गुलाबबाई संगमनेरकर

गुलाबबाई संगमनेरकर[१] (जन्म १९३२) या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत व नृत्यचंद्रिका असुन् त्या बैठकीच्या लावणीची अदाकारी साठी प्रसिद्ध आहेत. गुलाबबाईंना त्यांच्या आईने राधाबाई बुधगावकर आणि नंतर छबु नगरकर, सुगंधा सिन्नरकर यांच्याकडे लावणीचे धडे गिरवायला ठेवले. या दोन्ही ठिकाणी काही गोष्टी शिकल्यावर गुलाबबाई बनुबाई शिर्डीकर यांच्या पार्टीत दाखल झाल्या.

काही वर्षांनंतर गुलाबबाई संगमनेरकर यांच्या नावाने संगीत पार्टी सुरू केली. संगीत पार्टीची सुरुवात करण्यासाठी त्यांनी कलानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरची निवड केली. कोल्हापूरच्या कवठेकर थिएटरमध्ये गुलाबाबाई संगमनेर यांच्या स्वतःच्या संगीतबारीची सुरुवात झाली. तुकाराम खेडकर, कांताबाई सातारकर, आनंदराव जळगावकर यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे.

पुढे महाराष्ट्रात नावलौकिक झाल्यावर मुंबई दौऱ्यात गुलाबबाईंना एच.एम.व्ही. या नामांकित कंपनीने निमंत्रित केले. एच.एम.व्ही. कंपनीने काढलेल्या ध्वनिमुद्रणाला (रेकॉर्ड) चांगला प्रतिसाद मिळाला. रेडिओवरून या लावण्या प्रसारित होऊ लागल्या. दिल्लीला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले. तेव्हा महाराष्ट्रातून गुलाबबाईंना दिल्लीत कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. पुण्यात आर्यभूषण थिएटरला त्यांच्या संगीत पार्टीचे कार्यक्रम जोरात सुरु असत. काही दिवस पुण्यात आणि काही दिवस मुंबईत कार्यक्रम सुरु असताना गुलाबबाई संगमनेरकर हे नाव अभिजन वर्गातही गाजू लागले. त्याचदरम्यान लता मंगेशकर यांच्या'आजोळच्या गाणी' या ध्वनिचित्रफितीत एक लावणीवर गुलाबबाई संगमनेरकर यांनी अदाकारी केली. ‘रज्जो’ नावाच्या हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे.

गाढवाचे लग्न या लोकनाट्याचे कार्यक्रमात सुद्धा सहभागी झाल्या.आयुष्यभर अनेक मानसन्मान मिळवलेल्या या कलावतीला महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८-१९ साठीच्या "विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारासाठी" निवड केली आहे.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "गुलाबबाई संगमनेरकर, मधुवंती दांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर". Loksatta, a marathi news daily. June 24, 2020. 5 Sept 2020 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)