हे उपनिषद् कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित आहे. महर्षी अश्वलायन यांच्या जिज्ञासेचे समाधान करताना ब्रह्माजींनी कैवल्यपदाच्या प्राप्तीचे मर्म या उपनिषदात समजावून दिलेले आहे. या ब्रह्मविद्येची प्राप्ती कर्म, धन किंवा संतती यांच्या सहाय्याने अशक्य असल्याचे सांगून तिच्या प्राप्तीसाठी श्रद्धा, भक्ती, ध्यान आणि योग यांचा आश्रय घेण्यास सांगितले आहे. अंतःकरणास खालील अरणी आणि ओंकारास ऊर्ध्व अरणीच्या स्वरूपात वापरून ज्ञानाग्नी प्रज्वलित करून सांसारिक विकारांच्या दहनाचा निर्देश दिलेला आहे. स्वतःस ब्राह्मी चेतनेपासून अभिन्न अनुभव करून सर्वांना स्वतःमध्ये तसेच स्वतःला सर्वांमध्ये अनुभव करीत त्रिदेव, चराचर, पंचमहाभूते इत्यादी सर्वांमध्ये अभेदाच्या स्थितीचे वर्णन केलेले आहे. शेवटी ह्या उपनिषदाच्या अध्ययनाची फलश्रुती सांगितलेली आहे.