चांदकुडा (किंवा चांदला, करवत, जासुंद) हा भव्य, ७०-८० मीटर उंच व नऊ मीटर घेराचा महान वृक्ष ब्रह्मदेश, श्रीलंका, इंडोनेशिया (जावा), मलेशिया आणि भारत (कोकण, कारवार, खंडाळा) या देशांतील सदापर्णी जंगलात सापडतो.

चांदकुडा झाडाची पाने
चांदकुडा झाडाचे खोड आणि साल

चांदकुडाची विविध भाषेतील नावे :

  • हिंदी - चांदकुडा
  • कानडी - अजनपत्ती
  • संस्कृत : वल्कल
  • इंग्रजी - सॅक ट्री, यूपस ट्री. ॲन्टिआर,
  • शास्त्रीय नाव - ॲंटिॲरिस टॉक्सिकॅरिया

या झाडाच्या खोडाला बुंध्याजवळ अनेक आधारमुळे असतात. साल गर्द करडी, कठीण व गुळगुळीत असते. पाने साधी, एकाआड एक, मोठी, खरबरीत, लंबगोलाकृती व लांबट टोकाची असतात. फुले एकलिंगी असून सप्टेंबर-ऑक्टोबरात एकाच झाडावर येतात. नरपुष्पे (पानांच्या बगलेत), सवृंत, पुष्पासनावर गर्दीने उगवलेली व मादीपुष्पे एकाकी व छदमंडलाने वेढलेली असतात.

पुंपुष्पात चार संदले व तीन ते आठ केसरदले आणि स्त्री-पुष्पात दोन किंजले असतात. फळे लाल, मखमली सालीची, मांसल, एकबीजी, लहान (१.२ - १.८ सेंमी.) व कुंभाकृती असतात.

वृक्षाच्या सालीपासून जाड धाग्याचे कापड, पोती आणि दोऱ्या बनवितात.

या झाडाचा चीक अत्यंत विषारी असून बाणांच्या टोकांस लावतात. लाकूड व हस्तिदंत घासून गुळगुळीत करण्यासाठी पाने वापरतात. बिया कडू व ज्वरनाशक असून आमातिसारावर उपयुक्त असतात. सालीतील धागा कागद-निर्मितीत उपयुक्त आहे.