गुलमोहर दिवस
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
साताऱ्यात एक मे हा दिवस ' गुलमोहर डे ' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करणारे सातारा हे बहुधा जगातले पहिलेच शहर असावे. १९९९ सालापासून साताऱ्यात हा दिवस साजरा केला जात आहे.
मे महिन्यात गुलमोहोराच्या झाडाला बहर येतो. लाल-केशरी फुलांनी ते झाड बहरून येते. फुलांनी नखशिखांत डवरून वाऱ्याच्या झुळकीबरोबर एकेक फूल जमिनीवर सोडून तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरायचा, हा गुलमोहराचा स्थायीभाव दरवर्षी अनुभवाला येतो. त्याची आठवण ठेवणारा वर्षातला एक दिवस असावा असे वाटून गुलमोहराला अर्पण केलेला दिवस म्हणून 'गुलमोहर डे' साजरा करण्याची पद्धत साताऱ्यात सुरू झाली. सागर गायकवाड आणि पी. व्ही. तारू या दोघांनी सर्वांत आधी ही कल्पना मांडली. दरवर्षी १ मेला कलासक्त मंडळी एकत्र येतात आणि आपापल्या परीने गुलमोहराचे वर्णन करतात. चित्रकार गुलमोहराची चित्रे काढतात, कवी गुलमोहरावर कविता करतात, फोटोग्राफर कॅमेऱ्यांत बंदिस्त केलेल्या गुलमोहराच्या फोटोंचे प्रदर्शन भरवितात.
साताऱ्याच्या पोवई नाक्याजवळ ६७ गुलमोहराची झाडे असणाऱ्या रस्त्यावर हा उपक्रम साजरा केला जातो. हा उपक्रम तेथे दरवर्षी होत असल्यामुळे या रस्त्याला 'गुलमोहर रस्ता' असे नाव देण्यात आले आहे. हा उपक्रम आता एक सांस्कृतिक चळवळ बनून गेला आहे. वृक्षारोपण, प्रत्यक्ष निसर्गचित्रण, चित्रप्रदर्शन, कविता वाचन, कथ्थक नृत्य, शास्त्रीय गायन असे विविध कार्यक्रम या दिवशी केले जातात. गुलमोहोराची रोपे देऊन त्यांची काळजी घेण्याचे आवाहनही केले जाते.
कला महाविद्यालय, हिरवाई प्रकल्प या संस्था आयोजनासाठी सहकार्य करत असल्या तरीही दरवर्षी अनेक कलाकारांची त्यात उत्स्फूर्त भर पडते आहे. साताऱ्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक कवी, संगीतकार, लेखक यामध्ये सहभागी होतात. प्रत्येक वर्षी दिल्या गेलेल्या रोपांचे व्यवस्थीत संगोपन करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार, वड, पिंपळ, जारूल, .कडूनिंब, कांटे सांवर अशा पर्यावरणपुरक झाडांच्या रोपांचे वाटप, नवीन रोपांची लागवड असे पर्यावरणपूरक उपक्रमही राबविले जातात. त्यामुळे केवळ हौशी लोकांचा हा दिवस न राहता त्याचा एक स्वतंत्र असा पॅटर्न विकसित झाला आहे. साताऱ्यासोबत महाराष्ट्रातल्या इतर शहरांतही तो साजरा व्हावा, असे या दिवसाचे आयोजन करणाऱ्या प्रत्येकाला वाटत आहे. दिवगंत ज्येष्ठ कवी ग्रेस यांनी निधनापूर्वी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा वर्तविली होती. मात्र, हा गुलमोहर डे त्यांना अनुभवता आला नाही.
सातत्याने काळ्या घटनांनी गाजत असणाऱ्या साताऱ्यात सकारात्मक वृत्तीने लावलेल्या 'गुलमोहर दिवसाच्या' रोपाचा आता एक डौलदार वृक्ष झाला आहे.
पहा : जागतिक दिवस