गालिचा हा एक कलात्मक विणकामाचा आजवर विकसित होत आलेला प्राचीन प्रकार आहे. जमिनीवर अंथरण्यासाठी, दारावरील पडद्यांसाठी, भिंतीवरील शोभाप्रावरण आणि सौंदर्यपूर्ण भेटवस्तू म्हणून गालिचे उपयोगी पडतात. पांघरुण, छत्र, पायघड्या व थडग्यावरील आच्छादन म्हणून तसेच प्रार्थनाधार्मिक विधी यांसाठीही गालिच्यांचा वापर होतो.

स्थूल इतिहास:
संपादन

प्राचीन मानव हातरी म्हणून प्राण्यांची कातडी वापरत असे. नंतर प्राण्यांचे केस व सुताचे धागे एकत्र गुंफून आणि त्यांस गाठी मारून थोड्याफार प्रमाणात कलात्मकता आणली गेली. पुढे कपडे विणण्याचे व सूत रंगविण्याचे तंत्र अवगत झाल्यावर गालिचासारखा प्रकार निर्माण झाला. रासायनिक आणि वनस्पतिजन्य रंगांची त्यात आकर्षक भर पडली. ही कला प्रथम मध्यपूर्वेकडील देशांत विकास पावली. यानंतर गालिचा विणताना लांबीरुंदीबरोबरच गालिच्यांच्या गुबगुबीत जाडीचे प्रमाण कसे आणावे, याचा भारतात शोध लागला. यासाठी ज्यूट, लोकर आणि कापूस इत्यादींचा वातीसारखा मिश्र जाड धागा व लोकरीचा झुबकेदार पुंजका यांचा वापर सुरू झाला. पौर्वात्य देशांत गालिच्यांमध्ये अशा पुंजक्यांच्या गाठी एक चौ. सेंमी. मध्ये जितक्या जास्त तितका तो अधिक मूल्यवान समजतात. विणण्याची कला अवगत झाल्यापासून कापडावरील उठावाचे तंत्र निर्माण झाले. त्यातून आटऱ्या, गाठी व पोत निर्माण करणाऱ्या विविध विणींचे प्रकार निघाले. अशा विणकामात मग नक्षी, चित्रे इ. गुंफण्यात येऊ लागली. आशियाई देशांत सुरुवातीला सतरंजीसाठी एका धाग्याची गाठ निर्माण झाली आणि तेथून हे तंत्र यूरोपात गेले. विविध उंचवटे किंवा उठाव साधून गालिचे गुबगुबीत बनविण्यात येऊ लागले. हातमागावर विणलेले गालिचे तऱ्हेतऱ्हेच्या नक्षीकामांनी व रंगसंगतीने युक्त असतात.

इराण, तुर्कस्तान, अरब राष्ट्रे, सोव्हिएट रशियाचा काही भाग, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारतचीन या देशांतील कलापूर्ण गालिचे पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. इराण आणि काश्मीर येथे गालिचानिर्मितीचे मोठे उद्योग आजही चालू आहेत. अलीकडे पाश्चात्य राष्ट्रांत गालिचे व जाजमे यांत्रिक पद्धतीने तयार करतात.

गालिचा या प्रकारात परंपरागत सात वाण आहेत : (१) तुर्की, (२) कॉकेशियन, (३) इराणी, (४) मध्य आशियाई, (५) भारतीय, (६) चिनी आणि (७) फ्रेंच (टॅपेस्ट्री). पश्चिम आशियाई देश, तुर्कस्तान इ. ठिकाणी इ. स. पू. सहाव्या शतकाच्या सुमारास उत्कृष्ट गालिच्यांची निर्मिती सुरू झाली व ती फेल्ट अथवा वातघाग्यांच्या विणीची होती. हे गालिचे फार मोठे असत. यांत इतर धाग्यांबरोबर सुवर्ण व चांदीच्या तारांचा समावेश असे. मधूनमधून त्यांत मूल्यवान रत्नेही गुंफीत असत. या गालिच्यांवर सुंदर उद्याने, वृक्षवेली, पर्णफुले, झरे इत्यादींची दृश्ये विणलेली असत. पुढे इस्लाम धर्माचे वर्चस्व या प्रदेशात प्रस्थापित झाल्यावर गालिचानिर्मितीस बरीच चालना मिळाली. राजे लोकांच्या आश्रयाखाली मोठ्या प्रमाणावर हा उद्योग विकसू लागला व इतर देशांत या गालिच्यांची निर्यात होऊ लागली. नक्षीतील लयबद्धता व गुंतागुंतीचा आकृतिबंध या बाबतींत इराणी व मध्यपूर्वेतील मुस्लिम विणकर फारच तरबेज होते. गालिच्यांसाठी लागणारी उत्तम प्रकारच्या लोकरींची पैदास कॉकेशियस लोक करीत असत.

