चर्चा:रामचंद्र चिंतामण ढेरे

२१ जुलै २००९ रोजी ८०व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या अण्णांचे संशोधन आजही सुरू आहे. ‘‘प्राध्यापक होऊन ज्ञानाची उपासना विसरण्याच्या जगात, प्राध्यापक न होता ज्ञानमुग्ध जीवन जगण्याचा योग त्यांना आला’’ हे नरहर कुरुंदकरांचे जवळपास तीस वर्षांपूर्वीचे उद्गार तेव्हाही सार्थ होते, आज तर अधिकच. अविरत, अहर्निश, सतत.. संशोधन- मनन- चिंतन- लेखन यात मग्न असलेल्या अण्णांच्या आयुष्याने ऐंशीचा टप्पा गाठला, नियतीचे हे फार मोठे ऋण आहे. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवणाऱ्या अण्णांना, डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांना हा कृपाप्रसाद म्हणून जाणवणार तर माझ्यासारख्या


त्यांच्या असंख्य वाचकांना येत्या २१ जुलै रोजी अण्णा कुठला खजिना आमच्या हाती देणार याची कृतज्ञतापूर्वक उत्सुकता त्या दिनांकापर्यंत दाबून ठेवणे भाग पडणार. अखेर पेशवाईतल्या नारायणराव पेशवे या बालपेशव्याला खुनी तलवारींपासून वाचवण्याच्या प्रयत्नात ज्या मंडळींनी आपले प्राण वेचले, त्यातल्या इच्छारामपंत ढेरे यांच्या वंशात ढेरे यांचा जन्म झाला. तन-मन धन व काया-वाचा-मन नियोजित संशोधन कार्यात सतत पणाला लावण्याची त्यांची मानसिकता या वारशातून आली का यावर चर्चा करता येईल. खरं तर त्यांच्या आयुष्यात एका टप्प्यावर महाविद्यालयात प्राध्यापक होण्याचा ‘योग’ सफल होण्यात काहीच अडथळा नव्हता, मात्र ‘उद्या’ची चिंता मिटवणारा तो योग अण्णांनी जाणीवपूर्वक नाकारला. कुठलीही नोकरी न करता आवडीच्या संशोधन कार्यात आनंद घेणे त्यांनी पसंत केले. हा मार्ग अलिकडच्या काळात प्रथम चोखाळला इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी. बखरींमधून सांगण्यात येणारा इतिहास बाजूला ठेवत अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहासाची मांडणी करण्याची जी परंपरा राजवाडय़ांपासून महाराष्ट्रात रुजली ती वाट काटेरी कष्टाची. सहज, सोपे असे या वाटेवर काही नसतेच. दुर्लक्ष, अवहेलना, असभ्यपणा, मुद्दाम अडथळे उभे करणे, शारीरिक त्रास, आर्थिक विवंचना हे व असे प्रसंग नित्याचे, सोसण्याचे. यातून मन मोडू देता जशी राजवाडय़ांनी वाट काढली, तशीच ढेरे यांनाही काढावी लागली. राजवाडय़ांच्या कार्यरततेला अनेक पैलू होते, त्यातला एक अति महत्त्वाचा होता ‘राजकीय इतिहास’. ढेरे यांनी आपला तो मार्ग नव्हे असे ठरवून महाराष्ट्राचा ‘सांस्कृतिक इतिहास’ व ‘प्राचीन मराठी साहित्य’ या पैलूंवर लक्ष केंद्रित केले. याचा अर्थ राजकीय इतिहास त्यांना अज्ञात आहे असे नव्हे. त्या क्षेत्रातले सर्व महत्त्वाचे संशोधन त्यांना माहीत असते कारण कालखंड एकच, भूमी एकच. प्रवाहांचे एकमेकावर परिणाम कळत-नकळत होतच असतात. अर्थात राजवाडे-ढेरे यांनी चोखाळलेल्या मार्गाची तुलना इथेच थांबते. या सर्व अनुभवातून राजवाडय़ांच्या स्वभावात एक कडवटपणा, मार्दव संपणे असा परिणाम जाणवतो. मात्र राजवाडय़ांप्रमाणेच सर्व हलाहल पचवून ढेरे यांचे शांत, संयत, विवेकी, ऋजु व्यक्तिमत्व अढळ राहिले. अपशब्द सोडाच, ज्यांनी जाणीवपूर्वक त्रास दिला त्यांच्याबद्दल बोलताना आजही अण्णांचा तोल कधीही जात नाही. सुरुवातीच्या काळात मुद्रितशोधन हा त्यांच्या अर्थार्जनाचा भाग होता. प्रकृती ज्याला बलदंड म्हणतात तशी नव्हती. या सर्वाच्या परिणामी मध्यम