क्रोशे

आकड्यासारख्या सुईचा वापर करून नक्षीदार कापड बनवण्याची कला.

क्रोशे (इंग्लिश: Crochet ) म्हणजे आकड्यासारख्या सुईचा वापर करून नक्षीदार कापड बनवण्याची कला. क्रोशे हा मुळचा फ्रेंच शब्द आहे. फ्रेंचमधे क्रोशे या शब्दाचा अर्थ शब्दशः हूक किंवा आकडा असा होतो. भारतामधे ही कला पूर्वी केवळ देवांचे आसन विणण्यापुरतीच मर्यादित होती म्हणून भारतामधे क्रोशेच्या सुईला आसनाची सुई किंवा आकड्याची सुई असे म्हणतात.

क्रोशेमधे प्रमुख वीण ही एकामधे एक साखळ्या गुंफून केली जाते. नंतर निरनिराळ्या टाक्यांचा वापर केला जातो. या टाक्यांना खांब असे म्हणतात. हे विणकाम शिकण्यास अतिशय सोपे व करण्यास सुलभ असे आहे. क्रोशेचे विणकाम चुकून उसवल्यास ते नव्याने विणताना फार त्रास पडत नाही. क्रोशेमधे दोन सुयांवरील विणकामाच्या तुलनेत काम लवकर होत असले तरी क्रोशे विणकामास दोन सुयांवरील विणकामाच्या तुलनेत दीड पट दोरा अधिक लागतो. क्रोशेसाठी निराळा धागा व लोकर बाजारात उपलब्ध असते. मात्र साध्या कापडाच्या लांबच लांब पट्ट्या कापून त्यादेखील धाग्यासारख्या वापरल्या जातात.

विणकामाचा हा प्रकार स्त्रियांमधे अधिक लोकप्रिय असला तरी काही पुरुषांनीदेखील क्रोशे विणकामात हातखंडा मिळवला आहे.