चर्चा:समीक्षेचा अंतःस्वर (समीक्षा ग्रंथ)

गिरीश कुलकर्णींचा देऊळ

संपादन
      गिरीश कुलकर्णींचा देऊळ पाहिला की वाटते, किती परिचित विषय आहे हा. साक्षात्कार झाल्याची अफवा पसरणे आणि त्यातून मंदिर उभे राहणे ही गोष्ट भारतीय समाजात नवीन नाही. आपला समाज श्रद्धाळू आहेच, पण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मंदिर ही व्यवस्था मार्केटिंग, बिझिनेस, पर्यटन आणि राजकारणासाठी वापरली जातेय, हे नवीन आहे. या सामाजिक, सांस्कृतिक बदलाचे भानच देऊळ मधून गिरीश कुलकर्णींनी व्यक्त केले आहे. असे भान येणे हेच प्रतिभावंतांचे वैशिष्ट्य असते. 

१९९० नंतर भारतीय खेडी बदलली. रस्ते, प्रसारमाध्यमे, संपर्क माध्यमे, वाहने या भौतिक गोष्टींचा सुळसुळाट झाला. मात्र मुलभूत सोयींचा अभावच राहिला. वीज, पाणी, आरोग्य, रेशन, अंधश्रध्दा आणि दारिद्र्यनिर्मुलन या गोष्टी बाजूलाच पडल्या. तंटामुक्ती, ग्रामस्वच्छता, जलस्वराज्य इ. योजना भ्रष्टाचाराच्या, राजकारणाच्या बाबी झाल्या किंवा वरवरच्या झाल्या. ग्रामीण तरुण शहराच्या संपर्कात येऊन शिकला. पण त्याला गावात काम मिळेना, पोट भरेना आणि घर गाव सोडून शहरात त्याचा टिकाव लागेना. मग असा सुशिक्षित बेकार तरुण राजकारण्यांच्या हातातील हुकमी एक्का झाला. अशा स्थितीत बदल साऱ्यांना हवा आहे, पण तो केवळ विकासाच्या मुद्द्यावर, पण तो अगदी धर्मनिरपेक्ष लोकशाहीतही, होत नाही हे दुर्दैव आहे. तो होतो धर्मसापेक्ष मार्केटिंगने. या साऱ्यांच्या मदतीला धावून येत आहे देऊळ व्यवस्था. अलीकडच्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे पण बुद्धिप्रामाण्यवाद वाढला असे दिसत नाही. उलट गावोगाव यात्रा, धार्मिक उत्सव यांचे पेव फुटले आहे. हे सारे श्रद्धेतून घडते असे नाही. तर आर्थिक, मनोरंजन, चेंज या गरजांतून होते. देऊळ मध्ये ग्रामीण समाजाचा हा अंत:स्तर चित्रित झालाय. किशा उन्हातान्हात करडी गाईचा शोध घेतो. भोवळ आल्याने त्याला तंद्रीत दत्त दिसतो, तेही औदुंबराच्या झाडाजवळ. दरम्यान एक सुतार मोबाईलवरून मापे सांगताना त्याच झाडावर खाणाखुणा करतो आणि गावातील मंडळी त्यातून दत्तरुपाचा आकार शोधतात. गावातील राजकारणी भाऊ (नाना पाटेकर) चा पुतन्या आप्पा, महासंग्रामचा पत्रकार व त्यांचे एक दोघे बेकार मित्र याचा फायदा घ्यायचे ठरवतात. दत्त अवतरल्याची बातमी छापतात. महिला सरपंचांचा वापर करून ग्रामसभेत भाऊंच्या तोंडून दत्तमंदिर बांधण्याचे वदवून घेतात. त्यामुळे नाना कुलकर्ण्यांचे ग्रामीण रुग्णालयाचे मॉडेल बाजूला पडते आणि टगेगिरी करणारे तरुण हे त्यांच्या `स्टाईलने` वर्गण्या गोळा करू लागतात. मग सुरु होते साक्षात्काराचे, चमत्काराचे मार्केटिंग. दत्ताच्या कृपेने सारे घडते असे एसेमेस फारवर्ड करणे, यात्रेतल्या स्टाँलचा लिलाव