कार्ले लेणी

प्राचीन बौद्ध लेणी
(कार्ला लेणी या पानावरून पुनर्निर्देशित)

कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे. ६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[] कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत.

कार्ले लेणी
कार्ला लेणी, महाराष्ट्र
Map showing the location of कार्ले लेणी
Map showing the location of कार्ले लेणी
स्थान कार्ली, महाराष्ट्र
भूविज्ञान बसाल्ट खडक
प्रवेश १६

हा लेणी सोळा लेण्यांचा हा गट आहे व त्यात एक चैत्यगृह आणि इतर विहारे आहेत. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ ४५ फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार, आणि अंग सोळा कोनांमध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. या स्तंभाचा करविता ‘महारठी अग्निमित्रणक याच्या दातृत्वाचा भाषेतील लेख दिसतो.

चैत्यगृहाच्या उजव्या बाजूसही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावे असे अभ्यासकांना वाटते. याची एक सूचक शिल्पाकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आहे. इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबांमध्ये स्तूप दिसत आहे. याशिवाय या चैत्यगृहाचे कान्हेरीच्या चैत्यगृहाशी साम्य असल्याचे दिसते कारण तेथेही असे दोन्ही स्तंभ दाखवलेले आहेत. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. येथे मिथुन शिल्पाच्या जोडय़ा, हत्तींचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट, चैत्यकमानी आदि गोष्टी दिसून येतात. मिथुन शिल्पांतील स्त्रियांच्या डोक्यावर पदर घेतलेला दिसतो. तसेच कमरेला शेला आहे. पुरुषाने धोतर आणि डोक्यावर मुंडासे घातले आहे. स्त्रियांच्या हातात बांगडय़ा आहेत. तसेच पायातील विविध आकाराचे तोडे, कमरेवरच्या मेखला, गळ्यातील मण्यांचे हार, कर्णफुले, कपाळावरची कुंकू अशी आभूषणे दिसून येतात. इथे असलेल्या या मिथुन जोडय़ा तत्कालीन राज्यकर्त्यांच्या किंवा या लेण्यास दान देणाऱ्यांच्या असाव्यात असाही एक तर्क आहे.यातील एक जोडी अग्नीमित्र आणि विरावती ( इरावती ) यांची आहे . सोबत एकलविरा या दासीचे शिल्प आहे. सज्ज्याच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रासादांचे देखावे आहेत. याच्या तळाशी दोन्ही बाजूला तीन हत्तींची शिल्पे कोरलेली आहेत. यातील डाव्या बाजूकडील हत्तींवर पुढे गौतम बुद्धाच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत.

चैत्यगृहाच्या सज्ज्यात या लेण्याच्या करवित्याचा लेख आहे. ‘वेजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्ही उतमम्’ वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्वीपात उत्कृष्ट आहे, असा याचा अर्थ होतो.

कार्ल्यांच्या या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतले ३५ लेख दिसून आले आहेत. यातील बहुतेक दानधर्म विषयक आहेत. या लेखातून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रुढी-परंपरा, व्यापार-व्यवसाय, चलन असे अनेक विषय समजू शकतात. धेनुकाकट म्हणजे आजचे डहाणू, सोपारक (आजचे सोपारा), करिजक (कार्ल्याच्या उत्तरेला असलेले करंजगाव) प्रभास म्हणजे आजच्या काठेवाड भागातील प्रभासतीर्थ वैजयंती म्हणजे आजचे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्य़ातील बनवासी अशा अनेक गावांचे उल्लेख या लेखांतून दिसून येतात. चैत्यगृहाच्या व्हरांडय़ाच्या भिंतीवरील एका लेखात ‘मामालाहारे’ हा शब्द आलेला आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत एखाद्या ठराविक गावांच्या प्रदेशास - प्रशासकीय भागास ‘आहार’ असे म्हणत. तर ‘मामल’ म्हणजे आजचे मावळ! मावळ तालुक्याचा हा सर्वात प्राचीन उल्लेख असावा. या लेखांमधून वढकी (सुतारकाम), गंधक (सुगंधी द्रव्याचा व्यापार) अशा काही व्यवसायांचीही ओळख होते.

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "गॅझेट नोटिफिकेशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-03-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन