उर्ध्वमुलमधःशाखमश्र्वत्थं प्राहूरव्ययम्
छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्

ब्रम्ह ज्याचे मूळ आहे आणि ज्याच्या शाखा इहलोकात आहेत अशा संसाररुप अश्र्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात.वेद ही ज्याची पाने आहेत त्या संसाररुपी अश्वत्थाला जाणणारा तो वेदवेत्ता किंवा ज्ञानी जाणावा.श्रीमद् भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण असेही म्हणतात,'अश्र्वत्थं सर्ववृक्षाणां'-'वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे.
वेदिक काळापासून चिरपरिचित असलेल्या पुरातन वृक्षसंपदेत अश्र्वत्थ अथवा पिंपळवृक्षाचा प्रथम क्रमांक लागतो. पिंपळाच्या देवत्वाबद्दलचे अनेक उल्लेख वेद पुराणात ठायीठायी आढळतात. अश्र्वत्थास प्रथम सृष्टीकर्त्या प्रजापतीचे प्रतिक मानीत असत, परंतु दैत्यापासून बचाव करण्यासाठी विष्णूने पिंपळाच्या झाडाचा आश्रय घेतल्याने पिंपळाला विष्णू मानून त्याची पूजा करण्याचे उल्लेख ब्रम्ह व पद्म पुराणात आहेत. स्कांद्पुरणात विष्णूंचा जन्मच पिंपळवृक्षाखाली झाल्याने त्यास विष्णुरूप मानले आहे. तसेच वंशपरंपरा व कुलवृद्धीसाठी पिंपळाला पुत्र मानावे असे सांगितले असून त्यांचे उपनयन आणि विवाह आदि उपचारही करण्यास सांगितले आहेत. अश्र्वत्थवृक्षाला त्रीमुर्तीचे निवासस्थानही म्हटले आहे कारण त्याच्या मुळात ब्रम्हा, खोडात विष्णू आणि पानात शंकराचा वास असल्याचे नमूद केले आहे. कृष्णाने अश्र्वत्थाखालीच आपले पृथ्वीवरील वास्तव्य संपवले आणि कलियुगास सुरुवात झाली. वेदपूर्वकाळात सिंधूसंस्कृतीतही अश्र्वत्थाला निर्मितीचे प्रतिक मानले आहे. मोहेंजोदरो येथील उत्खननात सापडलेल्या मुद्रांवर एक देवता पिंपळाच्या फांद्यांमध्ये उभी असलेली दाखवलेली आहे. तसेच पिंपळाच्या रोपाचे रक्षण करणाऱ्या दोन देवतांचीही चित्रे आहेत. सिंधूजणांची श्रेष्ठ देवता महिषामुंड हि अश्र्वत्थवासी असल्याचे उल्लेखही आढळतात. पुरण-कालीन वाङमयात कडूलिंबाचे अन् अश्र्वत्थाचे लग्न अमावस्येला लागल्याची नोंद आहे. देवळाच्या सानिध्यात राहिल्याने धर्माचा रंग चढून कि काय याची प्रजाती रीलीजीओसा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपळाचे मूळ जन्मस्थान भारत व दक्षिणपूर्व आशियात असून तो प्रामुख्याने नेपाळ, चीन, इंडोनेशिया अन् व्हिएतनाममध्ये आढळतो. अनेक विषुववृत्तीय प्रदेशातही तसेच अमेरिका खंडात दक्षिण कॅलिफोर्निया, फ्लोरिडा आणि हवाई बेटांवर त्याचे अस्तित्व जाणवते. दीर्घायुषी असलेला हा पिंपळवृक्ष हिंदू, जैन आणि बौद्ध लोकांच्यात अश्र्वत्थ, पिंपळ, बोधिवृक्ष, जारी अशा विविध नावांनी प्रसिद्ध आहे. भारत, चीन इंडोनेशिया इथल्या पिंपळवृक्षाचे देवळांशी अथवा धर्म स्थानांशी असलेले पवित्र नाते विशेष जाणवते. सर्वात सुप्रसिद्ध असा 'बोधिवृक्ष' बिहारमधील पाटना शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असून त्याच्याच सानिध्यात गौतम बुद्धाला अलौकिक असे विश्वज्ञान प्राप्त झाले होते. दुसरा असा अतिप्राचीन पिंपळ वृक्ष ख्रिस्तपूर्व २८८ मध्ये भारतातून श्रीलंकेत नेल्याची नोंद आहे. आजही तो वृक्ष तिथे जिवंत असून त्याचे आजचे वय सुमारे २४७७ वर्षे आहे असे मानण्यात येते.

Start a discussion about पिंपळ

Start a discussion
"पिंपळ" पानाकडे परत चला.