पुकारणे, चमत्कारासाठी साधू आणून बसवणे, करडी मातेचे मंदिर बाधण्याचा घाट घालणे, नव्या मंदिर विस्तारासाठी मंदिरामागची जमीन अधिग्रहित करणे, वेगवेगळे टेंडर काढून त्यातून आपला खिसा भरणे, असे वरवर धार्मिक पण आतून आर्थिक, स्वार्थी व्यवहार सुरु होतात. मुन्नी बदनाम हुई सारख्या लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर दत्ताची गाणी रचली जातात आणि गावात बरकत येते. हे चित्र पाहितले तर असे दिसेल की केवळ देऊळमधील गावचे दर्शन नाही; सगळ्याच धार्मिक स्थळांचे आहे. रुग्णालय आणि देवालय या मानवाने त्याच्या शारीरिक आणि मानसिक दुख: निवारण्यासाठी निर्माण केलेल्या व्यवस्था; पण आज त्या व्यापारी संस्था झाल्या आहेत. त्यामुळे एकूण सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणच ढवळून निघालेय. आपले जगणे मूल्यानिष्ठ न राहता चंगळवादी बनत चालले आहे हे देऊळमधून दाखवले आहे. धार्मिक मार्केटिंग करणारी ‘देऊळ’मधील तरुण पिढी आधी फँशन टीव्ही पाहत असते; तर चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी, म्हाताऱ्या, तरण्या स्त्रिया सुद्धा मालिका पाहण्यात व्यस्त असतात. राहणीमानाचा दर्जा खालावलेला पण मनोरंजनाची चैन हवी असा नवा ग्रामीण चंगळवाद देऊळ मध्ये टिपलाय. एक किशा सोडला तर कुणीच कष्ट करताना दिसत नाही. तरुण मंडळी चहाच्या टपरीवर नाहीतर टी व्ही वरील चावट कार्यक्रम पाहण्यात मग्न. त्यांचे नेतृत्व करणारे भाऊ मधल्या वेळेत बायकोशी सागरगोट्या खेळतात. गावातील सरपंच महिला, पण तिला सासुरवास आहे. राजकीय सत्ता प्राप्त झाली तरी अजून सामाजिक आणि सांस्कृतिक सत्ताप्राप्तीत आरक्षण मिळाले नाही हाही संदेश येथे आहे. नवरा मुंबईला पोट भरण्यासाठी गेलेला. सरपंच महिलेला झेंडावंदनाचाही आत्मविश्वास नाही. भाऊंच्या घरी मोडका संडास तर सरपंचांचाला नीट घरही नाही. तर असे हे निष्क्रिय, आतून असांस्कृतिक असलेले, पोखरलेले गाव. खरेतर आलटून पालटून महाराष्ट्रातील बऱ्याच गावाची स्थिती अशीच. अशा गावात परिवर्तन कसे आणि कोणाकडून घडेल? अशा निष्क्रिय आणि बिना कष्टाने बदल हवा असलेल्या समाजाला `दत्त` लागतो. देऊळ लागते. पुरातत्त्व विभागातर्फे संशोधन सुरु असतेच गावात, त्या पार्श्वभूमीवर दत्त अवतरतात. दत्ताच्या निमित्ताने सर्वांना करिअर करण्याची संधी चालून येते. साधा वर्तमानपत्रवाला पत्रकार न्यूज चँनलचा प्रतिनिधी बनतो. भाऊ आमदार होतात. गावातील सर्वांचे दुकानं, हॉटेल जोरात चालू लागतात. गावात आता रस्ता, वीज, एस. टी. साऱ्या सुविधा होतात. आप्पा- भाऊंचा नवा पुढारी होतो. त्याचे डिजीटल बोर्ड लागतात. हा बदल दिग्दर्शकाने फार सुंदर साकारला आहे. भाऊंच्या मुली इंग्लिश मिडिअम मध्ये शिकतात. घरातील फर्निचर, अंगावरील कपडे बदलतात. खुद्द किशा दुकानातून नवे