क्षुरिकोपनिषद
हे उपनिषद कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित आहे. याच्यात एकूण २५ मंत्र आहेत. हे उपनिषद् नावाप्रमाणेच तत्त्वज्ञानाच्या प्रतिबंधक घटकांना कापून टाकण्यास सुरी किंवा चाकूप्रमाणेच समर्थ आहे. योगाच्या अष्टांगंपैकी (यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी) धारणेच्या सिद्धीची आणि तिच्या प्रतिफळाची विशेष रूपाने चर्चा या उपनिषदात केलेली आहे. या उपनिषदात सांगितले आहे की सर्वप्रथम योगसाधनेसाठी दृढ आसनावर बसून प्राणायामाच्या विशेष क्रियांचा अभ्यास करून शरीरातील सर्व मर्मस्थानांमध्ये प्राणाचा संचार त्याच प्रकारे करावा ज्याप्रकारे कोळी आपल्याच द्वारे निर्मित केलेल्या अतिसूक्ष्म तंतूंवर फिरत राहतो. त्यानंतर क्रमशः खालून वर जाताना हृदयकमलस्थित सुषुम्ना नाडीपासून प्राणतत्त्वाचा संचार करून तसेच अन्य ७२००० नाड्यांचे भेदन करून परब्रह्म स्थानापर्यंत पोहोचता येऊ शकते. तिथे पोहोचल्यावर जीव समस्त बंधनांना तोडून टाकण्यास समर्थ होतो. त्यावेळी तो आपल्या समस्त कर्मबंधनांना जाळून परमतत्त्वामध्ये त्याचप्रकारे विलीन होऊ शकतो ज्याप्रकारे दिवा विझण्याच्या वेळी (निर्वाण) तेल-वात सर्वकाही जाळून परमज्योतीमध्ये विलीन होऊन जातो. याप्रकारे जीव पुन्हा कर्मबंधनात अडकत नाही, जीवनमुक्त होऊन जातो. हेच या उपनिषदाचे सार आहे.