कण्हेरी मठ

(कोल्हपुर पर्यटन कन्हेरी मट या पानावरून पुनर्निर्देशित)

कणेरी मठ हे कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे. या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहेत.

सिद्धगिरी म्य़ुझियमच्या सुरुवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत. त्यानंतर एका गुहेसदृश भागातून आत जाताच प्राचीन भारतातील ऋषिमुनींचे कोरीव पुतळे बनवलेआहेत. ऋषींची नावे, त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती तेथे लिहिली आहे.

या गुहेतून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूला हिरवीगार शेते आणि त्यांत काम करणारी माणसे दिसतात.त्या माणसांवर जाताच समजते की ही माणसे नसून माणसांच्या प्रतिकृती आहेत.धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखवण्यात आल्या आहेत. याच बरोबर शेतामध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर; लगोरी, सूरपारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या गेल्या आहेत.

बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पेही त्या-त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात.

ग्रामीण भागांत असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पहावयास मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब त्रिमिती प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.

म्युझियमजवळच काडसिद्धेश्वराचा मठ आहे.