गतिनियंता
मूलचालकांचा (नैसर्गिक ऊर्जा उद्गमाचे यांत्रिक शक्तीत रूपांतर करणाऱ्या एंजिन, टरबाइन इ. प्रयुक्तींचा) सरासरी परिभ्रमी (फिरण्याचा) वेग नियमित करणारे यांत्रिक साधन. जेव्हा एंजिनावरील भार बदलत नाही तेव्हा त्याची ठराविक सरासरी परिभ्रमी गती कायम राखणे व जेव्हा भार बदलतो व त्यामुळे वेगात बदल होतो तेव्हा एंजिनाला पुरविल्या जाणाऱ्या ऊर्जेत जरूर तो बदल घडवून वेग पूर्वपदावर आणणे हे गतिनियंत्याचे कार्य होय. प्रत्येक एंजिनला गतिनियंत्याशिवाय, काहीसे त्याच्याच सारखे कार्य करणारा, आणखी एक घटक जोडलेला असतो. तो म्हणजे प्रचक्र होय. पण प्रचक्र हे फक्त एंजिनातील कार्यमाध्यमाच्या एका आवर्तनातील गतीचे नियमन करू शकते.
त्याला एंजिनाच्या सरासरी वेगाचे नियमन करता येत नाही आणि गतिनियंत्याला आवर्तनातील गतीच्या फरकाचे नियमन करता येत नाही. गतिनियंत्याला कार्यान्वित होण्यासाठी प्रथम त्याच्या परिभ्रमी गतीत फरक पडणे आवश्यक असते, तरीपण एंजिनाच्या स्थिरतेच्या दृष्टीने हा फरक शक्य तेवढा थोडा असावा.
अनुप्रयुक्ती व कार्यपद्धती : मूलचालकांच्या विविध प्रकारांनुसार गतिनियंत्यांच्या कार्यपद्धतींत फरक पडतो.
- वाफेचे एंजिन : (१) यातील एका प्रकारात गतिनियंता वाफर (बॉयलर) व एंजिन यांच्यामध्ये असणाऱ्या अवरोध झडपेचे नियमन करून वाफेचा दाब बदलून गतिनियमन करतो. (२) दुसऱ्या प्रकारात तो एंजिनाच्या विच्छेद बिंदू (वाफ पुरविण्याचा अवधी) बदलून एंजिनाला पुरविण्यात येणारी वाफ राशी कमीअधिक करून गतिनियमन करतो.
- वाफ टरबाइन : (१) अ-१ मध्ये वर्णिल्याप्रमाणेच. (२) वाफेच्या प्रोथाचे (तोटीचे) क्षेत्रफळ नियंत्रिक करून वाफेचे प्रमाण भाराच्या आवश्यकतेनुसार नियमित करतो. लहान टरबाइनात सर्वसाधारणपणे त्याच्या दंडावर एक अपमध्य (वक्र मार्गावरून फिरणाऱ्या वस्तूमुळे निर्माण होणाऱ्या व वक्रत मध्यापासून दूर जाणाऱ्या दिशेत कार्य करणाच्या प्रेरणेच्या तत्त्वावर कार्य करणारा) गतिनियंता बसवितात. तो एका जोडदांड्याच्या द्वारा टरबाइनाच्या अवरोध झडपेचे नियमन करतो. मोठ्या टरबाइनात अवरोध झडपेला किंवा प्रोथाला चालना देण्यास बराच जोर लागतो म्हणून गतिनियंता टरबाइनाच्या गतीतील फरकानुसार त्याला जोडलेली आरंभक झडप सरकवून सेवक चलित्राच्या (सापेक्षत: लहान असलेली प्रेरणा वर्धित करणाऱ्या साहाय्यक प्रयुक्तीच्या) मदतीने वेगनियमन करतो.
- वायू एंजिन : (१) घात- अघात गतिनियंता : चार धावांच्यावायू एंजिनात वायूकरिता आणि हवेकरिता वेगवेगळ्या झडपा असतील. तर त्या एंजिनात या जातीच्या गतिनियंता वापरतात. या प्रकारात वायू प्रवेश झडपेची उघडझाप एका सरकदंडाने केली जाते व तो दंड गतिनियंत्याला जोडलेला असतो. जेव्हा एंजिनाचा वेग प्रमाणाबाहेर वाढतो तेव्हा सरकदंड झडपेवरून निसटतो व एका आवर्तनाचा वायूचा पुरवठा चुकतो. या प्रकाराला इंधनराशी नियमन असेही म्हणतात. (२) दुसऱ्या राशिनियामक पद्धतीत वायू व हवेचे प्रमाण कायम ठेवून गतिनियंता त्या मिश्रणाच्या राशीचे नियमन करतो. (३) गुण नियमनाच्या पद्धतीत वायू व हवा वेगवेगळे नियमित करून भाराच्या मानाने गतिनियंता त्यांचे एकमेकांबरोबरच प्रमाण बदलतो.
- तेल एंजिन : यामध्ये सामान्यत: सिलिंडरामध्ये जाणाऱ्या तेलराशीचे नियमन होते.
- विमान एंजिन : विमानांच्या दट्ट्या एंजिनात गतिनियंता, एंजिनावरील भाराच्या बदलाप्रमाणे पंख्याच्या पात्यांचा अंतराल बदलून गती कायम ठेवतो. झोत (जेट) एंजिनात गतिनियंता तेलपंपाचा धुराकोन बदलून तेल पुरवठ्याचे नियमन करून गतिनियमन करतो.