कोगनोळी कर्नाटकच्या बेळगांव जिल्ह्यातील गाव आहे.

माहिती

संपादन

उत्तरेला दूधंगगा नदीचा हिरवागार विस्तीर्ण काठ, दक्षिणेला भव्य असा श्री मल्लिकार्जुन डोंगर, पूर्वी याच डोंगरावर बऱ्याच औषधी वनस्पती मिळायच्या. म्हणून याला संजीवनी डोंगरही म्हणतात. पश्चिमेला पुणा ते बेंगलोर रोड आणि महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसलेले गांव म्हणजे कोगनोळी. कनगोळी हे देवीचेच नाव आहे. गावात पूर्वीचे जे छोटे देवीचे मंदिर आहे, त्या देवीचे नाव कनगोळीच असाव पण कनगोळीचा अपभ्रंश होवन कोगनोळी हे नाव गावाला पडल असाव असा काही जुन्या जाणत्या लोकांचा कयास आहे. तर निसर्गाच्या कुशीत वसलेले सुजलाम सुफलाम असे हे कोगनोळी गांव बेळगांव जिल्ह्यात, चिक्कोडी तालुक्यात येते.गावाला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. कारण या ठिकाणी साडेतीनशे वर्षापूर्वीचा एक भईकोट किल्ला होता. त्या किल्ल्याचे बरेचसे अवशेष किल्ला परीसरात आढळून येतात. तोफ, बुरुज, जुनी बांधकाम खंदकाच्या खुणा, हाळविहिर, गणपती मंदिर, पुर्णानंद महाराजांचा मठ, जैन मंदिर, कल्लेश्वर मंदिर, दत्त मंदिर, नरसिंह, ब्रह्मदेव मंदिर, या ऐतिहासिक मंदिराच्या खुणा आजही आपल्याला पहावयास मिळतात. किल्ला परिसरातच मुळ गांव वसलेले आहे. कल्लेश्वर हे त्यावेळचे ग्राम दैवत मानत होते. जैन,मराठा, लिंगायत इत्यादी जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहत होते नंतर हळू हळू विस्तार वाढत गेला. किल्ला परिसराच्या पूर्वेला मगदूम गल्ली, पश्चिमेला महादेव गल्ली, दक्षिणेला माळी गल्ली आणि उत्तरेला लोखंडे गल्ली याप्रमाणे विस्तार झाला. पूर्वेला व पश्चिमेला असे दोन दरवाजे, पश्चिमेस चार रस्ते एका ठिकाणी मिळतात. त्या बाजूस गोठण अशी संज्ञा त्यावेळी जानकार लोकांनी दिली. जवळच गावकूस नावाची देवता अद्यावत साक्ष देत उभी आहे. त्यानंतर पश्चिमेला सुनियोजित आखीव व रेखीव गल्याचं गाव तयार झाले. गावात आठरा पगडीचे, धर्माचे लोक आहेत. सर्व धर्मियांची मंदिरे, मस्जीद आहेत. पण सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांचा आदर राखून कोणताही सणसमारंभ एकजुटीने, आनंदाने साजरा करतात.सरमिसळ जातीचे लोक असूनही शांततेत व संयमाने नांदणारे गाव असा गावाचा लौकिक आहे. याच गावात पूर्णानंद महाराज हे धार्मिक अधिष्ठान असलेले व्यक्तिमत्त्व होऊन गेले. त्यांच्याच परंपरेतील ह.भ.प.श्री.पांडुरंग काजवे महाराज वारकरी सांप्रदायाची धुरा सांभाळत आजही कार्यरत आहेत.

