झिम्मा हे एक महाराष्ट्रातील स्त्रियांचे सामुदायिक नृत्य आहे. निवांत समयी किंवा शेतीची कामे वगैरे संपली असतील तेव्हा किंवा चांगले पीक जोमात वर आले आहे अशा आनंदाच्या प्रसंगी स्त्रिया हे सामुदायिक नृत्य करतात. या नृत्यामध्ये स्त्रिया वर्तुळात उभ्या राहून एकदा स्वतःच्या आणि एकदा दुसरीच्या हातावर टाळी वाजवतात. टाळीसोबत चुटक्याही वाजतात. झिम्मा खेळतांना स्वतःभोवती फिरायचे असते व झिम्माची टाळी द्यावयाची असते. काही वेळा स्त्रिया वर्तुळात जोडीने उभ्या राहतात व एकमेकींच्या हातावर टाळ्या देऊन पुढे सरकत असतात आणि वर्तुळात फिरत असतात. या खेळाची लय सुरुवातीला संथ व नंतर त्याची गती वाढत जाते. झिम्मा नृत्य नाचताना काही गाणीसुद्धा गायली जातात. त्यापैकी एक गाणे

झिम्मा खेळू कडाकडी अबीर बुक्का नाडापुडी॥ झिम् पोरी झिम् कपाळीचे भिंग| भिंग गेले फुटुन| पोरी गेल्या उठून॥ आंबा पिकतो रस गळतो| कोकणचा राजा झिम्मा खेळतो॥

झिम्म्याचा खांदी झिम्मा म्हणून अजून एक दुसरा प्रकारही आहे. त्यामध्ये दोन मुली समोरासमोर उभ्या राहून एकमेकींच्या हातावर हात मारतात व नंतर हात मागे घेऊन ते खांद्यावर ठेवतात. हे झाल्यावर पुन्हा एक गिरकी आपल्या स्वतःभोवती घेतात व झिम्म्याप्रमाणे हातावर हात मारतात. सध्या हा नृत्यप्रकार शहरात तरी पहावयास मिळत नाही परंतु गावाकडे किंवा ग्रामीण भागात काही प्रमाणात सुरू आहे. पूर्वीच्या काळी बायकांनी विरंगुळ्यासाठी असे साधे सोपे प्रकार शोधून काढले असावेत. ज्यामुळे शारीरिक व्यायामाबरोबरच मनालाही ताजेतवानेपणा येऊन पुढील कार्यासाठी उत्साह व जोम मिळत असावा.

Start a discussion about ओडिसी नृत्य

Start a discussion
"ओडिसी नृत्य" पानाकडे परत चला.