चर्चा:गोविंद गोपाळ गायकवाड

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/max+maharashtra-epaper-maxmar/govind+gopal+mahar+yancha+itihas+pusala+jatoy-newsid-105119524

गोविंद गोपाळ महार यांचा इतिहास पुसला जातोय..? गतवर्षी कोरेगाव भीमा येथे भीषण दंगल उसळल्या नंतर गोविंद गोपाळ महार ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा चर्चेत आली होती. पण ही दंगल घडून गेल्याच्या एक वर्षाच्या आतच गोविंद गोपाळ महार यांना इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा प्रश्न भीमा कोरेगाव आणि वढू बु. येथील स्थितीजन्य परिस्थिती पाहता पडू लागला आहे.पुणे शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर वढू बु. हे गाव आहे या गावात दोन ऐतिहासिक समाध्या आहेत. यात एक स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे. तर दुसरी याच संभाजी राजांना अग्नी डाग देणाऱ्या गोविंद गोपाळ महार (सध्या हा इतिहास वादग्रस्त आहे) यांची समाधी आहे. तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारल्या नंतर त्यांच्या देहाचे छिन्न विच्छिन्न देह भीमा नदीत टाकून दिले. देहाचे हेच तुकडे नदीच्या पाण्यावर वाहून जात असताना गोविंद गोपाळ या महारावड्यातील एका धाडसी व्यक्तीने आपल्या मुलगी जनाई हिला धुणे धुवायच्या बहण्याखाली नदीत पाठवून ते काढून घेतले, नंतर एका चर्मकार व्यक्तीला बोलवून घेऊन हे सर्व तुकडे शिवून घेतले. आणि महारावाड्याशेजारी असलेल्या घनदाट जंगलात त्यांना अग्नी दिला. काटेरी निवडुंग आणि सावरीच्या घनदाट जंगलात अग्नी दिला जंगलात अग्नी यासाठी दिला की, नदीच्या पलीकडे असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याला इथे काहीतरी जाळलं जातंय हे कळू नये म्हणून. त्यातही हा देह अर्धवटच जाळला आणि तात्काळ तो पुरून टाकला. कालांतराने त्याच ठिकाणी संभाजी महाराजांचे स्मारक उभे आहे. गोविंद गोपाळ महार हे त्या रायप्पा महार यांचे सख्खे मावस भाऊ होते ज्या रायप्पा महार याने पेडगावच्या बहादूर गड किल्ल्यातून संभाजी महाराजांना सोडवण्याचा शेवटचा धाडसी प्रयत्न केला होता. ज्यात त्याला आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागलं… या इतिसाबाबत जेष्ठ संशोधक अशोक नगरे यांनी इतिहासातील जुने संधर्भ आणि कागदपत्रे शोधून माहिती दिली आहे. पण हाच इतिहास वढू बु. येथील स्वाभिमानी मराठ्यांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं आहे. की संभाजी राजाच्या देहाला मराठा समाजानेच अग्नी दिला आहे. वढू बु. या गावात सध्या शिवले आडनावाचे लोक राहतात. या शिवले यांच्यापैकी काहीजणांनकडे देशमुखी आहे. याच गावातील धर्मवीर संभाजी महाराज स्मृती स्मारक समितीचे अध्यक्ष असलेले सोमनाथ भंडारी यांचा असा दावा आहे की, शिवले देशमुख यांचे आडनाव पूर्वी शिर्के होते. पण संभाजी महाराजांच्या देहाचे वाहत जाणारे तुकडे गोळा करून ते शिवले देशमुख यांनी शिवून काढले म्हणून त्यांचे आडनाव शिवले असे पडले. पुढे याच शिवले यांनी संभाजी राजांच्या देहाला अग्नी दिला. म्हणून