कपडे घेऊन ते नानाला दाखवायला जातो... तात्पर्य सगळीकडे आनंदी आनंद होतो. दुखी कुणीच नाही. मग अडचण काय? चित्रपट पाहताना प्रेक्षकाला एक सामाजिक दर्शन घडत जाते. पण या दर्शनाने तो हळहळतो. नाना कुलकर्णी म्हणतात, देव हवा त्याने शोधावा, नको त्याने शोधू नये. देव ही अत्यंत खाजगी गोष्ट आहे. साक्षात्कार ही देखील एक अत्यंत वैयक्तिक बाब आहे. आपण आता त्याचे मार्केटिंग, व्यापारीकरण, बाजारीकरण, नव्हे जागतिकीकरण करीत आहो. हा मौलिक संदेश चित्रपटात दडला आहे. तो बटबटीतपणे न सांगून गिरीश कुलकर्णी यांनी नकळत फार मोठी उंची गाठली आहे. संवादातून देखील ते सांगितले नाही. नाही तर हा चित्रपट प्रचारकी झाला असता. विकास म्हणजे नेमके काय? त्याचे मार्ग कोणते? विकास राजकारण आणि धर्म यांचे नेमके परस्पर संबंध काय? ते आता कसे एकमेकात मिसळून गेले आहेत. आधी धार्मिक राजकारणाला विरोध करणारे भाऊ त्यांचा देखील लोकेच्छेपुढे कसा उपाय हटतो? शिवाय ही लोकेच्छा पण कशी कृत्रिम व राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी जन्मास येते, ते सारे वेगवेगळ्या पातळ्यांवर स्पष्ट होत जाते. हे मुळातून खटकते ते नाना आणि किशाला. ज्या गावात शांतता होती तिथे आता कोलाहल आलाय, सामाजिक हितापेक्षा धार्मिक उन्माद आता वाढलाय हे जाणवून नाना गाव सोडून निघून जातो. तर किशाच्या करडी गायीचा मृत्यू होतो. जिने दत्तदर्शन घडवले तिला देव बनवून पैसे लाटण्याच्या नादात तिच्या आजाराची आणि मृत्यूचीही कुणाला फिकीर नाही. दत्त दर्शनाला आसुसलेली आपली आईसुद्धा आता समृद्धी आल्याने पंधरा पंधरा दिवस देवाकडे जात नाही, आणि पहिला साक्षात्कारी पुरुष असून राजकीय नेत्यांसाठी आपल्यालाच देवदर्शनाची बंदी होते हे पाहून किशा अस्वस्थ होतो. मग तो देवाची मूळ मूर्तीच चोरून नदीत विसर्जित करतो. पण त्यामुळे फरक काहीच पडत नाही. दोन दिवसात वाजत गाजत नवी दत्त मूर्तीची स्थापना मंदिरात होते आणि चित्रपट संपतो. चित्रपटातील देऊळ आणि दत्त हे येथे आपल्या ढोंगी, पोकळ संस्कृतीचे दर्शन घडवणारी प्रतीके म्हणून चित्रपटात दाखविली आहेत. स्वसामर्थ्यावरचा, सर्व व्यवस्थावरचा विश्वास उडाला की मनाला समाजाला बाह्य आधार लागतो, तो आधार म्हणजेच देऊळ. पण हा शुद्ध आध्यात्मिक राहिलेला नाही. त्यात आपल्या सगळ्या लौकिक गरजा आणि हेतू बेमालूम मिसळल्या आहेत. म्हणून तर तो सर्वांना हवा आहे. ‘तू झोप तुझा दत्त जागा आहे,’ हे या निष्क्रिय पोकळ व्यवस्थेचे ब्रीदवाक्य आहे. या व्यवस्थेने सर्वांना आव्हान दिले आहे. अगदी कायद्याला सुद्धा. भाऊ म्हणतोच ना, अटक कशी होणार? कायदा आणि नेते यांच्या मध्ये ही मोठी भक्ताची रांग! ओलांडणे महाकठीण. अशा रांगांचाच वापर पुढारी करतात ना!

"समीक्षेचा अंतःस्वर (समीक्षा ग्रंथ)" पानाकडे परत चला.