ग्रामदैवत श्री अंबिकादेवी

संपादन

श्री अंबिका माता हे कोगनोळी गावचे दैवत आहे. श्री अंबिका माता हे। तुळजाभवानीचेच रूप आहे. पूर्वी किल्ला विभागाच्या पश्चिमेस असलेल्या फडाच्या शेतवडीत हे मंदिर होते. कालांतराने गावाचा विकास झाला.गाव विस्तारला आणि श्री अंबिका मातेचे मंदिर मध्यवर्ती ठिकाणी झाले. अंबिका मंदिराच्या चोहो बाजूनी गांव विस्तारले. श्री अंबिका मातेचे मंदिर हे अतिप्राचीन मंदिर आहे. हेमांडपंथी स्थापत्यकलेशी साधर्म्य वाटणारी बांधकामाची घडण असे. नक्षीदार दगडी खांबावरती मंदिर उभे आहे मंदिरात विराजमान झालेली अंबिका मातेची तेजस्वी मूर्ती पाहिली की लक्षात येते हे एक जागृत देवस्थान आहे. समस्त कोगनोळीवासी आणि पंचक्रोशीतील सर्व भक्तांवर आढळ कृपेचा आणि आशिर्वादाचा वरदहस्त ठेवून असलेली अंबिका माता सर्वांच्या नवसाला पावणारी देवी आहे. १७ ते १८ व्या शतकाच्या उतरार्धात काळात श्रीमंत राजे निंबाळकर निपाणीकर सरकार व जयसिंगराव घाटगे कागलकर सरकार यांच्या अधिपत्याखाली बेळगांवपर्यंतचा भाग होता. ठिकठिकाणी देवीची स्थापना करीत असताना त्या दोन थोर पुरुषांनी मौजे कोगनोळी येथे श्री अंबिका देवीची स्थापना केली आहे. असे जुन्या जाणकार व्यक्तिकडून ऐकावयास मिळते. परंतु मंदिराच्या स्थापनेची अधिकृत नोंद कुठेही सापडत नाही.साधारण ४० वर्षापूर्वी १९७९ला गावातील आदरणीय व्यक्तिमत्त्व मा. श्री. विरकुमारजी पाटील साहेब यांच्या पुढाकाराने श्री अंबिका मातेच्या मूर्तीला वज्रलेप करण्यात आला. त्यावेळी वज्रलेप करावयास खास कारागीर आले होते. मूर्तीची आणि मंदिराची कलाकुसर पाहून हे मंदिर १३ व्या शतकातील असावे असे त्या कारागिरानी अनुमान काढले. एकंदरीत श्री अंबिका मातेच मंदिर हे प्राचीन आहे हे नक्कीच यात शंका नाही.

श्री अंबिकामातेच्या मंदिरातील दैनंदिन विधी

संपादन

दररोज पहाटे पाच वाजता देवीला जलस्नान घालून देवीची पूजा बांधली जाते. धूप, दिप, गंध, पुष्प, नैवेद्य अशी पंचोपचाराची पूजा केली जाते. रात्री ८ वाजता नित्यनेमाने देवीची आरती केली जाते. यात कधीही खंड पडत नाही.

देवीचे महात्म्य

संपादन

श्री अंबिका देवीची महती या अंबिका देवीच्या आरतीमध्ये कोगनोळी करवीर शाखंबरी हो कात्यायनी, महेश्वरी हो, आधिमाया आदिशक्ती असा उल्लेख केलेला आढळतो.जगतमाता श्री अंबिका देवीबद्दल कोगनोळी व पंचक्रोशीतील समस्त भक्तांच्या मनात नितांत श्रद्धा व भक्ती आहे. येथील ग्रामस्थांचा दिवस सुरू होतो तो श्री अंबिका देवीच स्मरण करूनच. दररोज सकाळी देवीच दर्शन घेऊनच आईसाहेब की जय जप धरुनच गाववाड्यातील नित्यकर्म चाल होतात. संकटकाळी भक्तांना हमखास तारुण नेणारी देवी असा श्री अंबिका मातेचा लौकिक आहे. मनापासून केलेली भक्ती आणि श्रद्धा, या गोष्टीवरच प्रसन्न होणारी देवी आहे. त्यामुळे कोगनोळी गावातील प्रत्येक व्यक्तिच्या मनात मग ती लहान असो वा थोर, श्रीमंत असो वा गरीब सर्वांच्या मनात अढळ श्रद्धास्थान आहे.गावातील कोणाचेही, कोणतेही शुभकार्य घडत असताना त्यांची सुरुवात देवीला ओटी भरुन, दंडवत घालूनच होते. देवीवर भार सोपवून चांगले कार्य हातात घेतले तर अंबिका माता ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडते अशी त्या मागची भावना असते, विश्वास असतो.