त्यांना महाराणी येशूबाई यांनी देशमुखी प्रदान केली. पण याबाबत दोन प्रश्न उपस्थित होतात ते असे की त्याकाळी शिवण्याची कामं ही चर्मकार समाज करत होता. गावात चर्मकार असताना मराठा समाजाने देह शिवण्याचं काम केलं असेल का.? आणि दुसरं देशमुखी देण्याचा अधिकार हा महाराणी किंवा राजमाता यांना इतिहासात होता का.? महाराणी येशूबाई यांनी समाधीस्थळाला जेंव्हा भेट दिली तेंव्हा त्या महाराणी नसून राजमाता होत्या कारण त्यावेळी येशूबाई यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे गादीवर बसले होते. मात्र याबाबत आपल्याकडे महाराणी येशूबाई यांचं तत्कालीन पत्र असल्याचा दावा सोमनाथ भंडारे यांनी केला. पण तुम्ही दिवसा आला असतात तर मी ते पत्र आपल्याला दाखवलं असतं, आता परत पत्र पाहायचं असेल तर 1 जानेवारी नंतर या असं उत्तर दिलं. याबाबत आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो हा की, संभाजी महाराजांची समाधी 1939 साली जेष्ट इतिहास तज्ञ वा. सी. बेंद्रे यांनी बाभळीच्या जंगलाने वेढलेल्या निबिड अरण्यातून संभाजी महाराजांची समाधी शोधून काढली. मग ज्या शिवले देशमुखांना महाराणी येशूबाई यांनी संभाजी महाराजांच्या समाधीच्या देखभालीसाठी देशमुखी प्रदान केली. ते शिवले देशमुख समाधी निबिड अरण्यात वेढली जाईपर्यंत कुठे मजा मारत होते. आज स्वाभिमानाने उर बडवून घेणारे शिवले देशमुख संभाजी राजांच्या समाधीची दुर्दशा होत असताना काय करत होते असाही सवाल उपस्थित होतो. समाधी शोधून काढल्यानंतर आज तिथे स्मारक उभे होईपर्यंतही त्या शिवले देशमुखांना स्मारक समितीत कुठलेही मनाचे स्थान मिळालेले नाही हे मात्र विशेष..! पण तरीही गोविंद गोपाळ महार यांचे नाव इतिहासातून पुसून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न वढू या गावातील मराठा समाजाकडून सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. गेल्या वर्षी गणपत महार यांच्या समाधीवर शेड आणि भोवती सुशोभीकरण का केले म्हणून समाधीची मोडतोड करण्यात आली होती. तर गोविंद गोपाळ महार यांची माहिती सांगणार एक बोर्ड तिथे लावण्यात आला होता. तो बोर्डही आक्षेपार्ह मजकूर असल्याचं कारण देत फाडून टाकण्यात आला होता. गतवर्षी गोविंद गोपाळ यांना इतिहासातून अशा पद्धतीने पुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर यावर्षी मात्र त्यांचं नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय? असा प्रश्न पडतोय. कारण वढू बु. इथे जिथे संभाजी महाराजांची समाधी आहे. तिथे पूर्वी माहिती देणारा एक बोर्ड होता ज्या बोर्डवर गोविंद गोपाळ महार यांचा उल्लेख होता. 