घटना क्षितिज (इंग्लिश: Event horizon, इव्हेंट हॉरायझन ;) म्हणजे कृष्णविवराभोवती असलेली त्याची अदृश्य सीमा. या सीमेच्या आत गेल्यास कोणीही मुक्त होऊ शकत नाही. याठिकाणी असलेल्या प्रखर गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाशदेखील मागे खेचला जातो.

कृष्णविवराचे घटना क्षितिज

संपादन

आकाराने प्रचंड मोठ्या ताऱ्याचे जेव्हा कृष्णविवरामध्ये रूपांतर होते तेव्हा तो स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने इतका लहान होत जातो की शेवटी तो जवळ जवळ अदृश्यच होतो. यावेळी तो अमर्याद लहान व अमर्याद जड बनतो. या एका अदृष्यरूप बिंदूला 'सिंग्युलॅरीटी' असे म्हणतात. एक अशी अवस्था जी कृष्णविवराच्या केंद्रस्थानी असते आणि जिथे भौतिकशास्त्राचे कोणतेही नियम लागू होत नाहीत. या बिंदूरूप अवस्थेभोवती अदृश्य कुंपण निर्माण होते ज्यास घटना क्षितिज असे म्हणतात. घटना क्षितिज हे कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाची सीमाच असते. एक अशी सीमा जिच्या पालीकडून परतणे शक्य नाही. 'घटना क्षितिज' ही अशी एक जागा आहे जिथून मुक्तिवेग हा प्रकाशाच्या वेगाइतकाच असतो तर त्याच्या आतील कृष्णविवरापासून मुक्तिवेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. ज्याअर्थी प्रकाशापेक्षा कोणतीही गोष्ट जलद नसली तरी प्रत्यक्षात 'घटना क्षितिज'च्या पलीकडे मुक्तीवेग हा त्याच्यापेक्षा जास्त असल्याने प्रकाश देखील इथून बाहेर पडू शकत नाही. बिंदूरूप अवस्थेपासून 'घटना क्षितिज'च्या पर्यंतच्या (सिंग्युलॅरीटी ते इव्हेंट होरयझन) अंतरालाच श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या असे म्हणले जाते. समजा आपल्या सूर्याचे जर कृष्णविवरामध्ये रूपांतर झाले तर त्याची श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या ३ कि. मी. असेल. सर्वसाधारण कृष्णविवराचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या १० पट इतके असते. तर त्याची श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या ३० कि. मी. इतकी असते.