गणेश रंगो भिडे (जून ६, १९०९ - ?) हे मराठी लेखक, ज्ञानकोशकार होते. त्यांनी 'अभिनव मराठी ज्ञानकोश' नावाचा ज्ञानकोश रचला. त्यांच्या जीवनावर प्रतिभा रानडे यांनी ’ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

भिडे यांचा जन्म अष्टे (सांगली) येथे झाला. त्यांचे बहुतेक सर्व वास्तव्य कोल्हापुरात होते. शिक्षण एम्‍.ए., बी.टी., मॅट्रिकनंतर ते प्रभात फिल्म कंपनीत नोकरी करीत असताना विणकाम व पाकशास्त्र या विषयांवरील पुस्तके तसेच हाउसहोल्ड एन्सायक्‍लोपीडिया पाहून मराठीत अशा प्रकारची पुस्तके असणे आवश्यक आहे, अशा विचाराने भिडे यांनी दोनच दिवसांत सु. ३५ विषयांची यादी तयार केली व पुढे २० एप्रिल १९३१ रोजी मा. त्र्यं. पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एका समारंभात व्यावहारिक ज्ञानकोश मंडळाची स्थापनाही झाली. २० मार्च १९३३ रोजी या मंडळाचे ‘लिमिटेड कंपनी’मध्ये रूपांतर होऊन त्याद्वारे १९३५ मध्ये प्रस्तुत कोशाचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. स्वतः भिडे यांनी सर्वत्र हिंडून त्याची विक्री केली. व्यावहारिक म्हणजे जीवनास आवश्यक असे ज्ञान देणाऱ्या या कोशाचे बहुतेक लेखन अप्रसिद्ध पण व्यासंगी होते. लेखनाचा उत्तम दर्जा, चित्रे व छायाचित्रे, सुबक बांधणी आणि त्यामानाने किंमत कमी ही कोशाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. तीन भागांत बालकोशही प्रसिद्ध करण्याचे भिडे यांनी योजिले होते पण १९४२ मध्ये याचा फक्त पहिला भागच प्रसिद्ध होऊ शकला. स्वातंत्र्योत्तर काळात नवे ज्ञान देणारा अभिनव मराठी ज्ञानकोश रचण्याची योजना त्यांनी आखली. केंद्र शासनाच्या दहा हजार रुपयांच्या साहाय्याने त्याचे फक्त पाच खंडच निघू शकले. जे. पी. नाईकांच्या सूचनेवरून तयार केलेला शैक्षणिक कोश रचण्याची त्यांची योजना नाईकांनी कोल्हापूर सोडल्याने पुरी होऊ शकली नाही. सिनेमासृष्टी हे मराठीतील चित्रपटविषयक पहिले नियतकालिक १९३२ च्या सुमारास त्यांनी सुरू केले. सेवक, पुढारी व उषःकाल या नियतकालिकांतही त्यांनी काम केले आणि पुण्याच्या केसरी व त्रिकाल वृत्तपत्राचे वार्ताहर म्हणूनही काम पाहिले. रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांचे प्रकाशित लेखन पुढीलप्रमाणे आहे : (१) व्यावहारिक ज्ञानकोश खंड, १-५ (१९३५-४०), (२) बालकोश खंड, १ (१९४२), (३) अभिनव ज्ञानकोश खंड, १-५ (१९६३-७९), (४) फोटो कसे घ्यावेत? (५) सावरकरसूत्रे (६) कोल्हापूर दर्शन(पु.ल.देशपांडे यांच्या सहकार्याने, १९७१) व (७) कलामहर्षी बाबूराव पेंटर (१९७८).[]

प्रकाशित साहित्य

संपादन
साहित्यकृती भाषा प्रकाशन वर्ष (इ.स.) प्रकाशन
अभिनव मराठी ज्ञानकोश मराठी १९७१


संदर्भ

संपादन