गुलाम महंमद (जन्म : बिकानेर, राजस्थान, इ.स. १९०३; मृत्यू १७ मार्च १९६८) हे एक हिंदी चित्रपट संगीतदिग्दर्शक होते.

गुलाम महंमद यांचे घराणेच संगीतकारांचे होते. त्यांचे वडील नबी बक्ष हे हे एक तबला वादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी गुलाम महंमद पंजाबमधील न्यू आलबर्ट थिएट्रिकल कंपनीत दाखल झाले. कालांतराने ते कंपनीचे नृत्य-दिग्दर्शक बनले.

इ.स. १९२४मध्ये गुलाम महंमद मुंबईत आले. योग्य संधी मिळावी म्हणून सतत आठ वर्षे धडपडत राहिले, आणि शेवटी १९३२मध्ये त्यांना सरोज मुव्हीटोनच्या ’राजा भर्तृहारी’ या चित्रपटात तबला वाजवायला मिळाला.

त्यानंतर गुलाम महंमद हे संगीतकार नौशाद यांच्याकडे त्यांच्या ’कारगर’ प्रॉडक्शनमध्ये साहाय्यक म्हणून लागले, तिथे नौशादअनिल विश्वास यांच्या हाताखाली त्यांनी १२ वर्षे काम केले..

इ.स. १९४३मध्ये आलेला पारस यांचा ’मेरा ख्वाब’ हा गुलाम महंमद यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलेला पहिला चित्रपट. पण तो चित्रपट पडला. मात्र १९४८ साली आलेल्या ’गृहस्थी’ या चित्रपटात दिलेल्या संगीतामुळे गुलाम महंमद ओळखले जाऊ लागले. त्‍याच वर्षी सुरैय्याचे काम असलेला काजल आणि कामिनी कौशलचा पगडी हे चित्रपट प्रकाशित झाले. पुढे देव आनंद आणि सुरैय्या यांच्या ’शायर’ व मधुबाला-मोतीलाल यांच्या ’हॅंसते हॅंसते ऑंसू’ या चित्रपटांतील गाणी सुमधुर चालींमुळे गाजली.

मिर्झा गालीब या चित्रपटाच्या संगीतासाठी गुलाम महंमद यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कमाल अमरोही यांच्या ’पाकिजा’ हा चित्रपट गुलाम महंमद यांच्या यशाचा कळस ठरला. पण चित्रपट पूर्ण होण्याआधीच गुलाम महंमद यांचे निधन झाले, आणि नौशाद यांना तो चित्रपट पूर्ण करावा लागला.

गुलाम महंमद यांनी संगीत दिगर्शन केलेले चित्रपट संपादन

  • काजल
  • गृहस्थी
  • टायगर क्वीन
  • दिले नादान
  • पगडी
  • पाकिजा (अंशतः)
  • मिर्झा गालीब
  • रेल का डिब्बा
  • लैला मजनू
  • शमा
  • शायर
  • हॅंसते हॅंसते ऑंसू


पुरस्कार/सन्मान संपादन

  • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९५५)
  • मुंबईतील ’कीप अलाइव्ह’ म्युझिक संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (१९९७)
  • म्युझिकलर या संस्थेने २०१० साली केवळ गुलाम महंमद यांच्या संगीतावर आधारलेला एक ऑडिओ-व्हिडिओ कार्यक्रम केला होता.