चर्चा:त्र्यंबक शंकर शेजवलकर

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by Misslinius

शेजवलकर, त्र्यंबक शंकर : (२५ मे १८९५-२८ नोव्हेंबर १९६३). - सु. र. देशपांडे

मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक व इतिहासकार. राजापूर तालुक्यातील (जि. रत्नागिरी) कशेळी येथे जन्म. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून मॅट्रिक (१९११) व विल्सन महाविद्यालयातून बी.ए. (१९१७). पुढे मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात नोकरी (१९१८). हे खाते पुण्यास वानवडी येथे हलविण्यात आल्याने शेजवलकर पुण्यास आले; मात्र २० जून १९२१ पर्यंतच ते या नोकरीत राहिले.

पुण्यात असताना ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद झाले. साहजिकच त्यांचा दत्तो वामन पोतदार, दत्तोपंत आपटे, गो. स. सरदेसाई प्रभृतींशी परिचय झाला. या वास्तव्यात गो. स. सरदेसाई यांनी त्यांना बडोद्यास आपल्या सहकार्यास येण्याचे आवाहन केले व त्यानुसार ते बडोद्यास गेले (१९२२); तथापि त्यांना प्रबंधाद्वारे एम्.ए. ही पदवी घ्यावयाची होती, म्हणून ते मुंबईस आले. ‘ मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव ’ हा प्रबंध त्यांनी मुंबई विद्यापीठास सादर केला; परंतु परीक्षकांशी मतभेद झाल्यामुळे त्यांना पदवी मिळू शकली नाही. पुढे हा इंग्रजी प्रबंध पुस्तकरुपात प्रकाशित झाला (१९९८).

बडोद्याच्या वास्तव्यात शेजवलकरांच्या गुणवत्तेमुळे रियासतकार सरदेसाई प्रभावित झाले होते. त्यामुळे जेव्हा त्यांनी नानासाहेब पेशवे हे पुस्तक लिहिले (१९२६), तेव्हा शेजवलकरांना त्यास प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. त्यांनी भिन्न मतप्रदर्शक व विचारप्रवर्तक अशी दीर्घ प्रस्तावना लिहिली. तेव्हापासून एक साक्षेपी इतिहासकार म्हणून शेजवलकरांचा नावलौकिक झाला.

कर्नाटक छापखान्याने (मुंबई) काढलेल्या प्रगति ह्या साप्ताहिकाचे संपादन त्यांनी केले (१९२९-३२) आणि त्याद्वारे अनेक विचारप्रवर्तक लेख लिहिले; पण ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे ते साप्ताहिक बंद पडले. त्यानंतरचा त्यांचा पाच-सहा वर्षांचा काळ हलाखीत गेला. पुढे मराठ्यांच्या इतिहासाचे प्रपाठक म्हणून त्यांची डेक्कन कॉलेज (पुणे) येथे नियुक्ती झाली (१९३९). तिथून ते १९५५ मध्ये निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही गुणश्री प्राध्यापक म्हणून ते डेक्कन कॉलेजात काम करीत. शेजवलकरांचे एक मित्र ह. वि. मोटे यांनी प्रगति साप्ताहिकात व इतरत्र प्रसिद्घ झालेले काही स्फुटलेख शेजवलकरांचे लेख-प्रथम खंड (१९४०) व शेजवलकरांचे लेख : खंड २ रा (१९५९) प्रकाशित केले. शेजवलकरांनी इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांत पुढील मोजकीच पुस्तके लिहिली : दत्तोपंत आपटे : व्यक्तिदर्शन (१९४५), पानिपत : १७६१ (इंग्रजी-१९४६), निजाम-पेशवे संबंध (१९५९), पानिपत : १७६१(मराठी-१९६१) इत्यादी. यांशिवाय त्यांनी काही ऐतिहासिक मूळ पत्रे संपादून नागपूर अफेअर्स भाग १ व २ (१९५४ व १९५९) या शीर्षकाने प्रसिद्घ केली.

मुंबईच्या मराठा मंदिर या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्र लिहिण्याचे काम सोपविले होते (१९५८). अखेरपर्यंत ते या कामात व्यग्र होते; परंतुप्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांचे शिवचरित्र पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेने त्यांनी लिहून ठेवलेली संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना(काही भाग), लेख, टिपणे, चरित्राचा आराखडा, ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे, कौटुंबिक माहिती इ. साहित्य श्री शिवछत्रपति : संकल्पित शिव-चरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने या शीर्षकाखाली प्रसिद्घ केले (१९६४). या ग्रंथावरुन शेजवलकरांचा प्रदीर्घ व्यासंग, स्वतंत्र प्रज्ञा आणि निर्भीड ऐतिहासिक दृष्टिकोन यांचे प्रत्यंतर येते. हे अपूर्ण शिवचरित्र पुढील पिढीस एक अत्यंत विश्वसनीय असा संदर्भग्रंथ ठरले आहे. या ग्रंथासाठी शेजवलकरांना ‘ साहित्य अकादमी पुरस्कारा ’चा (मरणोत्तर) बहुमान मिळाला.

