चार्ल्स स्टर्ट (२८ एप्रिल, इ.स. १७९५ - १६ जून, इ.स. १८६९) हा ऑस्ट्रेलियाचे मूलभूत सर्वेक्षण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागात शोधमोहिमा काढणारा संशोधक होता. याने ऑस्ट्रेलियातील डार्लिंग नदीचा शोध लावला.

चार्ल्स स्टर्ट

परिचय

संपादन

स्टर्टचे वडील थॉमस स्टर्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत न्यायाधीश म्हणून नोकरीला होते. त्यांची नेमणूक ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात असताना बंगालमध्येच चार्ल्स स्टर्टचा जन्म २८ एप्रिल, इ.स. १७९५ साली झाला.[] बालपणातील पहिले पाच वर्ष बंगालमध्ये काढल्यावर वयाच्या पाचव्या वर्षी त्याला शिक्षणासाठी नातेवाईकांकडे इंग्लंडला पाठविण्यात आले.[] शिक्षण पूर्ण झाल्यावर इ.स. १८१३ साली तो लष्करात भरती झाला. लष्करात कॅप्टन या पदावर काम करीत असताना कैद्यांना ऑस्ट्रेलियाला नेण्याच्या कामावर त्याची नेमणूक झाली. इ.स. १८३३ साली चार्ल्स स्टर्ट ऑस्ट्रेलियाचा सर्व्हेअर जनरल बनला.

मोहिमा

संपादन

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी एखादा मोठा समुद्र असावा असे मानले जात होते. याचा शोध घेण्यासाठी न्यू साउथ वेल्सचा गव्हर्नर सर राल्फ डार्लिंग याने ४ नोव्हेंबर, इ.स. १८२८ रोजी स्टर्टने पाठविलेला प्रस्ताव मंजूर करून त्याला मोहिम काढण्यास परवानगी दिली व त्या मोहिमेचे नेतृत्व चार्ल्सकडेच सोपविण्यात आले. या मोहिमेदरम्यान चार्ल्स आणि त्याचा सहकारी हॅमिल्टन ह्यूम यांनी मॅक्वायर नदीतून प्रवास केला. मॅक्वायर नदीतून प्रवास केल्यावर पुढे त्यांना दलदलीचा मोठा प्रदेश लागला. हा दलदलीचा प्रदेश ओलांडल्यानंतर एका मोठ्या नदीचा त्यांना शोध लागला. न्यू साउथ वेल्सचा गव्हर्नर डार्लिंगच्या नावावरून स्टर्टने या नदीला डार्लिंग असे नाव दिले.

इ.स. १८३० साली स्टर्टने दुसरी मोहिम काढली. यावेळेस त्याने जॉर्ज मेकॉलेसोबत डार्लिंग नदीला मिळणाऱ्या मुर्हे या नदीतून ६५० किलोमीटरचा प्रवास केला. मुर्हे नदीच्या मुखापाशी त्यांना एका मोठ्या जलाशयाचा शोध लागला. या जलाशयाला स्टर्टने लेक अलेक्झांड्रीना असे नाव दिले.

इ.स. १८४४-४६ दरम्यान चार्ल्स स्टर्टने ॲडिलेडहून उत्तरेकडे मोहिम काढली. यावेळी तो मिलपरीन्का भाग ओलांडून सिम्पसन वाळवंटात पोहोचला. या कामासाठी 'रॉयल जिओग्राफीकल सोसायटी'ने सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान केला.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ केइथ स्वान, मार्गारेट कार्नेज. इन स्टेप विथ स्टर्ट. p. ३.
  2. ^ गिबनी, एच.जे. "स्टर्ट, चार्ल्स (१७९५ - १८६९)". १५ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.