रंगसंगती
संपादन

हिरवट निळा रंग हा मुस्लिम लोकांचा पवित्र रंग. हा हमखास त्यांच्या गालिच्यांत असतोच. याखेरीज हिरवा, भडक तांबडा, चॉकलेटी, गुलाबी, स्वच्छ पांढरा, केशरी व काळा या रंगांचा इराणी व तुर्की गालिच्यांमधून सढळ वापर केलेला असतो. यांतील बरेच रंग वनस्पतींपासून बनवितात. उदा., मंजिष्ठ (मॅडर) वनस्पतींच्या मुळांपासून तांबडा, निवडुंगावरील भुंग्यांपासून चकचकीत काळपट तांबडा, नीळ (इंडिगो) या वनस्पतीपासून निळा, केशराच्या देठांपासून पिवळा, हिरवी फळे अथवा विलो वनस्पतीच्या पानांपासून हिरवा आणि हेन्ना (मेंदी) अगर नरसिंगार याच्या फुलांपासून किंवा फणसाच्या झाडापासून नारंगी रंग बनविण्यात येतो. पांढऱ्या व काळ्या धाग्यांसाठी लोकरीचा आणि तपकिरी रंगासाठी उंटांच्या केसांचा उपयोग करतात. वर सांगितलेले वनस्पतिजन्य रंग योग्य प्रकारे व पक्के झाले किंवा नाही, हे केवळ डोळ्यांनी व तर्काने ओळखणारे कसबी रंगारी अजूनही आहेत. या रंगाऱ्यांना गालिचाव्यवसायात फार मोठा मान असतो. वर वर्णिलेल्या विविध रंगांनी विणलेल्या गालिच्यांचे रंग पक्के होण्यासाठी ते नदीच्या किंवा पाण्याच्या प्रवाहात बुडू शकतील अशा बेताने ताणून बांधून ठेवतात व त्यांच्यावरून पाणी वाहू देतात किंवा ते पाण्याच्या हौदात बुडवून ठेवतात व त्यांना पायांनी तुडवितात. नंतर ते बाहेर काढून वाळत घालतात आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात पूर्णपणे वाळवितात.

सूतकाम
संपादन

वातीसारखे फुगीर व मऊ धागे बनविण्यासाठी उंटांचे केस व लोकर यांच्या पुंजक्यापासून कारागीर लोक चातीवर सूत काततात. हा धागा २५ ते ४५ सेंमी. लांब झाल्यावर त्याच्या एका टोकाला कच्च्या ओल्या मातीची गोळी चिकटवितात व धाग्यास पीळ देतात. असे अनेक धागे एकत्र जोडून मोठे धागे तयार करतात.

विणकाम
संपादन

यासाठी प्रथम आडवे धागे विणलेला एक चौकटीचा भाग उभा केलेला असून त्याच्या एका बाजूस धोट्या (रोलर) असतो. या आडव्या धाग्यांवर निरनिराळ्या रंगांच्या लोकरीचे गुंडे लटकविलेले असतात. त्यांच्या साहाय्याने कारागीर हव्या त्या विणीचे व वाटेल त्या नक्षीचे विणकाम विणून तयार करतात. हे धागे अस्तर धाग्याला मागून घट्ट बांधून पुढील बाजूस सैलसर विणतात व ज्या जाडीचा गालिचा हवा असेल, तसे ते वरून कात्रीने कातरतात. कधी कधी या गालिच्यांच्या विणींत दोन प्रकार असतात. एका प्रकारात भौमितिक आकृत्या, गुंतागुंतीची नक्षी व सांकेतिक प्रतीके उठवलेली असतात.

दुसऱ्या प्रकारात फुले, वनस्पती, प्राणी, महिरपी, वेलबुट्ट्या व ऐतिहासिक प्रसंग, कुराणातील वचने व धार्मिक दृश्ये विणलेली असतात. मध्यपूर्व देशांत नमाज पढण्यासाठी व घोड्यावरील खोगिरांसाठी खास नक्षीचे छोटेछोटे गालिचे तयार करतात. श्रीमंत अमीरउमरावांच्या कबरीवरही खास प्रकारचे गालिचे पांघरतात. प्रार्थनेच्या गालिच्यांवर एकाच बाजूने दोन टोके एकत्र मिळणारी महिरप असते. तीवर कुराणातील वचनेही विणलेली असतात.