कामाख्या मंदिर

कामाख्या मातेला समर्पित मंदिर
(कामाख्य मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)
कामाख्या मंदिर

नाव: कामाख्या मंदिर, गुवाहाटी
निर्माता: चिलाराय
निर्माण काल : १५६५
स्थान: नीलांचल पर्वत, गुवाहाटीजवळ, आसाम
प्रधान देवता: कामाख्या देवी


कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी (गोहत्ती)येथे आहे. शक्तिदेवता सतीचे हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे.हे देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक असून येथील देवी योनी स्वरूपात आहे.[] हे ठिकाण तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे.[] या भागाला मध्यांचल पर्वत या नावानेही ओळखले जाते, कारण या ठिकाणी समाधिस्थितीत असलेल्या शंकराला कामदेवाने बाण मारला होता आणि समाधीतून बाहेर आल्यावर शंकराने त्या कामदेवाला जाळले होते. नीलाचल पर्वतावर कामदेवाला पुनः जीवनदान मिळाले म्हणून या क्षेत्राला कामरूप असेही म्हणले जाते.

शक्तीपीठ कथा

संपादन

पौराणिक संदर्भानुसार असे मानले जाते की पार्वती देवी पूर्वजन्मात सती नावाने दक्ष प्रजापतीची कन्या म्हणून जन्माला आली. ती शिवपत्नी होती. तिच्या वडिलांनी एक यज्ञ केला पण त्यासाठी शिवाला आमंत्रित केले नाही. सती तिथे पोहोचल्यावर शिवाचा उपहास करण्यात आला. हा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःचे जीवन संपविले. ही बातमी समजल्यावर शिवाने शोक केला आणि तिचे शव दोन हातांवर घेऊन रुडन करीत ते तिन्ही लोक फिरत राहिले. एकेका स्थानी सतीचा एकेक अवयव गळून पडला. ज्या ठिकाणे सतीचे अवयव पडले त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. कामाख्या येथे सतीची योनी गळून पडली अशी धारणा असल्याने योनीपूजेचे येथे विशेष महत्व आहे.[]

अंबुवाची पर्व

संपादन
 
सर्जन शक्तीची देवता

वर्षात एकदाच येणारे अंबुवाची पर्व जगातील सर्व तांत्रिक, मांत्रिक आणि सिद्ध-पुरुषांसाठी महत्वाचे स्थान आहे.[] हे अंबुवाची पर्व भगवती (सती)चे रजस्वला पर्व असते.[] तंत्र आणि मंत्रशास्त्राचे उपासक या काळात मंत्रांचे पुरश्चरण, अनुष्ठान करतात. या पर्वात देवी भगवती रजस्वला होते. तिच्या योनी महामुद्रेवर पांढरे वस्त्र घातले जाते जे लाल रंगाचे होते अशी श्रद्धा यामागे मानली जाते. मंदिरातील पुरोहित वर्ग या वस्त्राचे तुकडे भाविकांना प्रसाद म्हणून देतात. या पर्वात केवळ भारतातीलच नाही तर बांग्लादेश, तिबेट आणि आफ्रिकेतील तंत्र उपासक येऊन साधना करतात. वाममार्ग साधनेचे हे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.

पौराणिक संदर्भ

संपादन

पौराणिक आख्यायिकेनुसार अम्बुवाची पर्वाच्या काळात देवी भगवती रजस्वला होते आणि तिच्या गर्भगृहातील योनीतून सलग तीन दिवस जल प्रवाहाच्या ठिकाणाच्या जागी रक्त वाहते. (अशी मान्यता आहे)[]

कामाख्या तंत्रानुसार - योनिमात्र शरीरिणी कुंजवासिनी कामदा।रजोस्वला महातेजा कामाक्षी ध्येताम् सदा।। देवीच्या रजस्वला काळाची सांगता तीन दिवसांनी होते आणि त्यानंतर तिची विशेष पूजा आणि साधना केली जाते. याविषयीची आख्यायिका अशी आहे की- असुरराज नरकासुर अहंकारी होता. भगवती कामाख्येला आपली पत्नी करून घेण्याची त्याची इच्छा होती व त्यासाठी तो आग्रही होता. नरकासुराचा मृत्यू जवळ आला आहे हे ओळखून देवीने त्याला सांगितले की आज एका रात्रीत तू नील पर्वताच्या चारही बाजूना दगडाचे चार रस्ते तयार कर आणि मंदिरासोबत एक विश्राम गृहही तयार कर. तू हे पूर्ण करू शकलास तर मी तुझी पत्नी होईन आणि नाही करू शकलास तर तुझा मृत्यू अटळ आहे. अहंकारी राक्षसाने सकाळ होण्यापूर्वी दगडाच्या पायऱ्यांचे रस्ते तर तयार केले पण विश्रामगृहाचे काम चालू असतानाच देवीने एका मायावी कोंबड्याच्या द्वारे सकाळ झाल्याचे सूचित केले ज्यामुळे रागावलेल्या नरकासुराने त्याचा पाठलाग केला. ब्रह्मपुत्रेच्या दुसऱ्या तीरावर पोचलेल्या असुराने त्या कोंबड्याला मारले. हे ठिकाण आजही कुक्टाचकि नावाने प्रसिद्ध आहे.

सर्वोच्च कौमारी तीर्थ

संपादन
 
मंदिरावरील शिल्पकला

सती स्वरूप आद्यशक्ती महाभैरवी कामाख्येचे तीर्थ हे जगातील सर्वोच्च कौमारी तीर्थ म्हणूनही ओळखले जाते.[] त्यामुळे या शक्तिपीठाच्या ठिकाणी कुमारी पूजनाचे अनुष्ठानही महत्त्वाचे मानले जाते. सर्व कुलांतील आणि वर्णांतील कुमारिका या आदिशक्तीचे प्रतीक मानल्या जातात.

हे सुद्धा पहा

संपादन

शक्तिपीठे

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ KUMAR, DINKAR. KAMAKHYA (हिंदी भाषेत). Dinkar Kumar.
  2. ^ Rai, Dr Rishikesh (2023-02-24). Sarvagunakar Shrimant Shankardev: Bestseller Book by Dr. Rishikesh Rai: Sarvagunakar Shrimant Shankardev (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-92573-38-5.
  3. ^ रिया, ईशा (2023-12-06). हिंदू देवी-देवताओं के अवतार की कहानियाँ (इंग्रजी भाषेत). Mahesh Dutt Sharma.
  4. ^ Urban, Hugh B. (2024-03-27). The Path of Desire: Living Tantra in Northeast India (इंग्रजी भाषेत). University of Chicago Press. ISBN 978-0-226-83111-4.
  5. ^ Singh, Pradeep Kumar (2021-08-05). Shaill Shikhar Ki Chhanv Me (हिंदी भाषेत). Kavya Publications. ISBN 978-93-90707-40-9.
  6. ^ Goswāmī, Māmaṇi Raẏachama (2006). The Man from Chinnamasta (इंग्रजी भाषेत). Katha. ISBN 978-81-89020-38-5.
  7. ^ "कामाख्या शक्तिपीठ - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर". m.bharatdiscovery.org. 2024-07-07 रोजी पाहिले.