ग्रंथीखोड म्हणजे जमिनीत वाढणारे परिवर्तीत खोड. अन्नसाठयामुळे हे परिवर्तीत खोड मांसल असते. ग्रंथीखोडाचे अभिवृद्धीचे नेहमीचे परिचित उदाहरण म्हणजे बटाटा. खोडाला असणारे सारे अवयव ग्रंथी खोडात असतात. बटाटाच्या वरचे डोळे म्हणजे पेरे. ग्रंथीखोडाची अभिवृद्धी करताना एकतर आख्या ग्रंथीखोड लावतात किंवा डोळे असलेला भाग ठेवून विभाजन करून ते तुकडे लावतात. ते तुकडे ३० ते ३५ ग्रॅम वजनाचे व एक डोळा असलेले असावे. बटाट्याचे तुकडे कापल्यावर ते १५.५ डिग्री सेल. तपमानात साठवावे. आर्द्रता साधारण ९० % असावी. हे तुकडे लावण्यापूर्वी २ -३ दिवस साठवावेत. त्यामुळे त्यावर सुबरायझेश्न होऊन त्यांचा जमिनीतल्या बुरशीपासून बचाव होतो व सडणे व कुजणे या क्रिया या सुबरायझेशनमुळे कमी होतात.