रकार सादर करण्याची प्रथा असते.

काही अनिष्ठ प्रथांनी देशांतल्या बहुतेक जत्रांमध्ये शिरकाव केलेला आढळतो. उदा.

  • बोकड / रेडा ह्या सारख्या प्राण्यांचा देवाला बळी देणे. अनेक स्वयंसेवी संस्था ह्या प्रथा बंद व्हाव्यात म्हणून कार्यरत आहेत. [३] तर काही ठिकाणी स्थानिक सरकारी संस्थेने बळी प्रथेवर बंदी आणली आहे. [४]
  • अघोरी पद्धतीने नवस फेडणे, उदा. नवजात शिशूंना उंचा वरून खाली फेकणे. [५]

महाराष्ट्रातील प्रसिद्ध जत्रा संपादन

अंगणेवाडी जत्रा, जातेगाव मुखई कालभैरव जत्रा, श्रीनाथ म्हस्कोबा जत्रा वीर व कोडीत पुणे.महालक्ष्मी जत्रा, वज्रेश्वरी जत्रा. खंडोबा यात्रा माळेगाव जि.नांदेड ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ सारंगखेड येथील घोडे बाजार १
  2. ^ "सारंगखेड येथील घोडे बाजार २". Archived from the original on 2012-02-17. 2009-09-09 रोजी पाहिले.
  3. ^ "बळी प्रथे विरुद्ध आंदोलन". Archived from the original on 2009-04-21. 2010-08-03 रोजी पाहिले.
  4. ^ http://timesofindia.indiatimes.com/Cities/Animal-sacrifice-banned-during-jatra/articleshow/4500675.cms
  5. ^ अघोरी नवस