वयापासून, प्रकृतीच्या तक्रारी उद्भवणे स्वाभाविक होते, वाढत्या वयात त्या तक्रारीही वाढत्या राहिल्या. मात्र त्या व्याधी सोसणाऱ्या शरीरातले मन सदैव कणखर राहिले, शरीराला कार्यरत ठेवत राहिले. म्हणूनच शंभरहून जास्त ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले. ज्या क्षेत्रात ते वावरतात त्या क्षेत्रात त्यांचे स्थान ‘मेरुमंदार धाकुटे’ असेच आहे. इतिहासाचे कुठलेही अंग असो, संशोधनातून सत्याचे नवे धागेदोरे, त्यांची नवी संगती पुढे आली म्हणजे अनेक जपलेल्या श्रद्धांना तडा जातो. श्रद्धावानांना हे आवडत नाही. नागरी समाजात याला खरे उत्तर नवा पुरावा समोर ठेवणे, तर्कशुद्ध चुका दाखवणे, नवी संगती मांडणे असे असायला हवे. मात्र आपला समाज ‘श्रद्धा’ हाच पुरावा या हट्टाग्रहातून बाहेर येत नाही, तो येऊ नये म्हणून पद्धतशीर प्रयत्नही सुरू असतात. यातून वाद निर्माण होणारच. असा एक वाद ‘श्री विठ्ठल-एक महासमन्वय’ या महाग्रंथावेळी निर्माण झाला होता. ढेरे या वादविवादात कधीच भाग घेत नाहीत. जे सापडले ते मांडून झाले आता व्यर्थ दवडायला वेळ आहे कुठे? पुढच्या नियोजित विषयाकडे वळलेले असतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात रस असणाऱ्यांना रा. चिं. ढेरे हे नाव अपरिचित नव्हते. हा परीघ ओलांडून त्यांचे नाव गाजले ते ‘लज्जागौरी’ हा ग्रंथ आला तेव्हा. ‘देवा आम्हाला भरपूर अन्न दे, पुष्कळ मुलेबाळे दे’ ही प्रार्थना ऋग्वेदापासून जगभर मानवसमूहांनी आर्ततेने केली आहे. स्त्रीच्या गर्भातून जन्माला येत असलेले मूल व पृथ्वीच्या गर्भातून उगवणारे पीक या सतत घडणाऱ्या निर्मितीतले नाविन्य व साम्य यातून मानवी संस्कृतीत असंख्य रुढी-आचार, प्रतिमा, संकल्पना, श्रद्धा, पूजाविषय यांची भर पडली आहे. यांचा अभ्यास समाजशास्त्राचे अविभाज्य अंग आहे. ब्रिफॉच्या ‘दि मदर्स’पासून देवीप्रसाद चट्टोपाध्यायांच्या ‘लोकायत’पर्यंत प्रज्ञावंतांनी या घटकांचा शोध-संगतीचा प्रयत्न सतत केला आहे. मराठीत ‘लंकेची पार्वती’ म्हटले जाते, अंग झाकण्याएवढे वस्त्रही जवळ नसलेल्या स्त्रीला उद्देशून. कैलासराणा शंकराची पत्नी पार्वती रावणाच्या लंकेत कशी व समजा गेलीच तर आपल्या आराध्य दैवताच्या सहचारिणीला रावण असा विपन्नावस्थेत राहू देणे शक्य आहे का? मराठीतल्या एका साध्या वाक्प्रचारातून हे प्रश्न उभे करत ही लंकेची पार्वती नसून लंजा (नग्न) गौरी-लज्जागौरी आहे, निर्मितीचे पूजास्थान आहे, एक फार मोठा सांस्कृतिक कालखंड या दैवताने व्यापला होता, मूर्ती-शिल्प-चित्र ते वाक्प्रचार असा हा प्रवास पुराव्यांचे ढीग उभे करत ढेरे यांनी मांडला. महानुभाव साहित्य टाळून सांस्कृतिक मराठी इतिहासाला पुढे जाताच येणार नाही. कागदपत्रे शोधयात्रेत अशीच एक पोथी (काही त्रुटीत) ढेरे यांच्या हाती लागली व त्यातून ‘चक्रपाणी’ या त्यांच्या प्रबंधाचा जन्म झाला. एमए न झालेल्या ढेरे यांनी छापील ग्रंथच पीएच.डी.साठी सादर केला. नियमावर बोट ठेवून चालणाऱ्या आपल्या संस्थांमध्ये खळखळ करून का होईना अपवाद म्हणून प्रबंध स्वीकारला गेला, अण्णा आता डॉ. रा. चिं. ढेरे म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र नको तिथे खळखळ केल्याचा प्रमाद पुढे त्यांना सन्माननीय ‘डि.लिट.’ अर्पण करून सावरणे हा उमदेपणाही दिसला. मराठी, संस्कृत या भाषा तर त्यांच्या दाट परिचयाच्या. नाणी, शिलालेख, प्राचीन मराठी, संतसाहित्य, स्थानमहात्म्यपोथ्या, मूर्ती-शिल्प, देवळे-राऊळे, वाक्प्रचार-म्हणी, व्युत्पत्ती, रुढी-उपचार-परंपरा- हा सर्व पसारा अभ्यासाची सामुग्री. हिंदी-इंग्रजीमधून आपल्या अभ्यासविषयात काही नवे आले आहे का इकडे सूक्ष्म नजर. हे सर्व करताना श्रम-येरझारे अकारणी वेळखाऊ होऊ नयेत म्हणून सतत वाढता ग्रंथसंग्रह. त्यांच्या शनिवारपेठेच्या राहत्या जागेत आधी पुस्तकांची सोय नीट लागली म्हणजे उरलेल्या जागेत माणसे राहात. आता सहकारनगरच्या नव्या वास्तूत नामवंत संस्थांना हेवा वाटावा असे हे ग्रंथ-आलय विसावले आहे. अण्णांच्या खूप निकटच्या मित्रांपैकी जग प्रथम अकाली सोडणारे नांदेडचे नरहर कुरुंदकर. हा जिव्हारी लागलेला घाव. गुंथर सोन्थाय, मधूकाका कुळकर्णी असेच चटका लावून गेले. पण अण्णांचे घर म्हणजे आपले माहेर मानणाऱ्या अ‍ॅरिझोना स्टेट विद्यापीठाच्या डॉ. अ‍ॅन्. फेल्डहाऊस, सांगलीच्या (यक्षगान- मराठी नाटक), डॉ. तारा भवाळकर, भांडारकर संस्थेचे ग्रंथालय पोटच्या पोराप्रमाणे जपलेले वा. ल. मंजुळ.. अण्णा सभा-समारंभात रमत नाहीत. (सहसा जातही नाहीत) पण ज्ञानराज्यात वावरणाऱ्या या व अशा अनेकांच्या संगतीत ‘सुखिया’ होतात. अरुणा आज महाराष्ट्रात लेखिका-कवयित्री-वक्ता म्हणून आत्मविश्वासाने नवीनवी शिखरे सर करीत आहे, वर्षां आता लेख, सदर लेखन या अनुभवातून ‘गॉन विथ द विंड’सारख्या अभिजात महाकादंबरीचे मराठी रुपांतर घेऊन येत आहे. वर्षांचा मुलगा ऋत्विक कोवळ्या वयात स्वर-लय-ताल यांची जी जाण दाखवतो आहे. ती विलोभनीय आहे. चिरंजीव आपल्या व्यवसायात मग्न आहे. आत्या (अण्णांच्या भगिनी) सतत त्या घराचे घरपण टिकवण्यात गढलेल्या असतात हसतमुखाने. आमच्या ताई म्हणजे अण्णांच्या जीवनसाथी. नरहर कुरुंदकर त्यांना ‘डॉक्टरीणबाई’ म्हणत, त्यात थोडा खटय़ाळपणा होता. पण अण्णांच्या सर्व लिखाणाच्या पहिल्या वाचक त्या असतात याची ती पावतीही आहे. हिमालयात प्रवास करताना एक भव्य शिखर पाहावे तर पुढे दुसरे, त्यापुढे आणखी एक.. आपण अचंबित होतो. चक्रपाणी, लज्जागौरी, हे सर्व कमी होते की काय, म्हणून ‘शिखर शिंगणापूर’ आले, देवगिरी, होयसळ, विजयनगर- रायगड- हे दक्षिणेतल्या विजिगिषुंचे सातत्य प्रस्थापित झाले. मागोमाग लोकमाता तुळजाभवानीचा पावित्र्यसंभार समोर आला (तिसरी आवृत्ती लवकरच) आणि आता २१ जुलैला अण्णा ऐंशीव्या वर्षांत पदार्पण करताना येत आहे करवीरनिवासी महालक्ष्मी. ‘‘प्राध्यापक होऊन ज्ञानाची उपासना विसरण्याच्या जगात, प्राध्यापक न होता ज्ञानमुग्ध जीवन जगण्याचा योग त्यांना आला’’ हे नरहर कुरुंदकरांचे जवळपास तीस वर्षांपूर्वीचे उद्गार तेव्हाही सार्थ होते, आज तर अधिकच. अण्णा दर्शवत नसले तरी त्यांची काही शल्ये जाणवतातच. त्यांनी आपल्यासाठी जी विषयाची चौकट आखून घेतलेली असते, त्यात संशोधन-चिंतन करताना त्यांना त्याच्या चौकटीबाहेर जाणाऱ्या पण सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाच्या असणाऱ्या दिशा-विषय, बाबी लक्षात येतात. भरकटू नये म्हणून त्यांचा निर्देश करत ते आपल्या प्रमेयात पुढे जातात. चिंता जाणवते ती ही की पुढची विशेषत: तरुण पिढी हे धागे हाती घेऊन पुढचा शोध घेण्यासाठी पुढे येणार का? नवा पुरावा, तर्कसंगती, पुनर्माडणी या मार्गावरून जाण्याऐवजी डोकेफोडी, शिवीगाळ इकडे झुकाव वाढता का?

"रामचंद्र चिंतामण ढेरे" पानाकडे परत चला.