या ग्रंथलेखनाबरोबरच त्यांनी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, गौरवग्रंथ आदींमधून पुष्कळ लेखन केले. तसेच भारत इतिहास संशोधक मंडळातही शोधनिबंध वाचले. यांपैकी काही लेख, त्र्यंबक शंकर शेजवलकर : निवडक लेखसंग्रह या नावाने ह. वि. मोटे यांनी प्रसिद्घ केले आहेत (१९७७). त्यांनी केलेली काही ग्रंथपरीक्षणे त्यांच्या मर्मभेदक व स्वतंत्र समीक्षादृष्टीची निदर्शक आहेत. त्यांचे पानिपत व शिवचरित्र ... साधने हे दोन ग्रंथ विशेष मान्यता पावले. पानिपत हा ग्रंथ शेजवलकरांनी जदुनाथ सरकारांचे दोषपूर्ण विवेचन व मराठ्यांवरील अन्यायकारक टीका, याला उत्तर म्हणून लिहिला. विविध प्रकारच्या ऐतिहासिक साधनांची सूक्ष्म चिकित्सा, नकाशांचा सूक्ष्म अभ्यास, प्रत्यक्ष भेटी देऊन भौगालिक स्थळांचे सूक्ष्म निरीक्षण, आंतरशाखीय दृष्टी यांचा ताळमेळ घालून हा ग्रंथ लिहिला आहे. इतिहास-संशोधनपद्घतीत या ग्रंथाने एक उच्च् मानदंड निर्माण केला आहे. त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण, चिकित्सक, विचारप्रवर्तक, अन्वयार्थी आणि बहुआयामी आहे. क्वचित त्यात विसंगती आढळते.

मराठ्यांचा सर्वांगीण इतिहास हा त्यांचा अभ्यासविषय होता. पेशवाईच्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या धोरणापासून जी फारकत घेतली गेली, तिच्यावर बोट ठेवून आणि मराठ्यांच्या अवनतीसाठी पेशव्यांना जबाबदार धरुन त्यांनी कठोर चिकित्सा केली. स्वातंत्र्य, समता व बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्त्वत्रयीमुळे शेजवलकर प्रभावित झाले होते. या तत्त्वांच्या निकषावर त्यांनी वेळोवेळी केलेली ऐतिहासिक चिकित्सा अभ्यसनीय आहे. भूतकाळाबाबत अशी चर्चा करतानाच वर्तमानाच्या संदर्भात राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा या दोहोंचा मेळ घालण्यावर त्यांनी भर दिला. इतिहासाचार्य राजवाडे यांच्याप्रमाणे फटकळ व आग्रही तसेच प्रखर बुद्घिमत्तेचे आणि चतुरस्र विद्वान म्हणून शेजवलकर ओळखले जातात. ते निव्वळ संकलक-संशोधक नव्हते, तर इतिहासाचे प्रतिभावंत भाष्यकार आणि समाजचिंतक होते. आधुनिक मराठी इतिहासलेखनपरंपरेत तात्त्विक, बहुशाखीय आणि स्वयंभू मर्मदृष्टी लाभलेल्या न्यायमूर्ती म. गो. रानडे व वि. का. राजवाडे यांच्यासारख्या मोजक्या इतिहासकारांमध्ये शेजवलकर यांची गणना करावी लागेल. शेजवलकर हे अविवाहित होते. पुणे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : 1. Joshi, Arun, “Introduction”, in Shejwalkar, T. S. The Influence of Muhammadan Culture on the Hindu Civilization, Mumbai, 1998. २. कंटक, माधव रा. “ दुसऱ्या आवृत्तीविषयी ”, समाविष्ट शेजवलकर, त्र्यं. शं. पानिपत : १७६१, पुणे, १९९४. ३. दीक्षित, राजा, संपा. निवडक शेजवलकर, नवी दिल्ली, २००७. ४. देशपांडे, सु. र. मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकार, पुणे, २००६. ५. पौडवाल, सुषमा, त्र्यंबक शंकर शेजवलकर सूची, मुंबई, १९९५. ६. मोटे, ह. वि. संक. त्र्यंबक शंकर शेजवलकर : निवडक लेखसंग्रह, खंड १, २, मुंबई, १९७७. ७. वैद्य, सरोजिनी, संपा. त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३), मुंबई, १९९५

Misslinius (चर्चा) ०१:२४, १७ मे २०१३ (IST)Reply

"त्र्यंबक शंकर शेजवलकर" पानाकडे परत चला.