चंडीप्रसादांच्या बालवयात त्यांचे वडील निवर्तले होते आणि त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुरे होऊ शकले नव्हते. इतर अनेक युवकांप्रमाणे त्यांना गाव सोडून नोकरी शोधायला उत्तर प्रदेशात जावे लागले होते. १९५६ साली जयप्रकाश नारायण यांचे व्याख्यान ऐकल्यावर त्यांच्या आयुष्याने एक नवे वळण घेतले. १९६० साली नोकरी सोडून त्यांनी सर्वोदय चळवळीत स्वतःला झोकून दिले. १९६४ मध्ये लोकांना स्वतःच्या गावांजवळ वनोपजावर आधारित कुटीरोद्योग व आयुर्वेदिक वनस्पती गोळा करून रोजगार निर्माण व्हावा या उद्दिष्टाने त्यांनी गोपेश्वरला दशोली ग्राम स्वराज्य संघाची स्थापना केली.