चकवाचांदण : एक वनोपनिषद

मारुती चितमपल्ली यांच्या ‘चकवाचांदण’ या आत्मकथनाचे एकूण स्वरूप एका वनाधिकाऱ्याचे अरण्य-अनुभव असे आहे.

विदर्भातील तणमोराच्या संशोधनाच्या निमित्ताने ते रानोमाळ भटकत असता तणमोराची शिकार करणारा पारधी भेटला. डॉक्टर सलीम अली यांच्या पक्ष्यांच्या पुस्तकातील घुबडाचे चित्र पाहून त्याने त्या पक्ष्याचे नाव सांगितले,‘चकवाचांदण’. घुबडासारख्या अभद्र समजल्या जाणाऱ्या पक्ष्याचे नाव इतके सुंदर, काव्यमय असू शकते याचे शब्दवेड्या चितमपल्लींना आश्चर्य, तसाच आनंद वाटला. साहजिकच त्यांच्या मनात ‘चकवाचांदण’ या नावाविषयी जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी त्या पारध्याला विचारलेलं, 'चकवाचांदण’ म्हणजे काय?’ तो “साब, ते पखेरू कलमुहा हाय. रानात सांजेला तो बोंबलू लागला की वाटेत आम्हांला चकवा मारतो. आमची रानभूल होते. अशा वेळी आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो. आभाळात शुक्राची चांदणी दिसू लागते तेव्हा चकवा निघून जातो. आम्हाला वाट सापडते. म्हणून त्याला चकवाचांदण म्हणतो.’ चितमपल्लींना नावाचा हा खुलासा आवडला. ‘चकवाचांदण’ हे नाव त्यांना संधिप्रकाश आणि गूढता यांचे प्रतीक वाटले. चितमपल्लींनी वनविभागातील नोकरी ठरवून स्वीकारलेली नव्हती. चुकून ते या नोकरीच्या आडवाटेच्या वनात आले आणि चालत चालत असता त्यांना आयुष्याची सुंदर वाट सापडली. अरण्यातल्या चकव्यानंतर दिसलेल्या उगवत्या शुक्राच्या चांदणीचे सौंदर्य अगदी आगळेवेगळे दिसते, म्हणून मारुती चितमपल्लींनी आपल्या आत्मकथनाचे नाव ‘चकवाचांदण’ ठेवले.

हे सुद्धा पहा

संपादन
  • प्रकाशक - मौज प्रकाशन[१]

संदर्भ

संपादन
  1. ^ http://moujprakashan.com/index.php?page=shop.product_details&flypage=flypage.tpl&product_id=423&category_id=23&option=com_virtuemart&Itemid=29&lang=mr&vmcchk=1&Itemid=29[permanent dead link]