दत्तात्रेय राईलकर

(गजाननबुवा राईलकर या पानावरून पुनर्निर्देशित)


दत्तात्रेय विनायक तथा गजाननबुवा राईलकर मे ३१ इ.स. १९२१ - १५ मे, इ.स. २०१६) हे एक मराठी कीर्तनकार होते.

राईलकरबुवा यांनी कीर्तनकार रामचंद्रबुवा शिरवळकर यांच्याकडे बालवयातच गुरुकुल पद्धतीने कीर्तनाचे शिक्षण घेतले. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राईलकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून कीर्तन करणे सुरू केले. गायनाची उत्तम तयारी, वेदान्त-पुराणे आणि इतिहासाचा चांगला अभ्यास असल्याची राईलकरबुवांची ख्याती होती. रामदासी आणि नारदीय कीर्तन करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. पुणे आकाशवाणी केंद्र आणि मुंबई दूरदर्शन केंद्रांवरील पहिले कीर्तन राईलकर बुवांनी केले.

महाराष्ट्र तसेच देशभर फिरून त्यांनी कीर्तन केले. श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा या कीर्तन परंपरा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले. या संस्थेचे ते दीर्घकाळ अध्यक्षही होते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे राईलकर यांना कमलाकरबुवा औरंगाबादकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कीर्तन सार्वभौम, कीर्तन केसरी, अशा विविध पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. महाराष्ट्र सरकारतर्फे २८ फेब्रुवारी २०१३ रोजी एक लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.