चित्रक प्लमबैगो जेलनिका (शास्त्रीय नाव: Plumbago zeylanica L.; बंगाली:चिता; गुजराती:चित्रो; कन्नड:वेल्लीचित्रक) हे बहुवर्षायू सदाहरित लहानसर झुडूप आहे.

ही प्लमबैजिनेसी " (Plumbag inaceae)कुळातील वनस्पती आहे.

ह्याचे खोड गोल असून त्याला पुष्कळ फांद्या फुटतात. फांद्या पसरलेल्या असताना जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हां पेरापेरास मुळे फुटतात. पाने एकाआड एक अशी, अखंड, देठरहित, लंबगोल, हिरवीगार, मोगऱ्याच्या पानासारखी, जाडसर व मजबूत आणि घट्ट असतात. फुलांचे तुरे असतात. फुले पांढरी, नियमित, स्त्री व पुरूष इन्द्रिये एकत्र असलेली आणि गंधरहित असून, पुष्पपात्रावर अनेक लहान लहान ग्रंथी असतात. मुळे लांब, ताजेपणी मांसल, बरीचशी वेडीवाकडी झालेली, सुमारे बोटभर जाड व क्वचित त्यांस उपमुळे फुटलेली अशी असतात. साल काळसर उभी चिरलेली असून तीवर थोड्याशा लहान गांठी असतात. सुके मूळ तोडले असता त्वरित तुटते. मूळ चवीला तिखट, कडू, उष्ण आणि जिभेस भोसकल्याप्रमाणे दुःखदायक असते. मुळाची साल औषधांत वापरतात. ही नेहमी ताजी वापरावी, कारण जुनी झाली म्हणजे निरूपयोगी होते.

रसशास्त्र: चित्रकाच्या मुळाच्या सालींत एक दाहजनक द्रव्य आहे. ते अल्कोहोलमध्ये सहज, उकळलेल्या पाण्यांत बरेच मिसळते, परंतु थंड पाण्यांत तितकेसे मिसळत नाही.

धर्म: लहान प्रमाणात सेवन केले असताना चित्रकाने पचननलिकेच्या श्लेष्मलत्वचेस उत्तेजन येते व आमाशय आणि उत्तरगुद ह्यांचे रक्ताभिसरण वाढून त्यांना शक्ती येते. चित्रकाने पोटांत उष्णता उत्पन्न होते व पचनक्रिया वाढते. गुदांतील मूळव्याध अर्श उत्पन्न करणाऱ्या आकुंचनावर चित्रकाची प्रत्यक्ष क्रिया होते आणि त्याने आकुंचन कमी होऊन, शिथिलता नाहीशी होते व थोडासा मलावरोध होतो. ह्याने यकृतास उत्तेजन येऊन पित्त नीट वाहू लागते, म्हणून चित्रक दिल्यानंतर मळ नेहमी पिवळा होतो. रक्तांत मिसळून नंतर मलोत्सर्जक ग्रंथीवर ह्याची उत्तेजक क्रिया होते व त्यांतल्यात्यांत त्वचेंतील स्वेदग्रंथीवर विशेष क्रिया होते. म्हणून चित्रक दिल्याने पुष्कळ घाम सुटतो. मोठ्या मात्रेंत चित्रक दाहजनक व कैफजनक विष आहे. मोठ्या मात्रेंत घशांत व आमाशयांत आग सुटते, उमासे येतात, उलट्या व जुलाब होतात, लघवी होण्यास त्रास पडतो, नाडी अशक्त होऊन वेडीवांकडी चालते आणि अंग थंड पडते. गर्भाशयावरील चित्रकाची क्रिया फार महत्त्वाची व लक्षांत ठेवण्यासारखी आहे. साधारण मोठ्या मात्रेने कटींतील सर्व इंद्रियांचा दाह उत्पन्न होतो म्हणून जुलाब होऊन जुलाबाबरोबर गर्भाशयातून देखिल रक्त वाहू लागते व लघवीस थेंब थेंब होते. चित्रकाने गर्भाशयाचे इतके जोरदार संकोचन होते की, प्रहर दोन प्रहरांत गर्भ पडतो. ही त्याची क्रिया अगदी नेमकी होत असते व नऊ महिन्यांत केव्हांहि दिले तरी गर्भ पडतो, परंतु गर्भ मात्र नेहमी मृत असतो. गर्भ पाडण्यास चित्रक पोटात देतात व गर्भाशयाच्या तोंडावर लेप लावतात. ह्या लेपानंतर विशेष काळजी न घेतल्यास कटीमध्ये अमिताप उत्पन्न होऊन स्त्रीचे जिवास धोका होतो.

चित्रक हे एकूण उत्तम औषध आहे. हे कडू, तिखट, उष्ण, दीपक, पाचक, वायुहर, अर्शोघ्न, पित्तस्रावी, स्वेदजनन, ज्वरघ्न आणि गर्भाशयाचा संकोच करणारे आहे. मात्र, चित्रकाच्या लेपाने त्वचेवर फोड उठतो व फार दुखतो. त्वचा काळी पडते व त्यामुळे पडलेला व्रण लवकर भरून येत नाही.
उपयोग:

  1. चित्रक हे वात आणि पित्तयुक्त ज्वरांत, पचननलिकेच्या रोगांत आणि गर्भाशयाच्या क्रियेसाठी वापरण्याचा प्रघात आहे.
  2. विषमज्वरांत मुख्यत्वे यकृत व प्लीहा ह्यांची वृद्धि झालेली असेल तर चित्रक वापरल्याने फार फायदा होतो. ज्वरात सुगंधी पदार्थाबरोबर चित्रकाच्या मुळाचे चूर्ण तांदळाच्या पेजेंत उकडून वस्त्रगाळ करून देतात.
  3. सूतिकाज्वरांत चित्रकाचा दोन तऱ्हेने उपयोग होतो; एक ताप कमी येतो व सर्व शरीरास उत्तेजन मिळते आणि दुसरे गर्भाशयास उत्तेजन येऊन दूषित आर्तव वाहू लागल्यामुळे मक्कलशूळ कमी होतो. सूतिकाज्वरात चित्रकाबरोबर निर्गुडी द्यावी. मरक (प्लेग) ज्वरांत चित्रक वळंब्यावर लावितात व पोटांतही देतात.
  4. शिथिलताप्रधान पचननलिकेच्या रोगांत चित्रक हेच उपयुक्त औषध होय. ह्याने अन्नाची गेलेली वासना उत्पन्न होते, भूक लागते, अन्न पचते व सर्व ठीक चालले आहे अशी मनाला शांतता वाटते.
  5. थंड पाणी व थोडे मीठ ह्यांत चित्रकाचे मूळ उगाळून त्याचा पातळ लेप आमवातामुळे झालेल्यात दुःखदायक सांध्यावर करतात. हा लेप १०/१५ मिनिटांत मात्र पुसून टाकला पाहिजे. चित्रकाची मुळी उकडून तयार केलेले तेल आघातयुक्त वातरोगांत व आमवातात चोळतात.