'या वृंदावणाच्या तीन सेवेकाऱ्यांपैकी एक गोविंद गोपाळ हा महार जातीचा होता हे विशेष होय' असा उल्लेख पूर्वीच्या बोर्डवर होता. पण गेल्या वर्षभरात हा बोर्ड बदलण्यात आला असून त्या बोर्डवरून गोविंद गोपाळ यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे. इतके वादग्रस्त प्रकरण असतानाही पोलिसांनीही हा बोर्ड कसा काय काढू दिला असा प्रश्न आहे. किंवा या प्रकाराला प्रशासनाची फूस आहे का? असा सवालही प्रशासनाच्या निष्क्रियेतेवरून समोर येतो आहे. हा बोर्ड कुणी काढला याबाबत विचारणा करण्यासाठी मी जेंव्हा संभाजी महाराज स्मारकावर गेलो तेंव्हा तिथे समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. स्मारकावर मला फोटो काढण्यासाठी मनाई करणारे स्मारकाचे कर्मचारी अनिल भंडारे यांना जेंव्हा बोर्ड कुणी बदलला असा प्रश्न विचारला तेंव्हा 'कुठलाही बोर्ड बदलेला नाही, पूर्वीपासून हाच बोर्ड आहे असं उत्तर त्यांनी दिलं' त्यानंतर मी ग्रामपंचायत मध्ये जाऊन याबाबत चौकशी केली. तेंव्हा सरपंच या गावात राहत नाहीत तर त्या गाव सोडून बाहेर रांजणगावला राहतात असे कळले. त्यांचा नंबर घेऊन त्यांना फोन केला फोनवर रिंग गेली मात्र रिसीव झाला नाही. काही वेळाने तो फोनही स्विच ऑफ झाला. रेखा शिवले या गावाच्या सरपंच आहेत. याबाबत पुन्हा उपसरपंच यांना फोनवर संपर्क करून चौकशी केली असता त्यांनी आपण लग्नात आहोत बोलू शकत नाही असं उत्तर दिलं.शेवटी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण स्मारकावरील कर्मचाऱ्यांनी त्यांनी नंबर बदललाय नवीन नंबर आपल्याकडे नाही असं उत्तर दिलं. पण शेवटी गावात चौकशी करत सोमनाथ भंडारी यांच्या घरी गेलो तेंव्हा भंडारी हे शेतात असल्याचं कळलं, त्यांच्या मुलांकडून त्यांचा मोबाईल नंबर घेऊन संपर्क केला तेंव्हा त्यांनी एक तासांनी येणार आहे. तेंव्हा भेटू असे उत्तर दिले. पण तासाभरानंतर ते भेटतील का प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आम्ही थेट त्यांच्या शेतात जाण्याचा निर्णय घेतला. घरापासून तीन किलोमीटर अंतरावर कमळीचा मळा इथे असलेल्या त्यांच्या शेतात जाऊन आम्ही त्यांना चौकशी केली तेंव्हा त्यांनी 'तो बोर्ड आपण काढला नसून ग्रामपंचायतीने काढला आहे. आणि एखादी वादग्रस्त गोष्ट भांडणे होऊ नये म्हणून बाजूला ठेवली तर काय बिघडलं' असा सवालही त्यांनी विचारला त्यामुळे गोविंद महार यांचा उल्लेख असलेला तो बोर्ड संपुर्ण गावाणेच संमतीने काढला असल्याचं जाणवलं..! तर दुसरीकडे गावात जिथे गोविंद महार यांची समाधी आहे. त्या ठिकाणी यावर्षी प्रशासनाने चांगला शेड उभारला असून दर्शनाला येणाऱ्या भाविकांना सोयीचं पडावं यासाठी बॅरिगेटिंगही केली आहे. पण सदर समाधी कुणाची आहे. प्रशासनाने कुणाच्या समाधीसाठी शेड उभारलाय किंवा कुणाच्या समाधीला बॅरिगेटिंग केलीय पण गोविंद महार हे कोण होते याबाबत माहिती देणारा कुठलाही फलक प्रशासनाच्या वतीने उभारलेला नाहीय. त्याचबरोबर इतरही कुणाला गोविंद महार समाधी परिसरात बोर्ड उभा करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाला सोयी तर पुरवायच्या आहेत. पण इतिहास समोर येऊ द्यायचा नाही का? अशी परिस्थिती दिसून येत आहे. प्रशासनाची वेळ मारून नेण्याची वृत्ती आणि गावकऱ्यांची घेतलेली भूमिका यामुळे गोविंद गोपाळ महार या धाडसी ऐतिहासिक व्यक्तिरेखेला इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

Start a discussion about गोविंद गोपाळ गायकवाड

Start a discussion
"गोविंद गोपाळ गायकवाड" पानाकडे परत चला.