पाकिस्तान व अफगाणिस्तान यांना जोडणारी पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीवरील सुप्रसिद्ध खिंड. ही हिंदुकुश पर्वताच्या सफेद कोह श्रेणीत पेशावरपासून सु. १७ किमी. असून तिच्यातून लमाणमार्ग, पक्की सडक व जामरूद ते लंडीखाना लोहमार्ग गेले आहेत. तिच्या दोहो बाजूंस १८० मी. ते ३०० मी. उंचीचे शेल व चुनखडक असून त्यांच्यामागे त्याहीपेक्षा उंच डोंगर आहेत. पेशावरपासून सु. ११ किमी. जामरूदचा भक्कम किल्ला आहे. तेथून ५ किमी. वर सुरू होऊन ही खिंड ५३ किमी. वायव्येस काबूल नदीकाठच्या लोह डाक्काच्या उजाड मैदानापर्यंत जाते. जामरूदचा किल्ला रणजितसिंगाचा सेनापती हरिसिंग नलवा याने बांधला. ९६७ मी. उंचीवर अली मस्जिद किल्ला आहे. येथून पुढे खिंड अगदी अरुंद, काही ठिकाणी केवळ ४·५ मी., झाली आहे. येथून १६ किमी. पश्चिमेस १,०७२ मी. उंचीवरील लंडीकोटल किल्ला आहे. हे या खिंडीतील सर्वांत उंच ठिकाण होय. येथून शिनवारी प्रदेशातून लंडीखाना येथे एका निदरीतून जावे लागते. लंडीकोटलच्या पश्चिमेस ९·५ किमी. वर ७०० मी. उंचीवरील तोर्खम येथे अफगाणिस्तानची हद्द सुरू होते.


प्राचीन काळी भारताचा मध्य आशियाशी व्यापार या खिंडीमार्गे चाले. आर्य लोक याच मार्गाने सिंधूच्या मैदानात उतरले. डरायसनंतर शिकंदरही याच मार्गाने आला असावा. गझनीचा महंमद, नादिरशाह, बाबर, अब्दाली इत्यादींच्या भारतावरील स्वाऱ्या याच मार्गाने झाल्या. यामुळे लष्करी दृष्ट्या ही खिंड महत्त्वाची ठरली आहे.


एकोणिसाव्या शतकात अफगाण युद्धांमुळे ब्रिटिशांचा ह्या खिंडीशी संबंध आला. दुसऱ्या अफगाण युद्धानंतर आफ्रिडी टोळ्यांना मदत देऊन त्यांच्यामार्फत खैबरच्या रक्षणाची व गस्त घालण्याची ब्रिटिशांनी व्यवस्था केली; पण ती समाधानकारक ठरली नाही. तिसऱ्या अफगाण युद्धानंतर अफाट खर्च करून खिंडीच्या तोंडापर्यंत रेल्वेमार्ग तयार करण्यात आला. त्यावर ३४ बोगदे व लहानमोठे ९२ पूल आहेत. खिंडीतून अफगाण हद्दीपर्यंत पक्की सडक व जागोजाग संरक्षणासाठी किल्ले बांधून शिबंदी ठेवण्यात आली. त्यानंतर संरक्षणाची जबाबदारी खासादार या खैबर टोळीवाल्यांकडे आहे. त्यांना खंडणी द्यावी लागते. ब्रिटिशांनंतर खैबरची जबाबदारी पाकिस्तानकडे आली आहे.

Start a discussion about खैबर खिंड

Start a discussion
"खैबर खिंड" पानाकडे परत चला.